मालवणमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेकडून पक्षी निरीक्षण स्पर्धा

मालवण : गणेश चतुर्थीचे औचित्य साधून कट्टा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे वेगळी ‘पक्षी निरीक्षण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. आपल्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करता करता निसर्गाशी नाते जोडले जावे, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश अग्निहोत्री यांनी सांगितले.

या महाविद्यालयाने आपल्या प्रशालेतील मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेमध्ये पाचवी ते बारावीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा जरी त्या शाळेपुरती मर्यादित असली, तरी यापासून प्रेरणा घेऊन अशी स्पर्धा अन्य शाळा आणि कॉलेजेस नक्की आयोजित करू शकतात.

विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये परिसरामध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांचे फोटो घ्यायचे आहेत. हे फोटो २ सप्टेंबरपर्यंत astromahesh@hotmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहेत. एका प्रकारच्या पक्ष्याचा एकच फोटो ग्राह्य धरला जाईल. जास्त गुण मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे फोटो पाठविणे आवश्यक आहे. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावी या दोन गटात होणार आहे.

प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक काढले जातील व दोन उत्तेजनार्थ असतील. दोन्ही गटाच्या प्रथम क्रमांकाला ५०० रुपये, द्वितीय क्रमांकाला ३०० रुपये, तृतीय क्रमांकाला २०० रुपये व उत्तेजनार्थ १०० रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.

यामध्ये कावळा, चिमणी, पोपट, कबूतर व साळुंखी यांसारख्या सहज दिसणाऱ्या पक्ष्यांचे फोटो नसावेत. पक्षी ओळखता येईल इतपत फोटो सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. पक्ष्याच्या फोटोसोबत त्याचे नाव असणे आवश्यक आहे. नाव इंग्रजी, मराठी किंवा स्थानिक परिभाषेतील चालेल. प्रत्येक फोटोला पाच गुण व नावाला दोन गुण असतील. फोटो स्वतः मोबाइल किंवा कॅमेऱ्याने घेतलेले असावेत. ते फॉर्वर्डेड असू नयेत.

अधिक माहितीसाठी संजय नाईक (9158159715) आणि महेश नाईक (9137795951) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर व मुख्याध्यापक अग्निहोत्री यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply