लक्षणे दिसणाऱ्यांसाठी रत्नागिरी, चिपळूणला चार त्वरित करोना निदान केंद्रे सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे त्वरित निदान करणारी चार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोणालाही लक्षणे दिसत असल्यास करोनाचे त्वरित निदान करणे शक्य व्हावे, यासाठी रत्नागिरी शहरात झाडगाव येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मेस्त्री हायस्कूल आणि राजिवडा येथील उर्दू शाळा, तसेच चिपळूणमध्ये नगरपालिका दवाखान्यात ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

कोणाला सर्दी, ताप, खोकला, डोळे येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, ओठ आणि जीभ निळसर पडणे, भूक न लागणे, जिभेला कोणतीच चव नसणे, चव उशिरा कळणे, छातीत दुखणे यांपैकी कोणतेही लक्षण दिसले, तर त्वरित या करोना निदान केंद्रांमध्ये चाचणी करण्यासाठी जावे. या केंद्रात लक्षणे असलेल्या व्यक्‍तींवर प्रथमोपचार केले जातात. त्या उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही, तर करोनाची चाचणी केली जाते, जेणेकरून लवकरात लवकर तपासणी होईल व लवकर उपचार सुरू होतील. या पद्धतीने लवकर निदान आणि लवकर उपचार सुरू केले, तर करोनाबाधित रुग्णांपासून इतरांना लागण होणार नाही. त्यामुळे या केंद्रांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी आवाहन केले आहे, की प्रत्येकाने सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच लक्षणे असल्यास त्वरित उपचार घेणेही आवश्यक आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले, की वर उल्लेख केलेली लक्षणे आढळल्यास प्रत्येकाने त्वरित दवाखान्यात जावे. डॉक्टर बदलू नयेत, जेणेकरून औषधांना प्रतिसाद मिळत नसल्याचे त्या डॉक्टरांना लक्षात येईल. एका डॉक्टरकडे बरे वाटत नाही म्हणून डॉक्टर बदलले, तर निदान उशिरा होते. या आजारामध्ये प्रतिकारशक्‍तीचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रतिकारशक्‍ती वाढवण्यास नियमित व्यायाम, संतुलित आणि पोषक आहार, फळे प्रथिने, जीवनसत्त्वे यांचा आहारामध्ये नियमित समावेश करावा. नियमित योगासने, प्राणायामही आवश्यक आहे, असेही संयुक्त पत्रकात म्हटले आहे.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply