सिंधुदुर्गनगरी : नीट परीक्षेसाठी गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश करता यावा किंवा सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये नीट परीक्षा केंद्र मिळावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे केली होती. त्याला यश आले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची अडचण सुटणार आहे. मात्र यावेळची परीक्षा गोव्यातील केंद्रावरच द्यावी लागणार असून त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कुडाळचे आमदार वैभव नाईक विद्यार्थ्यांना साह्य करणार आहेत.
दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांकडे पत्राद्वारे मागणी करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी नीटचे परीक्षा केंद्र सुरू करावे किंवा करोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना स्वॅब टेस्टिंगशिवाय परीक्षेकरिता गोव्यात प्रवेश दिला जावा, अशी मागणी केली होती. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट करत निर्बंध तात्काळ हटविण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. तसेच त्यांनी याबाबत गोवा व महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. त्यामुळे गोव्यात नीट परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच गोव्यात परीक्षेला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करण्यासंदर्भात आपण परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून सोय करणार असल्याचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. त्यामुळे गोव्यात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी २२ ऑगस्टच्या नोटिशीद्वारे असे स्पष्ट केले आहे, की २९ जुलै रोजी जाहीर केलेल्या अनलॉक-३ नोटिफिकेशनप्रमाणे आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासी व वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारच्या ई-पासची गरज नाही. काही राज्ये व जिल्हे प्रवासी वाहतुकीसाठी बंधने घालत आहेत. अशी बंधने घालणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही बंधने तात्काळ हटविण्यात यावीत, असे केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या गृह सचिवांना स्पष्ट केले आहे.
देशव्यापी नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी बसले आहेत. त्यांना गोवा परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने त्यांच्या राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला स्वॅब टेस्ट बंधनकारक केली आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील परीक्षार्थी अडचणीत आले होते. स्वॅब टेस्टचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्यांना सोसावा लागू नये यासाठी विद्यार्थ्यांना स्वॅब टेस्टमधून सूट द्यावी किंवा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीट परीक्षेचे केंद्र द्यावे, अशी मागणी श्री. सामंत यांनीही केली होती.