कणकवली : केवळ इंटरनेट कनेक्शन नसल्याने डोंगरावर जाऊन अभ्यास करणाऱ्या स्वप्नाली सुतार (दारिस्ते, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) या विद्यार्थिनीचा वनवास संपला आहे. सह्याद्री वाहिनीवरून प्रसिद्ध झालेल्या स्वप्नालीच्या बातमीची दखल प्रधानमंत्री कार्यालयाने त्वरित घेतली आणि भारत नेट प्रकल्पांतर्गत स्वप्नालीच्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसांत इंटरनेट कनेक्शन जोडण्यात आले आहे.
मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर अडथळे फारच क्षुल्लक ठरतात. संकटावर मात करीत आपले ध्येय गाठण्याची महत्त्वाकांक्षा इतिहास घडवून जाते. दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार हिने ती जिद्द मनात बाळगली होती. ती दिवा (ठाणे) येथे राहते आणि गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षांत शिकत आहे. मुंबईत रोजच्या प्रवासात तिचे पाच तास जातात. वसतिगृहाचे शुल्क ५० हजार रुपये आहे. तो आवाक्याबाहेर असल्याने दिवा येथे राहावे लागते. पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण करून अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न आहे. ते बाळगून अभ्यास करत असतानाच ती गेल्या मार्च महिन्यात होळीच्या निमित्ताने गावी आली, पण करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमध्ये अडकली. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेता येते का, याचा विचार तिने सुरू केला. मात्र गावात रेंज नसल्याने साधा फोन लागणेही कठीण होते. तेथे इंटरनेट मिळण्याची शक्यताच नव्हती. पण ध्येयाने पछाडलेल्या स्वप्नालीने भावाचा मोबाइल घेऊन रानावनात फिरून इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा शोध सुरू केला. घरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात तिला इंटरनेटचे पुरेसे सिग्नल मिळू लागले. सुरुवातीचे १५-२० दिवस तिने पावसात छत्री पकडून उभी राहून लेक्चरला हजेरी लावली. त्यानंतर घरच्यांनी तिला मदत केली. तिच्या माझ्या भावांनी डोंगरावर तिला एक छोटीशी झोपडी बांधून दिली. त्याच झोपडीत तिने अभ्यासाला सुरुवात केली. भर पावसात फक्त एका झोपडीच्या आडोशाला तिने कॉलेजच्या ऑनलाइन क्लासला हजेरी लावली. तेथे सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अभ्यास, त्यानंतर ऑनलाइन लेक्चर आणि सायंकाली ६ वाजेपर्यंत प्रॅक्टिकल असा दिवसभराचा तिचा कार्यक्रम होता.
तिच्या या जिद्दीची बातमी स्थानिक वृत्तपत्रे तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झाली. त्यानंतर अनेकांनी तिला मदतीचा हात पुढे केला. दूरदर्शनच्या बातमीची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सीएससी ई-गव्हर्नन्सचे सीईओ डॉ. दिनेश त्यागी, राज्य समन्वयक वैभव देशपांडे, कोकण विभागीय समन्वयक सुयोग्य दीक्षित यांच्या प्रतिसाद आणि प्रयत्नामुळे स्वप्नालीची समस्या दूर झाली. भारतनेटची टीम दुर्गम अशा दारिस्ते गावात ग्राममपंचायतीमध्ये पोहोचली. तेथे इंटरनेट सुरू करण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी स्वप्नालीच्या घरापर्यंत ओएफसी केबल टाकून स्वप्नालीच्या घरी इंटरनेट सुरू करून देण्यात आले. ‘आम्ही कणकवलीकर’ ग्रुपने दिलेल्या लॅपटॉपवर आणि उमेद फाउंडेशनने दिलेल्या मोबाइलवर स्वप्नालीने लगेच ऑनलाइन अभ्यास सुरूदेखील केला आहे. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे तिचा अभ्यासाचा वनवास संपला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींपैकी ३६१ ग्रामपंचायती इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या फेज वनमध्ये समाविष्ट आहेत. टप्प्याटप्प्यान या सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडून सर्वांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारतातील ग्रामीण भागसुद्धा अशा प्रकारे जगाशी जोडला जाणार आहे.
दुर्गम गावात राहून स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून रानावनात अभ्यास करणाऱ्या स्वप्नालीच्या प्रयत्नांना सामाजिक संस्थांनी आमदार नीतेश राणे यांनीही मदतीचा हात दिला. आम्ही कणकवलीकर ग्रुपने तिला अभ्यासासाठी लॅपटॉप आहे, तर उमेद फाउंडेशनने अद्ययावत मोबाइल तिला भेट म्हणून दिला आहे. कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांनीही तिच्या जिद्दीची दखल घेतली. तिला शिक्षणासाठी श्री. राणे यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांनी केली आहे. ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा केली आहे. त्याचप्रमाणे यापुढे शिक्षण पूर्ण होईपर्यंत जी मदत लागेल, ती करण्याचे आश्वासन श्री. राणे यांनी दिले आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने तिच्या शिक्षणाची होणारी परवड आता थांबणार आहे. कारण सध्या ती आपल्या गावीच ऑनलाइन शिक्षण घेत असली, तरी आता यापुढे तिला मुंबईतच हॉस्टेलवर राहूनही शिकता येणार आहे.