महाड इमारत दुर्घटनेत दोन ठार, ६० जण सुखरूप; २६ जण अद्याप ढिगाऱ्याखाली

महाड : महाड (जि. रायगड) येथील तारीक गार्डन ही पाचमजली इमारत काल (ता. २४) कोसळली. केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघे ठार, तर आठ जण जखमी झाले. इमारतीतील ६० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, आणखी २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

इमारत कोसळल्याचा धक्का बसल्याने शेजारच्या इमारतीतील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात मृत्यू झाला, तर इमारतीतील एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, इमारतीचे बिल्डर,आर्किटेक्ट यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफने तेथे बचावकार्य सुरू केले आहे. श्वानपथक आणि लाइफ डिटेक्टर्सचा वापरही या बचावकार्यात केला जात आहे.

दुर्घटनेतील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे, ढिगाऱ्याखाली आणखी किमान २६ जण अडकले असल्याची भीती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केली आहे. काल रात्रीच एनडीआरएफची तीन पथके पुण्याहून घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्यासाठी ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला होता. त्यांनी बचावकार्य सुरू केले असले तरी सातत्याने पावसाच्या सरी येत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल घटनास्थळास भेट दिली. इमारतीचे बिल्डर आणि आर्किटेक्ट, तसेच ज्यांनी इमारतीस परवानगी दिली, त्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

तारीक गार्डन इमारतीत ४१ फ्लॅट होते. त्यातील १८ रिकामे होते. कोसळलेल्या इमारत दुर्घटनेच्या मदत आणि बचावकार्यात अडथळे येत असले तरी बचावकार्य सुरूच ठेवण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतून बचावकार्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. इमारतीतून आठ जणांना सुख़रूप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी महाड शहरातील सर्व खासगी रुग्णालये सज्ज करण्यात आली आहेत.

निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच तारीक गार्डन ही इमारत कोसळली असल्याने इमारत दुर्घटनेस जबाबदार असलेले बिल्डर, आर्किटेक्ट आणि त्यांना परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

श्री. शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या समवेतच दुर्घटनास्थळास भेट देऊन मदत आणि बचावकार्याची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दुर्घटनेतील मृत आणि जखमी व्यक्तींना योग्य ती मदत देण्याचे आश्‍वासन श्री. शिंदे यांनी दिले. फारूक काझी आणि युनूस शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांपैकी दोघांची नावे आहेत. त्यापैकी बिल्डर फारूक काझी फरार झाल्याचे समजते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply