पडद्यामागील कलाकारांच्या पाठीवर एक हात आपुलकीचा, विश्वासाचा

मुंबई : करोनाच्या संकटाने अडचणीत आलेल्या नाट्यक्षेत्रातील पडद्यामागच्या कलाकारांना मराठी नाटक समूहाने ३९ लाख ३७ हजार ५०० रुपयांच्या मदतीचे वाटप केले. अभिषेक मराठे यांनी सहा वर्षांपूर्वी समूह तयार केला असून त्यामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी पडद्यामागच्या कलाकारांना दरमहा अल्प तरीही मोलाची मदत देण्यात आली.

या उपक्रमाविषयी मराठी नाटक समूहाचे सदस्य अभिनेते प्रशांत दामले आणि श्री. मराठे यांनी सांगितले की, करोनाच्या संकटाने मार्च महिन्यापासून नाट्यव्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. आता सप्टेंबर महिना संपत आला तरी नाट्यगृहे अजून उघडलेली नाहीत. ती कधी उघडतील याची शाश्वती नाही. गेले ६ महिने नाट्य व्यवसायावर उपजीविका असणाऱ्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देण्याचे मराठी नाटक समूहाने एक आठवड्यात निर्णय घेऊन एक हात आपुलकीचा, विश्वासाचा आपल्या माणसांना सावरण्याचा या उपक्रमाला सुरुवात केली. मदत निधीसाठी सर्व थरातून आवाहन केले गेले आणि समूहाच्या विश्वासार्हतेवर रसिक प्रेक्षक, रंगकर्मींनी देश-विदेशांतून मदत दिली.

सुरुवातीला साधारण १-२ महिने हे कार्य करावे लागेल, असे वाटले होते, पण करोनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे नाट्य व्यवसाय अनिश्चित काळासाठी बंद आहे. या व्यवसायावरच उपजीविका असणारे पडद्यामागील कलाकारदेखील आता हळूहळू रोजगाराचा अन्य पर्याय शोधत आहेत. पण या परिस्थितीतून सावरणे कठीणच झाले आहे.. त्यामुळे किमान नाट्य व्यवसाय पूर्ववत सुरू होईपर्यंत पडद्यामागच्या घटकाला सावरण्याचा प्रयत्न खील सुरू आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पाचव्या टप्प्यात पडद्यामागील ३४१ कलावंतांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचे आर्थिक साह्य त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली. अडीच हजार ही भरघोस मदत नसली, तरी अडचणीच्या काळात कलाकारांच्या किमान गरजा भागवण्यासाठी त्या मदतीचा उपयोग होऊ शकतो, या दृष्टीने ही रक्कम महत्त्वाची आहे. या महिन्यातही मदत मिळणार का, असे संदेश येतात, तेव्हा ते जाणवते. गेले पाच महिने हे आर्थिक सहाय्य पडद्यामागील कलाकारांना देण्यात आले. या महिन्यात नेपथ्य कामगार, साहित्य विभाग, ध्वनिव्यवस्था, व्यवस्थापक, रंगभूषा, केशभूषा, प्रकाशयोजना, द्वारपाल, कपडेपट, उपाहारगृह कर्मचारी, चालक, बुकिंग क्लार्क, जाहिरात विभाग अशा विविध ३४१ जणांना ८ लाख ५२ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात आले. यापूर्वी मे महिन्यात २७५ कलाकारांना ६ लाख ८७ हजार ५०० रुपये, जूनमध्ये ३१७ जणांना ७ लाख ९२ हजार ५०० रुपये, जुलैमध्ये ३१८ जणांना ७ लाख ९५ हजार रुपये, तर गेल्या महिन्यात ३२४ जणांना ८ लाख १० हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत ३९ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे, अशी माहिती श्री. दामले आणि श्री. मराठे यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply