रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळेआधी किमान एक तास स्थानकात उपस्थित राहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशाची गाडीत प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.
कोकण रेल्वेमार्गावर येत्या २६ सप्टेंबरपासून तुतारी एक्स्प्रेस, तर २ ऑक्टोबरपासून राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची गाडीत चढण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासून मगच प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या निर्धारित तापमानापेक्षा अधिक तापमान आढळल्यास त्या व्यक्तीला प्रवास करता येणार नाही. प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रवाशांनी किमान एक तास आधी रेल्वेस्थानकात उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. स्थानकाच्या परिसरात वावरताना प्रवाशांनी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून वावरायचे आहे. आयत्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सूचना महत्त्वाची आहे. तपासणी पूर्ण झाल्यावरच त्यांना गाडीत प्रवेश मिळणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून ही पावले कोकण रेल्वेकडून उचलली जात आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.