भावरम्य श्री क्षेत्र माणगाव

१९९१ साली सत्त्वश्री प्रकाशनतर्फे (अर्थात आताचे कोकण मीडिया) प्रमोद कोनकर आणि अशोक प्रभू यांनी संपूर्ण कोकणात फिरून कोकण पर्यटन मार्गदर्शक नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले होते. कोकणातल्या पर्यटनाविषयीचे ते बहुधा पहिलेच पुस्तक असावे. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद तर लाभलाच; पण शासनाचा अष्टगंध पुरस्कारही त्याला मिळाला. या पुस्तकात माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील आ. द. राणे गुरुजी यांनी माणगावची माहिती देणारा एक लेख लिहिला होता. काळानुसार माणगावमध्ये बरेच बदल झाले असले, तरी साहजिकच मूळ गोष्टींमध्ये बदल झालेला नाही. माणगावची ओळख या लेखातून होऊ शकेल.
…………..
सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन
– माधव केशव काटदरे
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग म्हणजेच नवनिर्मित सिंधुदुर्ग जिल्हा हा रसिक मनाला भूल पाडणारा आणि कवी माधव यांच्या हिरवे तळकोकण या चित्रमयी कवितेतील वरील पंक्तींची प्रचिती देणारा निसर्गाचा देखणा आविष्कार आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिचम कोपऱ्यात अरबी सागराशी लडिवाळ नाते जपणारा आणि पूर्व बाजूला असलेल्या सह्यगिरीच्या निर्धास्त आधारावर विसावणारा हा इटुकला पिटुकला जिल्हा म्हणजे निसर्गदेवतेला पडलेले एक भावस्वप्न वाटते.
याच जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माणगाव हे कुडाळ तालुका स्थानापासून पंधरा किलोमीटर आणि सावंतवाडी येथून बारा किलोमीटर अंतरावर आकेरी-दुकानवाड या जिल्हा प्रमुख मार्गावरील एक रमणीय गाव आहे. पर्यटकांनी प्रेमात पडावे असे या गावाचे विलोभस व्यक्तित्व आहे.

आकेरी, हुमरस, साळगाव, नानेली, आंबेरी आणि कालेली या गावांचा शेजारधर्म सांभाळून वसलेला हा माणगाव क्षेत्रफळाने चांगला १९५२ हेक्टलर ऐसपैस आहे. गावाच्या दक्षिणेस वनखात्याचे राखीव जंगल असल्याने डोळ्यांना शीतल दर्शन देणारा हरित घनराशी डोंगर गुबगुबीत वाटतो. त्या डोंगरात वनचरांची मनसोक्त वर्दळ चालू असते. अधूनमधून वाघोबाचा संचार झाला, की वानरांच्या चीत्काराने जंगल टवकारून उठते आणि खाली गावात त्याचा डंका व्हायला उशीर लागत नाही.
…गावाच्या वेशीवरून वाहणारी निर्मला नदी लगतच्या वस्तीला वरदायिनी ठरलेली आहे. एकेरी आणि सहकारी तत्त्वावर रब्बी, तसेच उन्हाळी हंगामात पूरक उत्पादने काढणारे येथील कृषीकजीवन उभारी वाढवणारे आहे. सुधारित शेती प्रयोगाचे येथील शेतकरी स्वागत करण्यास उत्सुक असतो. फलोद्यान विकासातही अलीकडे त्याने लक्ष घातले आहे. कोकणातील सर्व नैसर्गिक फळप्रकार येथे हंगामाप्रमाणे स्वागतास मौजूद असतात!

डोंगरावरून अथवा उंच टेकडीवरून खाली दृष्टीपथात येणारी सपाटीवरची विखुरलेली गाववस्ती… तिला शोभा देणारी केळी-नारळींची आटोपशीर हिरवी सोबत… फुलवेड्या मनाने फुलविलेली समोरची छोटीशी रेखीव बाग, भोवताली भातमळ्यातील छोटेमोठे कुणगे… भाजीपाल्याची परडी-परसू… जवळच लाट असलेली शेतविहीर… ओलाव्याच्या आधाराने चरणारी गुरेवासरे… मधोमध जाणाऱ्या काळ्या तुकतुकीत रस्त्यावरून वेगात धावणारी वाहने… जाळीझुडपांना घसटून दुडूदुडू धावणारा कुणा झोरू धनगराचा शेरडांचा कळप… समोर भटवाडीच्या उशास असलेल्या ‘गिरोबा’वरची लक्ष वेधून घेणारी सुमारे ६० फुटांपेक्षा अधिक उंच असलेली ‘सुळागुंडा’ नावाने परिचित असलेली भव्यतम डोंगरशिळा (सर्वांत वरील फोटो), ग्रामदेवता श्री यक्षिणी आणि अनेकांचे आराध्यदैवत असलेले श्री दत्तगुरू यांच्यासह गावातील इतर मंदिरे आणि समाज श्रद्धास्थाने, त्याचप्रमाणे हमरस्त्यावर असलेले ख्रिस्ती बांधवांचे प्रशस्त आणि आकर्षक प्रार्थनामंदिर… अशा अनेक प्रेक्षणीय गोष्टींनी माणगाव मनात शिरून राहतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अनेक चांगल्या परंपरांचे पैलू आहेत. त्यात आध्यात्मिक परंपरेचा पैलू वर्षानुवर्षे आपल्या दिव्य तेजाने झळाळत राहिला आहे. या जिल्ह्यात सुदैवाने अनेक ख्यातकीर्त सत्पुरुषांची मालिका निर्माण झाली. तिच्यातील माणगावचे साक्षात्कारी दत्तस्वरूप श्रीमत्‌ परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचा महिमा सर्वत्र सर्वमान्य आहे. याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या पदस्पर्शाने माणगाव कृतार्थ होऊन राहिले! भगवान श्री दत्तभूंनी टेंब्ये कुळी अवतार घेतला!

नरसोबावाडी येथे श्री नृसिंह सरस्वती दत्तमहाराजांच्या उपासनेत श्री वासुदेव देहभान विसरून जात. तेथे त्यांनी उग्र अनुष्ठान करून श्री दत्तप्रभूंना आपलेसे केले. ते कोल्हापूरमार्गे माणगावी येत असताना तिकडे कागलच्या एका मूर्तिकाराला दृष्टांत मिळाल्याप्रमाणे त्याने श्री वासुदेव यांना सात बोटे उंच द्विभुज, वराभयकर सिद्धहस्त घातलेली, पितळी ओतीव दत्तमूर्ती दिली. ती घेऊन माणगावात स्थापना करण्यासाठी श्री स्वामी आले. गावभर ही सुवार्ता वाऱ्यासारखी पसरली… सर्वांच्या मदतीतून केवळ सात दिवसांत श्री दत्त मंदिर पूर्ण झाले! देवळासमोरची विहीर तर तीन दिवसांत पूर्णत्वास गेली आणि मिती वैशाख शुक्ले पंचमी शके १८०५ या शुभदिनी श्री दत्तमूर्तीची मंदिरात यथाविधी स्थापना करण्यात आली.

आज जे भाविकांना दत्तमंदिराचे सुधारित स्वरूप दिसते, ते इंदूरच्या महाराणी श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी १९३८मध्ये केलेले नूतनीकरण आहे. श्री टेंब्ये स्वामींच्या जन्मस्थानाचेही त्याचवेळी नूतनीकरण करण्यात आले आहे. (ताजी नोंद : या दोन्ही मंदिरांचे गेल्या काही वर्षांत पुन्हा नूतनीकरण झाले आहे.)

श्री यक्षिणी मंदिर

ग्राममाता श्री यक्षिणी मंदिरात दृष्टी खिळवून ठेवणारे लाकडी शिल्पकाम पाहणाऱ्यास समाधान देते. श्री महादेव, श्री सातेरी आणि पू. नांदोडकर स्वामींचे समाधीमंदिर ही देऊळवाडीतील श्रद्धास्थाने भाविकांना दिलासा देतात. भाविकांची वाढती रीघ लक्षात घेता श्री दत्तमंदिर परिसरात निवासस्थात भाविक निवासस्थान बांधकामासाठी इंदूर येथील श्रीमती वाराणसीबाई चिटणीस यांनी विश्वतस्तांकडे एक लाख रुपये त्या संकल्पासाठी दिले.

मंदिराच्या दक्षिणेस लगत असलेल्या जांभळीची आड या डोंगरातील एका वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक शीलारचनाठायी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी ध्यानधारणा करीत असत. अलीकडे उत्सव कालात या तपोस्थानी श्री सत्यदत्ताची पूजा बांधण्यात येते. कष्टसाध्य असले तरी भाविक मन भारणारे असे हे प्रेक्षणीय स्थान आहे. पुण्याचे कै. वामनराव गुळवणी महाराज हे प. प. टेंब्ये स्वामींचे शिष्य. त्यांचे अनुग्रही आणि शिष्य पूज्य श्री केशवराव जोशी तथा श्री केशवानंद महाराज, पुणे यांनी दत्तमंदिराच्या पाठीमागील बाजूस एक सिद्धयोग आश्रम स्थापन केला आहे. हे स्थानसुद्धा श्रद्धा आणि सौंदर्याचा आविष्कार घडविणारे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रंगून समजले जाणारे माणगाव खोरे हे भातशेती उत्पादनात अग्रेसर असते. म्हणून मालवणी बोलीत त्याचा खास गौरव आहे. तो असा –

माणगाव-साळगाव भाताचे गाव… आकेरी कुणकेरी न्हेरयेक खाव!

माणगाव-साळगाव हे भात उत्पादनात मोठाले गाव. त्या तुलनेत आकेरी-कुणकेरी न्याहारीची तरतूद करणारे छोट्या आबादानीचे गाव… तरीही सारे गाव भातक्षेत्राची मिजास वागवणारेच!

देऊळवाडी येथे राज्यशासनाच्या सुधारित भातबियाणे केंद्राचे विस्तीर्ण प्रयोगक्षेत्र कार्यान्वित आहे. प्रेक्षणीय कृषिक्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे अंगुलीनिर्देश करता येतो.

डॉ. बाबासाहेब लेले स्मारक समितीचा डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प हे आजच्या युवाशक्तीला प्रेरणा आणि स्थैर्य देणारे व अल्पावधीत परिवर्तनशील चमत्काराने लक्ष वेधून घेणारे माणगावातील जिल्हाभूषण आहे.

येथून जवळ असणारे आकेरीचे श्री रामेश्व्र देवालय एकदा पाहून यावे असे आहे. काळेशार पाषाणात कोरलेले एकसंघ भव्य स्तंभ, दृष्टी संभ्रम निर्माण करणारी अखंड पाषाणाची पॉलिश केल्यासारखी तुकतुकीत चौपाई, महाशिवरात्र उत्सवाचा भव्य लाकडी रथ… अन्य देवीदेवतांचा परिवार आणि प्रशस्त आवार असा तेथे ऐसपैस कारभार आहे. आकेरीत जाताना माणगावच्या सीमेवर सुंदरभाटले येथील गंगोत्री आणि थोडेसे पुढे गेले की उजव्या बाजूला गायमुखातून बारमाही एकाच लयीत वाहणारा जलस्रोत ही नैसर्गिक अद्भुत स्थाने पाहून विस्मय वाटतो! झारापच्या प्रचंड शिळांची रचनात्मक ठेवणही अशीच लक्षवेधक आहे.

पूर्वेकडे जाताना दहा ते बारा किलोमीटर अंतरावर निळेली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेले शासकीय पशुपैदास केंद्र आणि जवळ असलेली आदर्श फळबाग… त्यापुढे चाफेली येथील वनखात्याच्या अखत्यारीतील रोपवाटिका पाहताना नवानुभूतीचा प्रत्यय येतो. येथून मग सह्याद्रीचे वळून दर्शन होते. दरम्यान टाळंबा प्रकल्पाची प्राथमिक स्थिती पाहून थेट पुढे शिवापूरलगतचे मनोहर-मनसंतोषगड आणि परतताना उजवीकडे नारूर येथील ऐतिहासिक रांगणा ऊर्फ प्रबळगड हे शिवकालीन साक्षीदार पर्यटकांना वेळात वेळ काढून इतिहासातील रोमहर्षक हितगुज करण्यासाठी खुणावत असतात.

लागेबांधे असणारी आणखी अशी अनेक स्थळे नवागताचा आनंद वढविणारी आहेत.

आणि येथील माणसे माणसाची कदर करणारी आहेत. आदरातिथ्यात तुष्टता देणारी आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, नवबौद्ध आणि जैन धर्मांसह अनेक जातींचे संकुल या गावात गोकुळासारखे नांदत आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा हा अकृत्रिम वस्तुपाठ येथे पिढ्यानपिढ्या चालत आहे. येथील गावकऱ्यांशी तुमचा सूर जुळला, की एका गजालीतून दुसरी गजाल ढुशी मारून बैठकीत रंग भरते आणि अनौपचारिक नाते निर्माण होऊन सहजपणाने माणगावची सुंदर प्रतिमा मनःपटलावर उमटून राहते!

रूप देखणे या गावाचे, माणगाव भूषण नावाचे!
भूल पडावी असे चित्र हे… या भूलोकीचे

एकदा आलेल्याला पुन्हा पुन्हा यावेसे वाटायला लावणारा असा हा लाघवी गाव!

  • आ. द. राणे
    (आ. द. राणे गुरुजींविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply