
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा आठवा लेख… आ. द. राणे गुरुजी यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे श्रद्धा वाळके यांनी…
………
जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे…
आतले आनंदगाणे गायचे आहे…
अरुण दाते यांनी गायलेलं हे भावगीत मला अतिशय आवडतं! या गाण्यातले आनंदयात्री मला खूप ओळखीचे वाटतात, नव्हे मला आठवत नाही तेव्हापासून मी त्यांना ओळखते आहे! ते म्हणजे आदरणीय आ. द. राणे गुरुजी. त्यांच्या अर्धांगिनी म्हणजेच ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या भगिनी कै. सौ. राणेबाईंनी म्हटलेलं, ‘आल्यापाल्याची भाजी रे मौल्या….’ हे बालगीत म्हणजे मी ऐकलेली पहिली कविता! बाईंमुळेच राणे परिवाराशी आमचा स्नेह माझ्या जन्माच्या अगोदरपासूनचा आहे. राणेबाई म्हणजे माझ्या आजीची जिवाभावाची मैत्रीण. त्यांच्यामुळे अगदी लहानपणापासूनच राणे गुरुजींविषयीची साहित्यिक चर्चा एक श्रोता म्हणून मी ऐकत आले आहे. त्यामुळे सिंधुसाहित्यसरिता मालिका जाहीर झाल्याबरोबर गुरुजींविषयी मला माहीत असलेलं लिहावं अशी अनिवार इच्छा झाली.
आकाराम दत्तात्रेय राणे असे त्यांचे पूर्ण नाव; पण ते आ. द. राणे म्हणूनच प्रसिद्ध होते. राणे गुरुजी म्हणजे कविमनाचा माणूस! त्यांनी आयुष्यात आनंदाच्या क्षणांची वाट पाहिली नाही, प्रत्येक क्षण आनंदी केला! प्रत्येक प्रसंगात त्यांनी काव्य शोधलं, काव्य लिहिलं. मला आठवतं, बाई बदली होऊन गेल्या तरी कित्येक वर्षं आमच्या ‘वाडोस नंबर एक’ शाळेत गुरुजींनी लिहिलेली ईशस्तवने, स्वागतगीते आम्ही म्हटलेली आहेत. कुणाचं कौतुक करावं ते तर ते राणे गुरुजींनीच! त्यांनी केलेल्या कौतुकरूपी काव्यफुलांच्या वर्षावाने यशाचा आनंद शतगुणित व्हायचा. अशाच आठवणी ठाकूर गुरुजी, करंदीकर मॅडम यांसारख्या आदरणीय व्यक्तींच्या तोंडून ऐकताना फार छान वाटतं. त्यांनी त्यांच्या मुलांच्या, नातवंडांच्या आयुष्यातील सोनेरी क्षणांना आपल्या कवितांनी सुंदर सुगंधित केल्याची आठवण वृंदाताई (त्यांची मुलगी) आवर्जून सांगते.
‘विरंगुळा’ हा गुरुजींचा प्रकाशित झालेला पहिला बालगीतसंग्रह! तो त्यांनी आपल्या चारही मुलांना अर्पण केला. त्याला शिरीष पै, अनंत काणेकर, दादासाहेब रेगे यांसारख्या साहित्यातील महनीय व्यक्तींनी अभिप्राय दिले आहेत. त्यातील मयुराचा सत्कार, पावसातील मज्जा, प्रियतमा भारत देशा, जीवनाला हे असे वळण असावे अशा कविता बालगोपाळांना निखळ आनंदाबरोबर ज्ञान आणि वळणही देतात.
गुरुजींच्या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गेयता! त्यांच्या कवितांचं स्वरमाधुर्य त्यांच्यातल्या संगीतकाराशी आपली ओळख करून देतं. गुरुजी उत्तम हार्मोनियम आणि बुलबुल वादक होते आणि त्याचबरोबर उत्तम गायकही होते. सावंतवाडीत कोजागरी पौर्णिमेला होणाऱ्या काव्यसंमेलनात त्यांच्या स्वरचित कवितागायनाचा पहिला मान असायचा.
गुरुजी माणगावात (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) बदलीने आले आणि इथलेच होऊन राहिले. प्रत्यक्ष दत्तगुरूंचे पाय ज्या भूमीला लागले, त्या भूमीशी त्यांनी जन्माचे नाते जोडले. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, माणगावी जो आला… तो रमला!!!
(माणगावाविषयी आ. द. राणे गुरुजींनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
परमपूज्य दीनदास नांदोडकर स्वामींनी दत्तमंदिरात दत्तयागाचा प्रारंभ केला, तेव्हा गुरुजींना त्यांनी काव्यलेखनाची आज्ञा केली. आणि सात कडव्यांची कविता एका रात्रीत अवतरली.
दर्शन घ्या दत्तांचे।
पावन अवघे माणग्राम… निजधाम भाविकांचे।।
त्यासाठी स्वतः परमपूज्य नांदोडकर स्वामींनी त्यांचे लेखी स्वरूपात कौतुक केले आहे. त्यांच्या कवितेच्या या आध्यात्मिक रूपाचा मला एक माणगाववासीय म्हणून नितांत आदर आहे.
त्यांनी पत्रकारिताही केली. (बेळगाव) ‘तरुण भारत’चे तेव्हाचे वृत्तसंपादक ग. गो. राजाध्यक्ष यांच्या आग्रहामुळे त्यांनी ‘तरुण भारत’मध्ये ‘प्रतिबिंब’ हे सदर सुरू केले. आजूबाजूच्या गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी या सदरात सहजसुंदर शब्दांत रेखाटलं. त्यांच्या बोटांतली चित्रकला त्यांच्या शब्दांच्या अंगात भिनली नसेल तरच नवलच! हे सदर कित्येक वर्षं अविरत सुरू होतं. या लेखांचा एकत्रित संग्रह ‘रुजवा’ या नावाने १९९४ला केशवसुत स्मारकात प्रकाशित झाला. तो त्यांनी परमपूज्य टेंबेस्वामींना अर्पण केला. या संग्रहासाठी विंदा करंदीकर यांच्या हस्ते अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार स्वीकारण्याचं भाग्यही त्यांना लाभलं. गुरुजींनी तरुण भारतसह वैनतेय, सत्यप्रकाश, नवशिक्षण, व्याध इत्यादी नियतकालिकांमध्ये एवढं चतुरस्र लेखन केलं आहे, की त्याची गणतीच होऊ शकत नाही.

राणे गुरुजी प्राथमिक शिक्षक म्हणूनही झोकून देऊन काम करायचे. साने गुरुजी कथामाला माणगाव दशक्रोशीत अगदी रांगणागडाच्या पायथ्यापर्यंत रुजविण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. केवळ शाळकरी मुलंच नव्हे, तर प्रौढ शिक्षण वर्गातल्या प्रौढ विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं. नवसाक्षरांची साक्षरता टिकून रहावी, त्यांना नवनवीन माहिती मिळत राहावी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी गुरुजींनी लिहिलेलं ‘गोवळचा देवमाणूस’ हे पुस्तक औरंगाबादच्या महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्थेने प्रकाशित केलं. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना आधी जिल्हा पातळीवरील आणि नंतर राज्य पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाबद्दल लिहायला माझी लेखणी फारच तोकडी आहे. तरीही त्यांना आदरांजली वाहण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न! एका थोर साहित्यिकाला मी फार जवळून पाहिलं आहे, ही भावना या क्षणाला मला प्रफुल्लित करते आहे.
– श्रद्धा सतीश वाळके (रेश्मा बाबुराव आगलावे)
(प्राथमिक शिक्षिका)
पत्ता : मु. पो. मसदे विरण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०८
मोबाइल : ९४०४७ ७६६३३
ई-मेल : shraddhawalke80@gmail.com
………..
(माणगावाविषयी आ. द. राणे गुरुजींनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
………
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

