कुवारबाव नळपाणी योजनेसाठी उपोषणाचा इशारा

रत्नागिरी : कुवारबाव नळपाणी योजना आणि सौर ऊर्जा योजनेसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला असून, त्याबाबतचे निवेदनजिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.

तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गेल्या वर्षी १५ जुलै रोजी कुवारबाव नळपाणी योजना आणि सौर ऊर्जा योजनेसाठी जिल्हा नियोजनातून ३० लाखाचा निधी मंजूर केला. ही योजना अमलात आल्यानंतर गावाच्या विजेच्या बिलामध्ये महिना एक लाख रुपये बचत होणार असून, त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासूनची एमआयडीसीची सुमारे २० लाखांची थकीत पाणीपट्टी कमी व्हायला मदत होणार आहे. पाणीपट्टी थकल्याने एमआयडीसीने कुवारबावचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

अशा स्थितीत योजना मंजूर होऊन एका वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला असून, तसेच परिपूर्ण प्रस्तावानंतर ३० लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करूनही पुढील प्रक्रिया सुरू झाली नाही. त्याबाबत चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे गावचे नुकसान होत असून पाणीपुरवठा बंद झाला, तर मोठी गंभीर समस्या निर्माण होणार आहे. योजना मंजूर असल्यामुळे ग्रामपंचायतीला स्वानिधीतूनही ही योजना राबवता येत नसल्याने ती नियोजनानुसार सुरू करावी. अन्यथा ग्रामस्थ उपोषणाचे आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर गावातील सुमारे ५५० कुटुंबप्रमुखांच्या सह्या आहेत. ग्रामस्थांच्या वतीने सतेज नलावडे, मारुती आंब्रे, गोपीचंद पाटोळे, दीपक आपटे, दादा आयरे यांनी हे निवेदन सादर केले.

निवेदनाच्या प्रती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि मनसेच्या तालुकाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply