पु. ल. देशपांडे… सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव… आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे.
गुगल डूडलच्या वेबसाइटवर ‘पुलं’चं संक्षिप्त चरित्र, तसंच चित्रकार समीर कुलावूर यांच्या हे डूडल तयार करण्यामागच्या भावना आणि विचार देण्यात आले आहेत. ‘मुंबई-महाराष्ट्रात जन्मलो आणि वाढलो असल्याने साहित्य, गीत-संगीत, नाटक अशा विविध क्षेत्रांत लोकप्रिय व्यक्ती म्हणून पुलंचं नाव आपल्यासमोर येतच राहतं. जीवनाकडे बारकाईने पाहण्याची दृष्टी हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या लेखनातूनही स्पष्ट दिसतं. ‘नाच रे मोरा’ हे त्यांचं गाणं खूप लोकप्रिय आहे आणि अर्थातच शाळेत असतानाच ते आमच्यासमोर आलं होतं. आश्चर्य म्हणजे त्या गाण्याला ‘पुलं’नी संगीत दिलं आहे हे मला फार उशिरा कळलं,’ असं कुलावूर यांनी म्हटलं आहे.
‘पुलं हे बहुआयामी, बहुपैलू आणि उत्तुंग असं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे या विषयावर काम करायला मिळणं हा सन्मानच आहे. या डूडलसाठी ‘नाच रे मोरा’ या गाण्यातून थोडी प्रेरणा घेतली आहे आणि त्यांचं सप्तरंगी व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पुलं’चं जीवन आणि त्यांचं कार्य हाच एक मोठा संदेश आहे. एकच व्यक्ती सर्जनाचे विविध आविष्कार कसे करू शकते, हे मला या डूडलमधून विशेषत्वानं दाखवायचं आहे,’ असं कुलावूर यांनी सांगितलं.
(या डूडलबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

