आयुष्यभर रंगभूमी जगलेल्या रंगकर्मीची रंगभूमी दिनी एक्झिट

रत्नागिरी : पारावरच्या रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंत रंगभूषाकार आणि नेपथ्यकार म्हणून प्रवास केलेले रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी गणपत ऊर्फ दादा लोगडे (वय ६९) यांचे पाच नोव्हेंबर २०२० रोजी रंगभूमी दिनी रात्री निधन झाले. सोळाव्या राज्य नाट्य स्पर्धेपासून गेल्या वर्षीच्या ५९व्या राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत ते रंगभूमीवर कार्यरत होते.

दादा लोगडे शिवसैनिक होते. त्यांनी बसणी (ता. रत्नागिरी) गावचे सरपंचपद भूषविले. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतल्यानंतर दादा लोगडे यांनी व्यावसायिक नाटकात बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम सुरू केले. भाऊ रांगणेकर, बाबा पार्सेकर, कृष्णा जन्नूरकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांकडून नेपथ्यकला आणि कृष्णा बोरकरांकडून त्यांनी रंगभूषेची कला आत्मसात केली. मुंबईत सोबत तव प्रीतीची, कुटुंब, खोली पाहिजे, अमृत नव्हे विष, गारंबीचा बापू, नेक जात मराठा, आधे आधुरे, शिवकंकण, सीमेवरून परत जा या नाटकांमध्ये दादा लोगडे यांनी नेपथ्य आणि रंगभूषा साकारली. मुंबईतून रत्नागिरीत परतल्यानंतर त्यांनी हौशी रंगभूमीवर काम केले.

राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा, संगीत नाटक, एकांकिका स्पर्धांना दादा लोगडे नेपथ्यकार आणि रंगभूषाकार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरच्या ज्ञान आणि अनुभवाचा फायदा ते रत्नागिरीकरांना करून देत असत. राज्य नाट्य स्पर्धेत पाच वेळा त्यांनी नेपथ्याचे प्रथम पारितोषिक पटकावले होते. सोळाव्या राज्य नाट्य स्पर्धेपासून गेल्या वर्षीच्या ५९व्या राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत दादा लोगडे यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

त्यांना रंगभूमीचा प्रदीर्घ अनुभव होता. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही ते स्पर्धेत रंगभूषा आणि नेपथ्य करत होते. दिल्लीत होणाऱ्या संगीत नाटकांतही त्यांचा सहभाग असायचा. कोकणातील उत्सवाच्या नाटकांत ते हक्काचे रंगभूषाकार आणि नेपथ्यकार होते.

मुंबईतील नाट्यसंपदा आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे बाबा वर्दम स्मृती, तसेच कै. बाबुलनाथ कुरतडकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झाला होता. आचरेकर प्रतिष्ठाननेही त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला होता. रंगभूमी दिनीच त्यांनी एक्झिट घेतल्याने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. कै. लोगडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि दोन मुली असा परिवार आहे.
….

‘शेवटचा दिस गोड झाला!’
प्रत्येक माणसाची हीच इच्छा असते, की ‘रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना!’ पण ते प्रत्येकाला साध्य होतेच असे नाही. त्यासाठीची साधना, तपश्चर्या हातून घडावी लागते. दादा लोगडे यांना ती साध्य झाली होती. रंगभूमी दिनी त्यांना आलेल्या मरणामुळे त्याची साक्ष मिळाली.

आमचे सर्वांचे परमस्नेही, ज्येष्ठतम रंगकर्मी, रंगभूषाकार, नेपथ्यसम्राट, अजातशत्रू, नाटकांसाठी काहीपण! हा विचार गेली चाळीस वर्षे कोकणातील खेड्यापाड्यांत रुजविणारे, वादळवाऱ्यात उद्ध्वस्त झालेली रंगशाळा आणि नेपथ्य भांडार (फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊन) जिद्दीने उभी करण्याचा आत्मविश्वास बाळगणारे, गावासाठी सामाजिक काम करताना आपल्या अजातशत्रुत्वाच्या जोरावर सजग समाजाभिमुख नेता हे नाव सार्थ ठरवणारे, चतुरस्र बहुआयामी असे दादा लोगडे! आमचे दादा! रंगभूमी दिनी अचानक कफप्रकृती बळावल्याने जगतन्नियंत्याच्या डायरेक्शनवरून या विश्वाच्या रंगमंचावरून एक्झिट घेऊन गेले. विश्वकर्म्याच्या कार्यशाळेचे सर्वेसर्वा म्हणून ते स्वर्गदरबारी रुजू झाले. आता इंद्र, वरुण, विष्णू, ब्रह्मा आदी देवांचे महाल दादांच्या कल्पकतेतून सजणार!

पण आम्ही? आमचं काय? आमचा कोकणातला रंगमंच आता पोरका झाला! नाटक कोणतेही असो, दादांनी रंगमंच सजवताना कधीही व्यवसाय पाहिला नाही. बजेट हा शब्दच दादांच्या शब्दकोशात नव्हता. नाटक कुठच्याही गावी असो, वाडीवर असो, कसलीही नि कितीही अडचणीत तो रंगमंच असू दे, दादांनी त्याला सजवताना कधीच कंटाळा केला नाही, की कधी अडचणी सांगितल्या नाहीत. दादा कधीच अस्वस्थ, वैतागलेले, चिडलेले, काळजीत असलेले दिसले नाहीत. आता कसं होणार? हा प्रश्नच त्यांच्या कोशात नव्हता. उपलब्ध साहित्यातून रंगदेवतेचे रूपडे असे काही सजवायचे की मुंबईतल्या मोठ्या मोठ्या नाट्यगृहातील रंगमंचांनाही त्याचा हेवा वाटावा!

मुंबईहून रांगणेकरांकडून आल्यानंतर चाळीसहून अधिक वर्षे दादांनी कोकणच्या रंगभूमीच्या सेवेचे असिधाराव्रत जिवापाड सांभाळले. गावपातळीवर पक्षीय राजकारण सांभाळणाऱ्या दादांनी नाट्यसंस्थांतर्गत वादविवाद, त्यातले राजकारण स्वतःपासून कायमच दहा हात दूर ठेवले. कोकणातल्या अनेक, खरे तर सर्वच, संस्थांबरोबर दादांचे स्नेहबंध अतूट होते. राज्य नाट्य स्पर्धा, उत्कृष्ट नेपथ्यकार या बक्षिसांवर दादांचीच मालकी होती, हक्क होता. वहिवाटच म्हणा ना! पण म्हणून दादांच्या स्वभावाला अहंकार, मत्सर कधीच शिवला नाही. अगदी काल-परवा स्टेजवर उभा राहायला लागणाऱ्यालासुद्धा दादा ‘अहो’ असे आदराने पुकारत! आणि त्याच्यातला कलाकार भावला की तो थेट दादांच्या हृदयातच! कायमचा! दादांच्या संपर्कात जो जो आला तो दादांचा झाला आणि दादा त्याचे झाले!

दादांनी रंगमंचाची सेवा केली, म्हणण्यापेक्षा ती दादांची उपासना होती! तपश्चर्या होती आणि ती रंगभूमी दिनी सफल झाली. रंगभूमीवर अवघी हयात घालवणाऱ्या नटश्रेष्ठांना हवी हवी असणारी एक्झिट कायम बॅकस्टेज सांभाळणाऱ्या दादांच्या भाळी आली! कारण रंगदेवतेची निष्काम उपासना!

कवीश्रेष्ठ बाकीबाब (बा. भ. बोरकर) म्हणत
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सृजनतेचे सोहळे!

आज दादा आमच्यात नाहीत; पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती चिरंतन आमच्या हृदयस्थ राहतील. आमचे दादा हे कोकणचे शिरगोपीकर, मोहन वाघ, तळाशीलकर, बाबा वर्दमच होते, आहेत आणि कायम राहतील हे निःसंशय! आणि म्हणूनच आता नाटकाच्या अनाउन्समेंटमध्ये आमचे कान कायमच आसुसलेले राहतील… ‘आणि नेपथ्य… श्री. दादा लोगडे!’ हे ऐकायला.

दादांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!

  • प्रदीप तेंडुलकर, खल्वायन, रत्नागिरी

……
कलेसाठी जगलेला नाट्यकर्मी
चार वर्षांपूर्वी ‘मानापमान’ नाटकाच्या निमित्ताने, ज्येष्ठ रंगभूषाकार आणि नेपथ्यकार गणपत ऊर्फ दादा लोगडे यांच्याशी माझा परिचय झाला. अनेक वर्षे मुंबईत व्यावसायिक रंगभूमीशी जोडलेला हा माणूस, मायानगरी मुंबई सोडून रत्नागिरीत आला आणि रमला!

नाटक उत्सवाचे असो की स्पर्धेचे, पौराणिक असो की सामाजिक, दादा त्या नाटकासाठी अनुरूप नेपथ्य तयार करून देणारच! बजेट हा विषयच नाही! ‘तुम्ही प्रयोग जोरदार करा, माझ्या लोकांची मजुरी सुटली की झालं!’ कोणत्याही खेड्यापाड्यात, कितीही गैरसोय असली तरी नेपथ्य देखणं कसं होईल, यासाठी दादा झटले. नाट्यप्रयोग व्हायला, नाटक जगायला हवे यासाठी ते सतत धडपडले. एवढे करून कधीही त्रागा नाही, चिडचिड नाही.

कलाकारांचा मेकअप करताना, तिसरी घंटा झाल्यावर दादा सर्वांना शुभेच्छा देताना हसतमुख चेहऱ्याने म्हणायचे ‘फाइट, फाइट. होणार प्रयोग मस्त होणार.’

सतत फक्त प्रोत्साहन. दादा माझ्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठे, तरीही मी नाट्यदिग्दर्शक म्हणून त्यांनी मला सतत मानानेच वागवले. दुसऱ्यांचा दादांनी नेहमी फक्त आदरच केला.

गेल्या वर्षी अहमदनगरला ‘अखिल चित्पावन’च्या ‘संशयकल्लोळ’चा नाट्यप्रयोग होता. रात्री दोन वाजेपर्यंत दादांसह आम्ही सेट लावीत होतो. एका फ्लॅटवर गणपतीचे पेंटिंग असलेला फ्लॅट रत्नागिरीतच राहिला. मी दादांना जरासं चिडूनच म्हटलं, ‘दादा काय हे? मला इथे गणपती हवाच आहे, उद्या सकाळी दहाचा प्रयोग आहे, आता?’

दादा शांतपणे म्हणाले, ‘राजाभाऊ तुम्ही १५ मिनिटे शांतपणे बसा.’ मी थोडा चिडूनच बसलो. दादांनी हातात रंग, ब्रश घेतला आणि अक्षरशः, अवघ्या १५-२० मिनिटांत सुरेख श्री गणेश फ्लॅटवर अवतरले. दादांच्या हातातली जादू पाहून मी फक्त दादांना मिठीच मारली. ‘सॉरी’ म्हणालो. त्यावर दादा हसून म्हणाले, ‘जोगसाहेब, दिग्दर्शकाला खूप टेन्शन असतात. आता तुम्ही झोपा, काही किरकोळ टच अप करून आम्ही झोपू, उद्याचा प्रयोग दणक्यात होईल, काळजी करू नका.’
दादा मेकअप करताना त्यातल्या बरकाव्यांबाबतही समजावून सांगत. फक्त गेल्या तीन वर्षांतला आमचा परिचय; पण असं वाटतं, की दादांची आपली ओळख खूप वर्षांची आहे.

काल रंगभूमी दिनीच दादांनी या जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली. त्यांची ही एक्झिट मनाला हुरहूर लावून, चटका लावून गेली. जमिनीवर पाय घट्ट असलेल्या, नाटकासाठी, कलेसाठी जगलेल्या ह्या नाट्यकर्मीच्या स्वागतासाठी वैकुंठात परमेश्वरही बहुधा आतुर झाला होता. दादा, तुम्हाला मनापासून नमस्कार. ओम शांती.

  • वामन ऊर्फ राजाभाऊ जोग
    …….

प्रत्येक रंगकर्मीला ऊर्जा देणारा अवलिया
अगदी परवाच उत्साहाने फोनवर बोलत होते ते. त्यांचा आणि माझा गाव एकच. ग्रामदेवतेच्या-महालक्ष्मीच्या दसऱ्यापूर्वीच्या दर्शनाला गेलो नाही म्हणून अधिकारवाणीने नाराजी व्यक्त करत होते. कोतवड्याच्या कुठल्याशा पारावर कुणा रंगकर्मीला मदत करायला गेले होते. वयाची सत्तरी गाठूनही तरुणाला लाजवेल असा उत्साह अंगी सळसळणारे, साऱ्या नाट्यजगताचे दादा. काल जागतिक मराठी रंगभूमी दिनाला आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट घेऊन गेले. असा पुण्ययोग साधणाऱ्या या रंगदेवतेच्या पुजाऱ्याला कोटी कोटी नमन.

मुंबापुरीच्या जे. जे. स्कूलचा विद्यार्थी असलेल्या दादांना मुंबईचे जीवन फळले नाही. आयुष्याच्या विचित्र वळणावर असताना १९७९ साली त्यांनी गावचा रस्ता पकडला. तिथे त्यांच्यातली ऊर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. श्रीकांतजी पाटील, अजित पाटील, प्रकाश बोरकर, मोहन धांगडे, सुधाकर घाणेकर इत्यादी गावातल्याच कलावंतांना हाताशी धरून त्यांनी थेट राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी होत बसणी पंचक्रोशीचे नाव महाराष्ट्रात फडकत ठेवले. श्रीकांतजींसोबत इतरही सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी होत राहिले.

श्रीकांत पाटील यांच्या १९८४ सालच्या ‘रक्तप्रपात’ एकांकिकेदरम्यान माझा त्यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे जिज्ञासा संस्थेची स्थापना झाली. काही वर्षे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. रत्नागिरीतील जवळपास सगळ्याच नाट्यसंस्थांचे नेपथ्य दादा लोगडे करत असत. प्रत्येक रंगकर्मीला ऊर्जा देण्याचे महान कार्य नकळतपणे हा अवलिया अगदी निरपेक्ष भावनेने करत राहिला. मेकअप, नेपथ्य, रंगकाम, भूमिका. रंगमंचावरील कोणतीही जबाबदारी कोणतेही आढेवेढे न घेता, कोणतीही अपेक्षा न ठेवता करणारा हा माणूस. मानधनही कधी कुणाकडे मागितल्याचे मला तरी आठवत नाही. इतरांनी समजून द्यावे अशी भूमिका असलेला हा कलावंत अखेरपर्यंत रंगदेवतेची सेवा करत राहिला.

१९९५पासून संगीत सेवेत असलेल्या खल्वायन संस्थेशी दादांची नाळ जुळली. आजतागायत ते ‘निरपेक्ष’ हा शब्द फिका ठरेल अशा पद्धतीने वावरत राहिले आणि रंगदेवतेनेही त्यांचा सन्मान राखत केवळ एक दिवसाच्या पोटदुखीने रंगभूमी दिनाच्या पवित्र दिवशी त्यांना आपल्या सेवेत सामावून घेतले. एका सच्च्या कलावंताला रंगदेवतेने जणू मानवंदनाच दिली.
आकर्षक गणेशमूर्ती, नवरात्रात देवी मूर्ती बनविण्यात दादांचा पंचक्रोशीत दबदबा होता. ग्रंथालय, देवालय इत्यादी जवळपास सर्वच सामाजिक क्षेत्रांत त्यांच्या संचार होता. काही वर्षे सरपंच असलेल्या दादांनी गावचा कायापालट करून सोडला आहे.
आपला वसा मुलाकडे सोपवत त्याला आपल्या पद्धतीने स्वातंत्र्य देऊन दादांनी एक नवीन आदर्श घालून दिला. आज त्यांना श्रद्धांजली वाहताना मनस्वी यातना होत आहेत. शरीराचा एक पूर्जा आज निर्जीव झाल्यासारखे भासत आहे.
दादा, जिथे असाल तिथे रंगदेवतेची सेवा करत राहा. आपल्याला मनःपूर्वक आदरांजली.

  • सुहास भोळे
    ………

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply