सिंधुदुर्गातील हस्ताक्षरछांदिष्टाचे मुंबईत शनिवारी प्रदर्शन

तळेरे (ता. कणकवली) : हस्ताक्षरांचा छंद जोपासणारे तळेरे (ता. कणकवली) येथील निकेत पावसकर यांच्या संग्रहातील हस्ताक्षरे आणि संदेशपत्रांचे प्रदर्शन शनिवारी, १३ फेब्रुवारी) मुंबईत दादर येथे होणार आहे.

प्रत्येकाचे अनेक आदर्श असतात. अनेक आवडत्या मान्यवर व्यक्ती असतात. त्यातील अनेकांना आपण पाहिलेले असते. अनेकांचे विचार ऐकलेलेही असतात. पण त्यांचे हस्ताक्षर कसे आहे, त्यांची स्वाक्षरी कशी आहे, याबाबत प्रत्येकाला नक्कीच उत्सुकता असेल. ती पूर्ण करण्यासाठीच जणू तळेरे (ता. कणकवली) येथील निकेत पावसकर यांनी हस्ताक्षर आणि स्वाक्षऱ्यांचा संग्रहाचा छंद जोपासला आहे. त्यामध्ये त्यामध्ये ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर, नाशिक येथील आगामी अ. भा. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, प्रख्यात बोलीभाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखिका आशा बगे इत्यादींसह अनेकांचा समावेश आहे. अनेकांनी स्वहस्ताक्षरात दिलेले संदेशही आहेत.

हस्ताक्षरे आणि संदेशपत्रे जोपासण्याच्या श्री. पावसकर यांच्या छंदाची दखल मुंबईच्या टपाल कार्यालयाने घेतली आहे. उद्या, १३ फेब्रुवारी रोजी दादर येथील मुख्य टपाल कार्यालयात वार्षिक सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने या संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कोकणी, चिनी, मोडी, उर्दू आणि ब्रेल भाषेतील संदेशपत्रे ठेवण्यात येणार आहेत. विविध नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांसह त्यांचे हस्ताक्षर पाहता येईल. त्यामध्ये देशपरदेशातील जागतिक कीर्तीच्या व्यक्तींचाही समावेश आहे. दादरच्या मुख्य टपाल कार्यालयात तळमजल्यावर वितरण विभागात (दादर पूर्व) हे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

………
निकेत पावसकर यांच्या छंदाविषयी अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा –
https://kokanmedia.in/2020/09/11/letters/
…….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply