बेहेरेबुवांचे स्मरण करून `खल्वायन` दहा महिन्यांनी रुजू होणार

रत्नागिरी : करोनामुळे दहा महिने खंड पडलेली येथील खल्वायन संस्थेची मासिक संगीत सभा शनिवारी (१३ फेब्रुवारी) पुन्हा सुरू होणार आहे. ही २७० वी सभा आहे. किराणा घराण्याचे कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील प्रसिद्ध गायक आणि राष्ट्रपती पदकप्राप्त (कै.) महर्षि गणेश रामचंद्र बेहेरे आणि त्यांचे सुपुत्र गायक (कै.) रामकृष्ण गणेश बेहेरे बुवा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही मैफल होईल.

गुहागर येथील दिव्यांग कलाकार मयूरेश गाडगीळचे हार्मोनियमवादन आणि रत्नागिरीच्या मनाली बर्वे यांचे संतूरवादन उद्याच्या मैफलीत सादर केले जाणार आहे. उद्यापासून दर महिन्याच्या दुसर्याम शनिवारी खल्वायनची मासिक मैफल होणार आहे. उद्याची मैफल नेहमीप्रमाणे रत्नागिरीच्या गोदूताई जांभेकर विद्यालयात सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत होईल.

उद्याच्या मैफलीत हार्मोनियम वाजवणार असणारा मयूरेश गाडगीळ गुहागरच्या वरचा पाट भागातील रहिवासी असून गुहागर येथील खरे-ढरे कॉलेजमध्ये तो बारावीच्या कला शाखेत शिकत आहे. जन्मजात अंधत्व असलेल्या या कलाकाराची जिद्द वाखणण्यासारखी आहे. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण मंडणगडच्या स्नेहज्योती अंध विद्यालयात झाले. तेथील श्री. काकडे गुरुजींनी त्याच्यातील कलागुण ओळखून त्याला हार्मोनियमचे शिक्षण दिले. सध्या तो त्यांच्याकडूनच ऑनलाइन वादनाचे धडे घेत आहे. लवकरच तो विशारद परीक्षा देणार आहे. विविध स्पर्धांमधून मयूरेशने सोलोवादन केले आहे. तसेच तो गायन, भजन, कीर्तनात हार्मोनियम साथ करतो. मयूरेशला अंधत्वावर मात करून जिद्दीने जीवनाला सामोरे जाण्याकरिता, त्याची आई सौ. मीरा गाडगीळ यांनी कष्ट घेतले. आपला एक मुलगा जन्मजात अंध आहे हे कळल्यावर त्यांनी खचून न जाता त्यांनी त्याला कर्तृत्ववान बनवण्याकरिता मेहनत घेतली. तेवढ्याच जिद्दीने मयूरेशही त्यांना साथ देत आहे. मयूरेशचे वडील मिलिंद गाडगीळ, त्याचा जुळा भाऊ मकरंद, मयूरेशचे आजी, आजोबा यांचेही मोलाचे योगदान मयूरेशला घडविण्यात आहे.

सौ. मनाली बर्वे यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाचे शिक्षण आई आणि गुरू डॉ. अंजली दाणी यांच्याकडे घेतले. बारा वर्षांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. धनंजय दैठणकर (पुणे) यांच्याकडून त्या संतूरवादनाचे शिक्षण घेत आहेत. सिपला कॅन्सर सेंटर, पुणे, वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हल, नवी दिल्ली, जपान कल्चरल फेस्टिव्हल २०१८, संगीत मैत्र महोत्सव सावंतवाडी, फडके स्मृति समारोह, पुणे, अमरेन्द्र धनेश्वर ख्याल ट्रस्ट, दादर, आर्ट सर्कल आदी महोत्सवात संतूर वादनाचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. त्या एम. एस्सी असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार (शास्त्रीय गायन) ही पदवी त्यांनी मिळविली आहे. रत्नागिरीतील काही विद्यार्थ्यांना त्या ऑनलाइन गायनाचे व संतूर वादनाचे प्रशिक्षण देत आहेत. पुण्यातील विविध रुग्णालये आणि डॉक्टरांना त्या मार्गदर्शन संगीतोपचार पद्धतीचे करीत आहेत. रत्नगिरीतही ही उपचार पद्धत सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

उद्याच्या दोन्ही कार्यक्रमांना तबलासाथ युवा वादक प्रथमेश शहाणे करणार आहेत. मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी आवर्जून यावे, असे आवाहन खल्वायनचे संस्थाध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply