तळेरे येथील तरुणाच्या पत्रप्रपंचाच्या छंदाला लॉकडाउनमध्ये बहर; मान्यवरांचीही पत्रे प्राप्त

तळेरे (ता. कणकवली) :  येथील संदेशपत्र, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर या तरुणाच्या छंदाला करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या काळात बहरच आला. देशभरातील विविध क्षेत्रातील एकूण ७५० व्यक्तींशी त्याने पत्राद्वारे संपर्क साधला. या काळात त्याला अनेक मान्यवरांची संदेशपत्रे आली असून, त्याचा पत्रप्रपंच अव्याहत सुरूच आहे.

गेल्या १४ वर्षांपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींशी पत्राद्वारे संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्राचा संग्रह करण्याचा छंद निकेत पावसकर यांनी जोपासला आहे. त्यांच्या संग्रही आता १२०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे आहेत. लॉकडाउनमधील मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत त्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील ७५० पेक्षा जास्त व्यक्तींना पत्रे पाठविली. त्यातील काहींची संदेशपत्रे आली असून, ती छंदाचा उत्साह वाढविणारी आहेत. (खालील स्लाइड शो पाहावा.)

तळेरे येथे आपल्याच घरी निकेत यांनी या संग्रहाचे सुंदर अक्षरघर तयार केले आहे. त्याला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. गेल्या चार वर्षांपासून विख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना पाठविलेल्या पत्राला उत्तर हमखास येतेच, पण आता त्यांनी या अक्षरघराला भेट देणार असल्याचे पत्राने कळविले आहे. डॉ. नारळीकर यांच्या त्या पत्रामुळे अजूनच उत्साह वाढला असल्याचे निकेत पावसकर यांनी सांगितले.

लॉकडाउनच्या काळात साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांची असंख्य संदेश पत्रे पावसकर यांना आली. त्यामध्ये डॉ. गणेश देवी, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, माधुरी शानभाग, आशा बगे, रामदास पाध्ये, अर्चना पाध्ये, सत्यजित पाध्ये, जोसेफ तुस्कानो, हेमंत देसाई, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, ए. के. शेख,  सुहास बारटक्के यांच्यासह अनेकांच्या हस्ताक्षरातील पत्रांचा समावेश आहे. लॉकडाउन काळात परदेशातील सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे परदेशातील व्यक्तींशी पत्रव्यवहार झालेला नाही. मात्र परदेशातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंत ५० व्यक्तींची पत्रे तयार आहेत. परदेशातील दळणवळण सुरू होताच तीही पत्रे रवाना होतील, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. लॉकडाउन असल्याने टपाल नेण्यासाठी सध्या पोस्टाची गाडी आठवड्यातून एकदाच येत असल्याने एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाचे अभीष्टचिंतन करणारे पत्र सुमारे महिनाभर अगोदर पाठवतो. त्यामुळे त्या व्यक्तीला शुभेच्छा वेळेवर पोहोचत असल्याचे निकेत पावसकर यांनी सांगितले. 

या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. ते तसेच सर्वच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जात असल्याचे निकेत पावसकर यांनी सांगितले.

या संग्रहामुळे अनेक क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध आले आणि ते अधिक दृढ झाले आहेत. गेल्या १४ वर्षांत सुमारे पाच हजार व्यक्तींना दहा हजारपेक्षा जास्त वेळा पत्रव्यवहार केल्याचे श्री. पावसकर यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

One comment

Leave a Reply