रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार भाई बेर्डे यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम वि. ऊर्फ भाई बेर्डे यांचे आज, २२ मार्च रोजी दुपारी रत्नागिरीत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.

समाजवादी विचारसरणीचे भाई बेर्डे बॅ. नाथ पै यांचे अनुयायी आणि प्रा. मधु दंडवते यांचे निकटचे सहकारी होते. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघ, तसेच देवरूखच्या मातृमंदिर संस्थेचे ते काही काळ अध्यक्ष होते. समानता नावाचे साप्तहिक त्यांनी कित्येक वर्षे चालविले. रत्नागिरी नगरपालिकेत ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.

अलीकडेच त्यांच्या एका पुत्राचे निधन झाले. आता त्यांच्या पश्चात एक पुत्र, सुना असा परिवार आहे.

माजी आमदार माने यांची श्रद्धांजली

भाई बेर्डे यांच्या निधनाबद्दल माजी आमदार तथा साप्ताहिक बलवंतचे संपादक बाळ माने यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, भाई समानता साप्ताहिकाचे ४८ वर्षे संपादक होते. त्यांच्या लेखणीमुळे अनेकांना न्याय मिळाला. माझे वडील कै. यशवंतराव माने जनता पक्षात असताना भाई बेर्डे यांच्यासमवेत काम करत होते. त्यांची घनिष्ठ मैत्री होती. बेर्डे यांचा सुपुत्रही माझ्या वर्गातच होता. त्यामुळे बेर्डे यांचे आमच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध होते. आणीबाणीच्या काळात बेर्डे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या निधनाने एक चांगला समाजवादी नेता रत्नागिरीकरांनी गमावला आहे. भाई बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply