प्रमोद कोनकर यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पण’ पुरस्कार

रत्नागिरी : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधिक संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्काराकरिता कोकण विभागातून साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक आणि आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद कोनकर यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार दिले जातात. अठ्ठाविसाव्या २०२० च्या पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी आज फलटण (जि. सातारा) येथे केली. सन्मानाचा ज्येष्ठ पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार मुंबईतील उत्कृष्ट समाजमाध्यम पत्रकारिता करणारे मुक्त पत्रकार योगेश वसंतराव त्रिवेदी आणि धाडसी पत्रकार, कोविड योद्धा म्हणून ‘दर्पण’ पुरस्कार मंगेश चिवटे (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

अन्य विभागवार जाहीर केलेले ‘दर्पण’ पुरस्कार असे – १) मराठवाडा विभागातून आनंद कल्याणकर, नांदेड (आकाशवाणी प्रतिनिधी, नांदेड). २) विदर्भ विभागातून डॉ. रमेश गोटखडे, अमरावती (स्तंभलेखक, दै. हिंदुस्थान अमरावती). ३) पश्चिम महाराष्ट्रातून विनोद शिरसाट (पुणे), ज्येष्ठ समाजवादी लेखक व संपादक, हीरक महोत्सवी सा. साधना (पुणे). ४) उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातून मिलिंद सदाशिव चवंडके, पत्रकार, अहमदनगर. ५) कोकण विभागातून प्रमोद कोनकर, संपादक, साप्ताहिक कोकण मीडिया (समाजमाध्यम, आकाशवाणी, हिंदुस्थान समाचार जिल्हा प्रतिनिधी), ६) मुंबई विभागातून रवींद्र तुकाराम मालुसरे, संपादक, सा. पोलादपूर अस्मिता आणि अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई. ७) महिला विभागातून सौ. नम्रता आशीष फडणीस, विशेष प्रतिनिधी, दै. लोकमत, पुणे.

विशेष ‘दर्पण’ पुरस्कार : १) शिवाजी पाटील, प्रतिनिधी, दै.लोकमत, मु. पो. तारळे खुर्द, ता.राधानगरी (कोल्हापूर). २) अॅड. बाबुराव तुकाराम हिरडे, संपादक, सा. कमला भवानी संदेश, करमाळा (सोलापूर). ३) प्रा. रमेश आढाव, तालुका प्रतिनिधी, दै. तरुण भारत, फलटण (सातारा).

गेल्या वर्षी जाहीर केलेले २०१९ चे पुरस्कार करोनाच्या परिस्थितीमुळे समारंभपूर्वक देता आले नाहीत. आता सन २०१९ आणि आज जाहीर केलेले पुरस्कार करोनाच्या परिस्थितीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे संस्थेने उभारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘दर्पण’ स्मारक प्रकल्पातील ‘दर्पण’ सभागृहात समारंभपूर्वक देण्यात येतील. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रोख दोन हजार ५०० रुपये सन्मानपत्र, जांभेकरांचे चरित्र ग्रंथ, जांभेकरांचे आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्य यावरील माहितीपट (सी. डी.), शाल, श्रीफळ असे आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव (सातारा) आणि कृष्णा शेवडीकर (नांदेड) तसेच कार्यकारी विश्वस्त विजय मांडके (सातारा) यांनी सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply