रत्नागिरीतील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे आज, २७ एप्रिल रोजी वार्धक्याने निधन झाले. १५ मार्च २०२१ रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण करून १०१व्या वर्षात पदार्पण केले होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या “चले जाव” चळवळीत १९४२ साली त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात असताना आणि पुण्यात मिनू मसानी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

स्वातंत्र्यानंतरही त्यांनी अनेक सामाजिक कामात पुढाकार घेतला होता. काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमाxत त्या हिरीरीने भाग घेत असत. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांची पतपेढी सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यावेळी गोविंदराव निकम, राजाभाऊ लिमये आदींच्या सहकार्याने त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला पतपेढी काँग्रेस भुवनच्या इमारतीत सुरू केली होती.

गेली सात वर्षे त्या जामनगर येथे त्यांच्या कन्या अरुंधती राजा यांच्याकडे राहत होत्या. तेथेच त्यांचे आज दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, निवृत्त न्यायाधीश भास्करराव शेट्ये यांनी श्रीमती पाथरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या चार जणांच्या उपस्थितीत आशाताई पाथरे यांच्यावर जामनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाताईंचा नातू अमित राजा यांनी अंत्यसंस्कार केले.

………………………..

शतकोत्सवी स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे

रत्नागिरी जिल्ह्यातल्या अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक म्हणजे आशाताई पाथरे. महात्मा गांधींनी पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. गेली सात वर्षे त्या त्यांची कन्या अरुंधती राजा यांच्याकडे गुजरातमध्ये जामनगरला राहत होत्या. विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या आशाताईंना कारावास भोगावा लागला. त्यावेळच्या आठवणी जपतच त्यांनी आपली संध्याछाया जागवली. त्यांनी गेल्या वर्षी शंभरीत पदार्पण केले, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना प्रत्यक्ष भेटायचे मात्र मनसुबेच राहिले. आता ते साध्य होणार नाहीत.

……

आशाताई पाथरे या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अखेरच्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक होत्या. भारत छोडो आंदोलनात भाग घेण्याचे आणि पहिला स्वातंत्र्यदिन पाहण्याचे भाग्य आशाताई पाथरे यांना लाभले होते. त्या चळवळीच्या साक्षीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक आज पंचत्वात विलीन झाल्या.

रत्नागिरीत असताना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्याच्या मुख्य शासकीय सोहळ्याला त्या आवर्जून उपस्थित असायच्या. एक-दोन कार्यक्रमात त्यांची भाषणेही ऐकली होती. पण प्रत्यक्ष त्यांच्याशी कधी संवाद साधला नव्हता. गेली सात वर्षे त्या गुजरातमध्ये जामनगरला कन्या अरुंधती राजा यांच्याकडे राहत होत्या. आशाताईंनी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून १५ मार्च २०२० रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केले, तेव्हा त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. एवढ्या वयातही स्वातंत्र्यलढ्याचा विषय काढताच त्या अतिशय रोमांचित झाल्या. तेव्हाचे दिवस किती मंतरलेले होते, ते त्यांनी सांगितले. पुण्यातल्या मोर्चाविषयी अतिशय खणखणीत आवाजात त्या म्हणाल्या, “९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीचा डोंब उसळला, महात्माजींनी देशाला ब्रिटिशांना ‘चले जाव’चा आदेश दिला. आम्ही मिनू मसानींच्या मोर्चात सहभागी झालो. ब्रिटिशांनी चालतो व्हा, इन्किलाब झिंदाबाद, करेंगे या मरेंगे, ब्रिटिशांनो, चालते व्हा, अशा घोषणा देत मोर्चा निघाला होता. मोर्चा चालू असताना आमची धरपकड झाली. मला येरवड्याच्या महिला जेलमध्ये नेण्यात आलं. नंतर स्पेशल मॅजिस्ट्रेटपुढे केस चालविण्यात आली आणि मला देशद्रोहाच्या आरोपाखाली ३ महिने शिक्षा झाली. सक्तमजुरीची. मग मला जेलमध्ये डांबण्यात आलं. बाहेरून मोठं कुलूप होतं. जेलमध्ये पाण्याचा अभाव होता. खायला बटाट्याची भाजी. त्यात किडी. त्या काढून टाकायच्या आणि खायचं. दुसरं काही मिळायचंच नाही. अशा तऱ्हेने आम्ही दिवस काढले. “

रत्नागिरीत १५ मार्च १९२१ रोजी जन्मलेल्या आशाताई पाथरे (पूर्वाश्रमीच्या इंदूताई भिकशेठ गांधी) यांना त्यांच्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणाबाबत प्रतिगामी विचार असलेल्या त्या काळात महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगलीला पाठवले. तेथे विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाच्या दिवशी निघालेल्या मोर्चात त्या सहभागी झाल्या. पोलिसांनी मोर्चा अडविला. लाठीमार केला. तेव्हा त्यांचा सहकारी मित्र मधू पोंक्षे याला वाचविण्याचा प्रयत्न आशाताईंनी केला. सांगली स्टेशनसमोरच्या तेव्हाच्या चौकात उभा राहून तो त्वेषाने भाषण करू लागला. ब्रिटिशांचे घोडेस्वार सैनिक लाठीहल्ला करत जमावावर धावून आले. मधू पोंक्षे याला वाचवण्यासाठी मित्रमैत्रिणींनी केलेले केलेले कडे तोडून सैनिकांनी केलेल्या लाठीहल्ल्यात मधू पोंक्षे गंभीर जखमी झाला आणि स्टेशनवर जाऊन बेशुद्ध पडला. त्याला आशाताईंनी मांडीवर घेतले. पांढऱ्या साडीसह त्यांचे कपडे रक्ताने माखले. त्याही अवस्थेत त्यांनी मधूला खासगी रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्या मिरजेच्या भावाला कळविण्याची व्यवस्था केली. दळणवळणाच्या तेव्हाच्या बिकट स्थितीत ते खूपच कठीण होते. यथावकाश मधू बरा झाला. त्याला वाचविण्याची कामगिरी पार पाडल्यानंतर आशाताई रक्ताळलेल्या कपड्यांनिशी रात्री दहा वाजता विलिंग्डन कॉलेजच्या वसतिगृहात पोहोचल्या. प्रिन्सिपॉल आणि रेक्टर विनायकराव गोकाक यांच्यासमोर त्यांनी हजेरी लावली. तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने गोकाक यांना त्यांच्या साहित्याबद्दल पुरस्कार देऊन नुकतेच गौरविले होते. तरीही त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात केलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल आशाताईंचे तोंडभरून कौतुक केले. असे असले, तरी  आंदोलनात सहभागी झाल्याने सांगलीचे कॉलेज त्यांना सोडावे लागले.

पुढच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला. तेथेही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. महात्मा गांधीजींनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना डांबून ठेवलेल्या आगाखान पॅलेसवर मिनू मसानी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात आशाताई सहभागी झाल्या. त्यामुळे त्यांना अटक झाली आणि येरवडा येथे महिला कारागृहात कारावास भोगावा लागला. पाण्याचा अभाव, क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात कोंबून ठेवलेले कैदी आणि खुनी तसेच अन्य वाईट गुन्ह्यांमधील अट्टल गुन्हेगार महिलांसोबत त्यांना तेथे राहावे लागले. या काळातही भावनाशून्य ब्रिटिश अधिकाऱ्यांचा अनुभव त्यांना आला. सुलोचना जोशी ही साताऱ्याची नऊ महिन्यांची गरोदर महिला त्यांच्यासमवेत डांबण्यात आली. तिला हगवणीचा भरपूर त्रास होऊनही तिच्यावर तुरुंग प्रशासनाकडून कोणतेच उपचार झाले नाहीत. शेवटी मरणासन्न अवस्थेत तिला तुरुंगाधिकाऱ्यांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे पुत्ररत्नाला जन्म देऊन ती गतप्राण झाली. स्वातंत्र्यसंग्रामात भूमिगत राहून पत्रके वाटणाऱ्या ठाण्याच्या कुसुम मोकाशीला कार्यकर्त्यांची नावे सांगण्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपण्याची शिक्षा पोलिसांनी दिली होती. तरीही ती बधली नाही, म्हणून तिला पुण्याच्या येरवडा कारागृहात डांबण्यात आले. सतत बर्फावर झोपविल्यामुळे तिचा एक पाय लटका पडला होता. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अशा महिलांकडून आपल्याला आणखी प्रेरणा मिळाली, असे आशाताईंनी आवर्जून सांगितले.

आशाताईंचे हे अनुभव ‘ते मंतरलेले दिवस’  या मुंबईतील मणिभवन गांधी संग्रहालयाने प्रकाशित केलेल्या महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्ररूपी अनुभवपर पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. पुस्तकाचे संपादन डॉ. रोहिणी गवाणकर आणि डॉ. नंदा आपटे यांनी केले आहे. येरवड्यातून सुटका झाल्यानंतर आंदोलकांना गुप्त पत्रके पोहोचविण्याचे जोखमीचे कामही त्यांनी केले. त्याचाही एक किस्सा त्यांनी पुस्तकात नमूद केला आहे. पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये त्यांनी १९४३ मध्ये प्रवेश घेतला. मात्र अभ्यासात लक्ष लागत नव्हतेच. त्यात वर्षही वाया गेले. स्वातंत्र्याच्या चळवळीतील पडेल ते काम करायला मात्र हात शिवशिवत होते. तशातच पुण्यातून मुंबईला अच्युतराव पटवर्धन यांच्याकडे गुप्त पत्रके पोहोचविण्याची कामगिरी आशाताईंबरोबरच इंदूताई चिपळूणकर (नंतरच्या इंदू दिनकर साक्रीकर) यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्या दोघींनी पुण्याच्या मंडईतून रिकामी करंडी खरेदी करून त्यात पिकलेले पेरू आणि पत्रकांचे थर रचले. ही करंडी त्यांनी मोठ्या जोखमीने रेल्वेतून मुंबईत पोहोचवली.

त्यांचा फोनवरचा खणखणीत आवाज ऐकल्यानंतर त्यांना त्यांच्या शतकमहोत्सवाच्या दिवशी भेटावे असे वाटले होते. पण गेल्या वर्षी करोनामुळे संपूर्ण व्यवहारच थांबले. त्यामुळे ते शक्य झाले नाही. शतक पूर्ण केल्यानंतर यावर्षी तरी त्यांची भेट घ्यावी, असे ठरवले होते. पण मार्च महिन्याच्या सुरवातीलाच प्रवासावर बंधने आली. रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द झाल्या. यावर्षीही त्यांची भेट शक्य झाली नाही. फोनवरचा आवाज ऐकला, तेव्हा त्या आपल्याला लवकर सोडून जातील, असे वाटले नव्हते. पण तसे झाले नाही. आता त्यांची भेट कधीच होऊ शकणार नाही.

नव्या पिढीने देशाशी एकनिष्ठ राहून हे स्वातंत्र्य यावचंद्रदिवाकरौ टिकवावे, अशी माझी इच्छा आहे. नवी पिढीने जगात देशाला उच्च स्थान द्यावे. देशाशी प्रामाणिक राहून देशाची मान जगात उच्च स्थानावर न्यावी, अशी अपेक्षा त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती.  ती पूर्ण करणे एवढेच आता हाती राहिले आहे.

(आशाताईंनी १००व्या वर्षात पदार्पण केलं, त्या वेळी त्यांच्याविषयी लिहिलेला सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. १५ मार्च २०२१ रोजी साजऱ्या झालेल्या त्यांच्या वाढदिवसाचा, तसंच त्यांनी देशवासीयांना दिलेल्या संदेशाचा व्हिडिओ सोबत देत आहोत. आशाताईंच्या आवाजातील संदेश ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply