नवी दिल्ली : कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांचे असावे, अशी शिफारस डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड वर्किंग ग्रुपने केंद्र सरकारला केली आहे. सध्या कोविशिल्ड लशीचे दोन डोस सहा ते आठ आठवड्यांच्या अंतराने दिले जात आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही शिफारस स्वीकारली असून, त्यानुसार आता अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या करोनाप्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे देशभरातल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग एप्रिल महिन्याच्या तुलनेत ५० टक्क्यांनी घटला आहे. पहिला डोस घेऊन झालेल्या लाखो लोकांना मुदत उलटून गेल्यावरही अद्याप दुसरा डोस न मिळाल्यामुळे त्यांच्या मनात अनेक शंकांनी मूळ धरले आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या या शिफारशीमुळे लोकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.
खासकरून ब्रिटनमधल्या प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे कोविड-१९ वर्किंग ग्रुपने कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर अंतर दुपटीने वाढवून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत नेण्याची शिफारस केली आहे. कोविशिल्ड ही लस ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी यांनी विकसित केली आहे. भारतात या लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीत होत आहे.
दरम्यान, हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लशीच्या दोन डोसमधील अंतरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे केंद्र सरकारकडून कळवण्यात आले आहे. ते अंतर चार ते सहा आठवड्यांचे आहे.
कोविड-१९ वर्किंग ग्रुपमध्ये डॉ. एन. के. अरोरा यांच्यासह डॉ. राकेश अगरवाल (पुदुच्चेरी), डॉ. गगनदीप कांग (वेल्लोर), डॉ. जे. पी. मुल्लियाल (वेल्लोर), डॉ. नवीन खन्ना (नवी दिल्ली), डॉ. अमूल्य पांडा (नवी दिल्ली) आणि भारताचे औषध महानियंत्रक (DGCI)डॉ. व्ही. जी. सोमणी यांचा समावेश आहे.
कोविड वर्किंग ग्रुपने केलेली ही शिफारस कोविड-१९ लस या विषयातल्या राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाने १२ मे रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारली आहे. नीती आयोगाचे आरोग्यविषयक तज्ज्ञ डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली हा गट कार्यरत आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही शिफारस स्वीकारली आहे. त्यामुळे कोविशिल्ड लशीचे दोन डोस १२ ते १६ आठवड्यांच्या अंतराने दिले जाणार आहेत.
‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैज्ञानिक जर्नलने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये १२ आठवड्यांचे अंतर ठेवले, तर लस ८१.३ टक्के प्रभावी ठरते. तसेच, या लशीचे दोन डोसेस सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर ठेवून घेतले, तर ती सुमारे ५५ टक्के प्रभावी ठरते.
डॉ. एन. के. अरोरा यांनी दोन दिवसांपूर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘लशीचा पहिला डोस घेतलेल्या अनेक व्यक्तींचा दुसरा डोस लांबणीवर पडला आहे; मात्र त्यांनी काळजी करण्याची गरज नाही हे अंतर ८ ते १० आठवडे झाले, तरी काहीही फरक पडत नाही. एवढ्या अंतराने दुसरा डोस घेतला, तरी तो प्रभावीच ठरतो. दोन डोसमधील अंतर वाढले तरी पुन्हा पहिला डोस घेणे गरजेचे नाही.’
‘पहिल्या डोसमुळे शरीरातल्या प्रतिकारशक्तीला जी चालना मिळालेली असते, ती दुसऱ्या डोसला उशीर झाल्यामुळे नाहीशी होत नाही. पहिल्या डोसमुळे तयार झालेला प्रभावाचा दर्जा आणि परिणाम वाढवण्याचे काम दुसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस करतो,’ असे पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेतील इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनिता बाळ यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, उशीर झाला म्हणून कोणीही कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस टाळू नये. दुसऱ्या डोसला उशीर झाला, तरी घाबरण्याचे कारण नाही आणि पहिला डोस पुन्हा घ्यावा लागत नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
