गुजरातमध्ये तौते चक्रीवादळाच्या लँडफॉलची प्रक्रिया सुरू

गेले दोन दिवस गोवा-कोकणाच्या समुद्रातून मुंबई-गुजरातच्या दिशेने निघालेल्या तौते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) लँडफॉलची (Landfall) म्हणजेच किनाऱ्यावर धडकण्याची प्रक्रिया गुजरातमध्ये सुरू झाली आहे. भारतीय हवामान खात्याने आज, १७ मे रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे.

या अतितीव्र चक्रीवादळाने (Extremely Severe Cyclone) गेल्या सहा तासांत ताशी १७५ किलोमीटर वेगाने प्रवास केला आहे. रात्री साडेसात वाजता या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू २०.३ अंश उत्तर आणि ७१.३ अंश पूर्व अक्षांश-रेखांशावर होता. हे ठिकाण दीवच्या आग्नेयेला ६० किलोमीटर अंतरावर, तसंच मुंबईच्या पश्चिम-वायव्येकडे २०५ किलोमीटरवर समुद्रात आहे. चक्रीवादळाची बाह्य भुजा सौराष्ट्र परिसरावर आहे. या चक्रीवादळाच्या लँडफॉलची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील चार तासांत म्हणजे रात्री ११.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दीवमध्ये रात्री साडेसात वाजता ताशी ९२ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. रात्री साडेनऊ वाजता दीवमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी १३३ किलोमीटरपर्यंत पोहोचला होता, असं ट्विट भारतीय हवामान खात्याने केलं आहे.

या चक्रीवादळाची दिशा उत्तर आणि वायव्येकडेच असून, ते गुजरातमधील पोरबंदर आणि महुवा (भावनगर जिल्हा) यांच्यादरम्यान किनारपट्टी ओलांडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्यांचा वेग ताशी १५५ ते १६५ किलोमीटरपासून १८५ किलोमीटरपर्यंतही असू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

यामुळे सौराष्ट्र, दीव आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे पाऊसमान, तसेच वेगवान वारे १८ मेपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. या वादळामुळे आणंद, अमरेली, गीर, भावनगर, सोमनाथ, दीव आदी किनाऱ्यांवर तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून, लँडफॉलच्या प्रक्रियेदरम्यान संपूर्ण गुजरातच्या किनाऱ्यांवर किमान एक मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

दरम्यान, या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईसह उत्तर कोकणात पुढील १२ तास कायम राहणार असून, या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. आज (१७ मे) सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मुंबईत कुलाबा येथे १८.९ सेंमी, सांताक्रूझ येथे १९.४ सेंमी, अलिबाग येथे १०.५ सेंमी आणि डहाणू येथे ७.३ सेंमी पाऊस झाला. आज सायंकाळी साडेपाच वाजता अलिबागला ताशी ७८ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. तसेच, सांताक्रूझला ताशी ४६, तर डहाणूला ताशी ३१ किलोमीटर वेगाने वार वाहत होते.

‘चक्रीवादळ जेव्हा जमिनीवर येते, तेव्हा सर्वसाधारणपणे त्याचा वेग कमी होतो. कारण जमिनीवर घर्षण मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे त्याच्या केंद्रबिंदूपाशी असलेले कमी दाबाचे क्षेत्र भरते. तसेच, जमिनीवर आल्यावर चक्रीवादळाचा ऊर्जास्रोत बंद होतो. समुद्रावर असताना त्याला जी ऊर्जा मिळत असते, ती जमिनीवर आल्यावर मिळत नाही,’ अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply