पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बँकेचे अल्प दरात कर्ज की पाच टक्के दराने?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त, व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक आणि वाहनधारकांना अल्प दरात कर्जपुरवठा करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँक पाच टक्के दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे काल जाहीर केले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज मिळणार की, पाच टक्के दराने, याचा खुलासा होऊ शकला नाही.

पत्रकात म्हटले आहे की, राजापूर, चिपळूण, खेड आणि अन्य ठिकाणी गेल्या आठ-दहा दिवसांतील अतिवृष्टीमध्ये अनेक व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक, शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. चिपळूण शहरात तर व्यापार्यांरना पुराने धुऊन नेले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना शून्यातून उभे करण्याकरिता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अल्प दरात कर्जपुरवठा करणार आहे.

संकटकाळी रत्नागिरी जिल्ह्याची बँक या सर्व पूरग्रस्त लोकांना त्यांचे गतवैभव परत प्राप्त करून देण्याकरिता जी पैशाची गरज लागणार आहे, ती अल्पदराने कर्ज देऊन भागविण्यास तयार आहे. हे कर्ज परतफेड करताना कर्जदारांना एक वर्षाचा अधिस्थगत (मॉरिटोरियम) मुदत देणार आहे. एक वर्ष त्यांना कर्जाचा हप्ता फेडायचा नाही. व्याज फक्त भरायचे आहे. त्यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चिपळूण, खेड आणि इतर ठिकाणी गरजेप्रमाणे एक वेगळा ‘पूरग्रस्त कर्ज मंजुरी कक्ष’ निर्माण करणार आहे. त्यामध्ये पूरग्रस्तांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, दुकानदार, शेतकऱ्यांना, पुरात वाहून गेलेल्या वाहनधारकांना वित्त पुरवठा करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शासनाने त्यासाठी पुढे येऊन काही टक्केऱ व्याज अनुदान दिले पाहिजे. त्यासाठी तसा ‘जीआर’ तात्काळ काढला तर अत्यंत अल्प दराने कर्ज पुरवठा होईल, असे डॉ. चोरगे यांनी म्हटले आहे.

याबाबत, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान या तिघांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आणि व्याजाबद्दल निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. तसा निर्णय आज होण्याची शक्यरता आहे, असेही डॉ. चोरगे म्हणाले.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँक पाच टक्के दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे जाहीर केले होते. शिवाय या पाच टक्क्यांपैकी तीन टक्क्यांचा भार राज्य शासन उचलेल का, यादृष्टीने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसे झाल्यास केवळ दोन टक्के दराने व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. बँकेच्या अध्यक्षांनी मात्र आज अल्प दरात कर्ज पुरविले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे व्याजदराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जपुरवठा करताना अन्य कोणत्याही बँकेचे कर्ज असता कामा नये, असा नियम असतो. त्याबाबतही खुलासा होऊ शकला नाही.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply