रत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्ताने रत्नागिरीच्या टिळक आळीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे फायबर शिल्प साकारण्याचा संकल्प गेल्या वर्षी सोडण्यात आला होता. हे शिल्प आता पूर्ण होत आले असून ते लवकरच प्रतिष्ठापित होणार आहे. उद्याच्या (दि. १ ऑगस्ट) टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने चैतन्य लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष आनंद मावळंकर यांनी ही माहिती दिली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांचे कार्य अतुलनीय होते. शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृती, इतिहास, साहित्य क्षेत्र आणि जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांवरचे त्यांचे मूलभूत संशोधन, भौतिक विचारधन सर्वांना सुपरिचित आहे. त्यांनी उभारलेले सामाजिक लढे, वृत्तपत्रांतून केलेली विधायक आणि वैचारिक क्रांती, शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा दिलेले सामाजिक स्वरूप, त्यातून घडवलेले जनजागृतीची चळवळ यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला होता. अशा या लोकोत्तर महापुरुषाशी रत्नागिरीचे सख्यत्वाचे ऋणानुबंध आहेत. रत्नागिरी ही लोकमान्यांची जन्मभूमी आहे. ज्यांच्या नावामुळे टिळक आळी हे अभिमानास्पद नामाभिधान प्राप्त झाले, ती टिळक जन्मभूमी आणि ती वास्तू ऐतिहासिक वारसा सांगत उभी आहे.

टिळकांचा हा वारसा सर्वांना सांगण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन नित्य होण्यासाठी टिळक आळीच्या प्रवेशद्वाराजवळ अभ्यंकर कुटुंबीयांच्या चैतन्य या वास्तूवर लोकमान्य टिळकांचे फायबर शिल्प उभारण्यात येणार आहे. टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्ताने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या शिल्पासाठी काचेचे मोठे कपाट आणि विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. या कामासाठी निधीची आवश्यकता आहे. सर्व टिळकप्रेमींनी एकत्र येऊन शक्य असेल तेवढा निधी द्यावा, अशी विनंती चैतन्य लोकमान्य टिळक स्मारकातर्फे करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तसेच देणगी देण्यासाठी टिळक आळी नाक्यावरील चैतन्य लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष आनंद गोविंद मावळंकर (८१४९९६९२१३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply