विद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग

धनंजय कीर यांचं नाव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला देण्याचा निर्णय जाहीर झाला तो रत्नागिरीकर नागरिकांच्या जीवनातील एक अविस्मरणीय दिवस ठरेल. आज, १ ऑगस्ट २०२१ रोजी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर पहिल्या स्मृतिदिनी ‘चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर’ असं मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्र परिसराचं अधिकृतपणे नामकरण होत आहे. टिळक आणि कीर हे दोघेही जन्माने रत्नागिरीकर, पहिल्या रत्नपुत्राने परतंत्र भारताला ‘जन्मसिद्ध हक्का’चा मंत्र देऊन प्रेरित केलं आणि दुसऱ्या सुपुत्राने या महापुरुषाचं इंग्रजी चरित्र लिहिलं. त्यामुळेच या नामकरणाला लाभलेल्या या मुहूर्ताचं वर्णनही ‘दुग्धशर्करा योग’ असं करणं वावगं ठरणार नाही. खुद्द चरित्रकार कीर यांचे रत्नागिरी शहरनिवासी चिरंजीव डॉ. सुनीत धनंजय कीर यांनी याला ‘सुवर्णयोग’ म्हणून आनंद व्यक्त केला आणि हा योग जुळवून आणल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रत्नागिरीचं विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे आणि राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाची धुरा सांभाळणारे मंत्री उदय सामंत यांना समस्त रत्नागिरीकर साहित्यप्रेमी धन्यवाद देत आहेत.

‘मुंबई दूरदर्शन’चे निवृत्त सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी आपल्या कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीला धनंजय कीर यांची मुलाखत ‘रत्नागिरी आकाशवाणी’साठी घेतली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये जयू भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धनंजय कीर यांचं नाव विद्यापीठ उपकेंद्राला देण्याची मागणी केली, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने हा विषय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवून श्री. भाटकर यांना तसं कळविलं. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात भाटकर यांनी ही मागणी केल्याचं वृत्त जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या दैनिकात प्रसिद्ध झालं. तसंच ६ जानेवारी २०२१ रोजी त्यांनी मंत्री श्री. सामंत यांची भेट घेऊन त्यांना याबद्दल आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली. उल्लेखनीय बाब अशी की मंत्रिमहोदयांनी क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संपर्क साधला आणि आवश्यक त्या कार्यवाहीच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवातही केली. २८ मे २०२१ या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या सभेत नामकरणाचा ठराव संमत झाला.

ठराव संमत होण्याच्या तारखेमुळे पुन्हा एक चांगला योग जुळून आला. २८ मे ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना भाषाशुद्धी आणि अस्पृश्यता निवारणाची चळवळ उभी केली. त्यांच्या प्रेरणेने रत्नागिरीचेच सुपुत्र श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी सर्वांना खुलं असणारं पतितपावन मंदिर उभारलं, या कार्याची एरवी सावरकरांबद्दल तिरस्काराने लिहिणाऱ्या अँग्लोइंडियन वृत्तपत्रांनीही प्रशंसा केली. या सावरकरांचं पहिलं इंग्रजी चरित्र धनंजय कीर यांनी लिहिलं. स्वतः कीर यांचीही ती पहिलीच संपूर्ण चरित्रग्रंथनिर्मिती होती. याच तारखेला १९५० साली ते मुंबईत प्रकाशित झालं होतं आणि त्या पहिल्याच कलाकृतीने धनंजय कीर यांना ‘उत्कृष्ट इंग्रजीत लिहिणारा मराठी माणूस’ असा लौकिक मिळवून दिला. या त्यांच्या ग्रंथाची जेम्स बॉस्वेल यांनी लिहिलेल्या डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांच्या चरित्राशी विद्वानांनी तुलना केली. २८ मे याच तारखेला १९८३ मध्ये सावरकरांच्याच जीवनावर कीर यांचं रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरात व्याख्यान झालं, ते त्यांचं अखेरचं खुलं भाषण ठरलं. आणखी २७ वर्षांनी धनंजय कीर यांचं मराठी समग्र चरित्र याच तारखेला म्हणजे २८ मे २०११ रोजी रत्नागिरीच्या, ते ज्या शाळेत शिकले त्या पटवर्धन हायस्कूलमध्ये प्रकाशन झालं, हे महत्त्वाचं पुस्तक माझ्या हातून लिहिलं जाण्याचा योग होता हे केवळ ओघाने आलं म्हणून मी विनयपूर्वक नमूद करतो.

अशा या ‘सुवर्णयोगा’निमित्त धनंजय कीर यांच्या कार्याचा अगदी थोडक्यात परामर्ष घेणं औचित्यपूर्ण ठरेल. ऐश्वर्यसंपन्न भूतकाळ असणाऱ्या पण परिस्थितीवश अवनती प्राप्त झालेल्या एका सामान्य कुटुंबात २३ एप्रिल १९१३ रोजी रत्नागिरी शहराच्या खडपे वठार भागात अनंत विठ्ठल कीर हे रत्न जन्माला आलं. लहानपणापासून अभ्यासाची आवड आणि महापुरुष कसे घडतात, याचं मनात जगावेगळं कुतूहल. त्यातच त्याकाळी रत्नागिरीतच वास्तव्यास असणाऱ्या सावरकरांचं दर्शन झालं आणि तारुण्याचा उंबरठा ओलांडतानाच चरित्र कसं लिहावं याचा शास्त्रशुद्ध अभ्यास यांनी सुरू केला. जोडीला इंग्रजी भाषेचं अध्ययन. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी या महापुरुषांची इंग्रजी चरित्रं त्यांनी लिहिली. शिवाय आंबेडकर, फुले आणि शाहू महाराज यांची मराठी चरित्रंही लिहिली. त्यांच्या टिळक चरित्राचा मराठी अनुवाद करण्याची संधी मला मिळाली हा माझा बहुमानच!

अभ्यासपूर्ण, साधार आणि संतुलित चरित्र लिहिण्याबद्दल कीर यांची ख्याती होती. टिळकांच्या सामाजिक सुधारणेबद्दल असणाऱ्या प्रतिगामी धोरणावर त्यांनी स्पष्टपणे प्रकाश टाकला, त्याचवेळी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम, त्याग, प्रकट केलेली धडाडी आणि त्यांची पत्रकारिता याबद्दल लिहिताना कुठेही उणेपणा येऊ दिला नाही. म्हणूनच, जन्मशताब्दी स्पर्धेनिमित्त लिहिलेल्या टिळक चरित्राला बक्षीस मिळालं नसलं तरी त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चरित्रकार म्हणून ख्यातनाम झालेल्या धनंजय कीर यांना महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता आलं नाही. परंतु त्यांच्या स्वतःच्या लेखनातून चरित्रवाङ्मयाचं विद्यापीठच जन्माला आलं. कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि उज्जैनचं नवनालंदा विद्यापीठ यांनी ‘डी लिट’ पदवी प्रदान करून त्यांच्या विद्वत्तेचा उचित गौरव केला. अशा, भारत सरकारने ‘पद्मभूषण’ म्हणून गौरवलेल्या विद्वान चरित्रकाराचं नाव भारतातील आद्य संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्यात यावं, हा विद्यापीठ आणि व्यासंगी चरित्रकार या दोघांचाही सन्मान!

  • राजेंद्रप्रसाद स. मसुरकर, रत्नागिरी
    (९९६०२४५६०१)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply