लांजा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संजय ऊर्फ भाई विठ्ठलदास बुटाला (वय ७५) यांचे बुधवारी (४ ऑगस्ट) अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्याविषयी पत्रकार-लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि लांज्याच्या साहित्य क्षेत्रात वावरणारे विजय हटकर यांनी लिहिलेले श्रद्धांजलीपर लेख.
………
सुमनभाई गेले…..!
गेली तीस-पस्तीस वर्षं लांजा शहरात छायाचित्रणाचा व्यवसाय करणारे संजय बुटाला अखेर करोनाचा बळी ठरले. काही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे मित्राला डायलिसिसकरिता परकार हॉस्पिटलमध्ये नेलं असता लिफ्टमधून बाहेर पडणाऱ्या एका युवकाची हाक ऐकू आली. तोंडावर मास्क बांधलेला असल्याने मी ओळखलं नाही. त्यानेच म्हटलं, “मी विनय, सुमनभाईंचा मुलगा.” तेव्हा कळलं की सुमनभाईंना करोनामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं आणि आता घरी नेत होते. त्यांना बरं वाटल्याचं कळताच हायसं वाटलं. आठवडाभराने लांज्याच्या एका मित्राला फोन केला तेव्हा कळलं की, सुमनभाईंना पुन्हा रुग्णालयात नेलंय. मग विनयचा क्रमांक मिळवून चौकशी केली तर कळलं किरकोळ तापामुळे पुण्याला दाखल केलंय आणि आज ते गेल्याची बातमी सकाळीच कळली.
भाई लांजा शहरात ते स्वतःचा स्टुडिओ चालवत होते. प्रेस फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध होते. तिथल्या छायाचित्रण व्यावसायिकांमध्ये त्यांचं वजनदार स्थान होतं आणि तालुका प्रेस क्लबचे ते अध्यक्षही होते. लोक त्यांना भाई बुटाला म्हणून ओळखत, पण माझ्यासाठी ते ‘सुमनभाई’ होते. संजय विठ्ठलदास बुटाला असं पूर्ण नाव असणारे सुमनभाई आणि माझ्यात वयोगटाच्या पलीकडचं प्रेमाचं, मैत्रीचं नातं होतं.
माझी त्यांची ओळख मी रत्नागिरीला कॉलेजमध्ये दाखल झालो तेव्हापासूनची. आमच्या वयात तसं सतरा-अठरा वर्षांचं अंतर, त्यांच्या वयाचा मान मी नेहमीच ठेवला, पण तरीही वयोगटाच्या सीमा ओलांडून सुमनभाई माझे मित्र कधी झाले कळलंच नाही. त्रेचाळीस वर्षांपूर्वी एसएससी होऊन गोगटे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा हॉस्टेलमध्ये जागा मिळेपर्यंत बाबांनी मला झाडगावातले आपले स्नेही नाना शेठ यांच्या घरी ठेवलं. त्यांचा परिवार मोठा, पत्नी, मुलं, नातेवाईक, कारागीर अशी तेरा-चौदा माणसं, त्यात मी सामावला गेलो. या माणसांत सुमनभाई आपल्या दोन मुलांसह सपत्नीक राहत होते. कॉलेज सुटल्यावर बऱ्याचदा मी गोखले नाक्यावरच्या ‘छाया स्टुडिओ’त जात असे. तिथे सुमनभाई आणि दुसरे एक कदम म्हणून बसणीचे कारागीर होते त्यांच्याशी चांगली गट्टी जमली.
त्याकाळी रत्नागिरी शहरात मोजकेच फोटो स्टुडिओ होते. ‘छाया स्टुडिओ’ प्रसिद्ध होता आणि त्याचे संस्थापक नारायण लालजी तथा नाना शेठ हे एक गप्पिष्ट गृहस्थ होते. लहानपणी रत्नागिरीस आईवडिलांबरोबर गेलो असता सर्वांचा एक फोटो काढला, अर्थात ‘छाया स्टुडिओ’तच! तो नानांनी स्वतः काढला होता, पण येणाऱ्या सर्वच ग्राहकांचे फोटो ते स्वतः काढत नसत. ते काम सुमनभाईंचं. आणखीही एकदोन कारागीर असत. त्यावेळी ‘छाया स्टुडिओ’ हे रत्नागिरी शहरातल्या फोटोग्राफी व्यवसायातलं अग्रगण्य नाव होतं. येणाऱ्या बहुतेक ग्राहकांना सुमनभाई ठाऊक झाले होते.
सुमनभाईंचा खेळकर, थट्टेखोर स्वभाव मला आवडला. माझं हाक मारण्याचं नांव सोपं – राजू. पण ते मात्र मला प्रेमाने ‘पोरग्या’ म्हणत. ते अगदी मोकळेपणे गप्पा मारत, वयाची सारी बंधनं तेव्हा गळून पडत. स्टुडिओच्या बाहेरच्या जेमतेम साठ-सत्तर चौरस फुटांच्या व्हरांड्यात ते आणि कदम काम करीत. तिथेच एका कोपऱ्यात डार्करूम बनवली होती, तिथे फोटो कागदावर छापण्याचं काम कसं चालतं, ते त्यांनी मला दाखवलं. आत लगेच मुख्य खोलीत काउंटर आणि येणाऱ्यांना बसण्यासाठी सोफा असे. काउंटरच्या मागे नाना बसत, त्यांना भेटण्यासाठी मोठमोठे प्रतिष्ठित लोक येत. माझ्याशी गप्पा मारताना त्या साऱ्यांच्या उपस्थितीचं भान मात्र सुमनभाई कधी विसरले नाहीत.
अशीच आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. छायाचित्रकाराच्या व्यवसायात महिलांचा संबंध ग्राहक म्हणून येणं अटळ आहे. सुमनभाई तसे बिनधास्त बोलणारे, पण महिला ग्राहक असो वा पुरुष, त्यांच्या तोंडून कधी अपशब्द आला नाही.
कॉलेजमध्ये आणि नंतर ‘आयटीआय’मध्ये देण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो काढायचा असला की ते स्वतः काढत, अगदी मनासारखा. त्याचं बिल विचारलं की दोन वडापाव असं सांगत- एक स्वतःसाठी नि दुसरा कदमांसाठी. नि त्याचे पैसे मात्र मला देऊ देत नसत, आपणच देत!
स्टुडिओत फोटोसाठी पार्श्वभूमी तयार करण्याचं निरनिराळ्या प्रकारचं साहित्य होतं. त्यात चंदेरी रंगाची एक मोठी लाकडी चंद्रकोर बसवलेलं स्टूल होतं. मी सुमनभाईंना विचारलं, हे कशासाठी? त्यांनी उपयोग सांगितला, मग एकदा एका महिलेच्या डोहाळजेवणाच्या समारंभाचं छायाचित्रण करायचं होतं, तेव्हा सोबत मला घेऊन गेले. समारंभ घरीच होता. तिचे निरनिराळ्या पोझमधले फोटो काढून परतलो. तीन-चार दिवसांनी मला त्यांनी ते फोटो दाखवले, त्यात एका फोटोत ती स्टुडिओतल्या चंद्रकोरीवर बसलेली दिसली. मला नवल वाटलं. म्हटलं, हे कसं काय? मग त्यांनी तिचा घरच्या स्टुलावर बसलेला मूळ फोटो आणि हा नवा फोटो यांच्यातले बारकावे दाखवून ते कसं केलं ते समजावून सांगितलं. आतासारखे संगणक नसताना त्या वेळचे कलावंत छायाचित्रकार हे ‘मिक्सिंग’ किती कौशल्याने करत ते आता आठवलं की आश्चर्य वाटतं.
अधूनमधून ते मला सोबत नेत. विजय सुपर स्कूटरवरून आम्ही जात असू. मला स्कूटर थोडी थोडी चालवता येत होती, पण ते सराईतपणे चालवताना वळणावर कलती करत ते आठवतं. त्यावेळी व्हिडीओ नव्हते. फोकस धरण्यासाठी सुमनभाईंना मी मदत करत असे. प्रत्येक वेळी मला ते काम करायलाच नेत असं नाही, कधीकधी ते मला सहजच घेऊन जात. मला नवी ठिकाणं माहीत व्हावी, असंही त्यांना वाटत असावं. असेच एकदा ते मला ‘आकाशवाणी’ केंद्रात घेऊन गेले. तिथे आमच्या कॉलेजमधल्या मेनन बाई आणि शेंड्ये बाई एका स्टुडिओत गोल टेबलाशेजारी बसल्या होत्या. त्यांचं चर्चेच्या पोझमधलं छायाचित्र काढलं. ‘आकाशवाणी’ केंद्र पाहायला मिळाल्याचं केवढं अप्रूप मला वाटलं तेव्हा! पुढे त्याच टेबलाशेजारी बसून माझ्या कितीतरी ‘टॉक’ नि मुलाखतींचं ध्वनिमुद्रण व्हायचं विधिलिखित होतं, याचा पुसटसा अंदाजही त्यावेळी आला नाही, येण्याचं कारण नव्हतं. पण जेव्हा जेव्हा त्या स्टुडिओत गेलो तेव्हा तेव्हा सुमनभाईंची आठवण आली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी बरीच वर्षं पुण्यात राहिलो. रत्नागिरीस परतलो तेव्हा सुमनभाईंनी लांज्याला स्वतःचा स्टुडिओ सुरू केल्याचं समजलं. मग एकदा भेटायला गेलो, त्यांना इतका आनंद झाला! मला मिठी मारून त्यावेळीही ते ‘पोरग्या’ म्हणाले. मलाही ते आवडलं, पण त्यानंतर मात्र कधीच नाही, ते मला अहोजाहो करू लागले. त्यांची मुलं मोठी होऊन हाताशी आली होती. एक मुलगा परदेशी नोकरीला गेला होता, तो आता पुण्यात असतो. दुसरा विनय छायाचित्रणाचा व्यवसाय पुढे चालवतो.
लांज्याला स्थायिक झाल्यावर सुमनभाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू प्रकट झाले. ते उत्तम छायाचित्रकार होते, मधुरभाषी व्यावसायिक होते, तितक्याच फटकळपणे आणि बिनधास्तपणे राजकारण्यांवर शाब्दिक आगपाखड करणारेही होते. पत्रकाराच्या अंगी जो निडरपणा आणि स्पष्टवक्तेपणा असावा लागतो, तो त्यांच्यात पुरेपूर होता. पुढाऱ्यांच्या तोंडावर विरोध करायला ते कमी करत नसत. अगदी बारीक शरीराच्या या माणसाकडे एवढं धारिष्ट्य येतं कुठून, असं वाटे. लांजा शहरातल्या सार्वजनिक कार्यातही त्यांचा सहभाग असे. तिथल्या प्रतिष्ठित नागरिकांमध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्थान मिळवलं.
आता सुमनभाई गेले. रत्नागिरीच्या ‘छाया स्टुडिओ’च्या श्रेणीतला आणखी एक दुवा निखळला. बऱ्याच वर्षांत त्यांची भेट झाली नव्हती. करोनामधून बरे झाल्यावर मुलाला फोन केला, तेव्हा ते रुग्णालयात दाखल झाले होते. बरे झाले की एकदा लांज्याला जाऊन त्यांना भेटावं हे मनातच राहून गेलं.
- राजेंद्रप्रसाद स. मसुरकर, रत्नागिरी
- (९९६०२४५६०१)
………..
एका समीक्षकाचे जाणे …
कोणाचाही मृत्यू दुःखकारकच असतो. पण काही व्यक्तींच्या मृत्यूने मात्र रितेपण येते. काल, ४ ऑगस्ट रोजी भाई बुटाला यांचे निघून जाणे माझ्याकरिता तरी असे आहे. खरे तर मी काही त्यांच्या फार आतल्या वर्तुळात नव्हतो, पण चांगली ओळख होती. पुढे त्यांचे चिरंजीव विनय बुटालांसोबत माजी विद्यार्थी संघटनेत सक्रियपणे काम करताना आमची मैत्री अधिक बहरली. यापाठी माझी पत्रकारितेतील आवड आणि त्यांच्या या क्षेत्रातील दीर्घ अनुभव हा समान धागा अधिक कारणीभूत होता.
रत्नागिरीतील गोखले नाक्यावरच्या छाया फोटो स्टुडिओत फोटोग्राफीचे प्राथमिक धडे गिरवत या व्यवसायातील तंत्रे आत्मसात केल्यानंतर साधारण ३४वर्षांपूर्वी २२ डिसेंबर १९८६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय ऊर्फ भाई विठ्ठलदास बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजवासीयांना छायाचित्रणाचे दालन खुले केले. तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही, ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येते, हे छायाचित्रणकलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांमध्ये रुजवले. या छोट्याशा शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचे काम केले. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या अलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो, आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. यावेळी हमखास सांगितले जाते – “अहो, हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओचे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”
तो काळ छायाचित्रकारांसाठी तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या, नंतर फोटोपेपरवर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणापर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छायापत्रकार (प्रेस फोटोग्राफर) म्हणून कामही केले. शब्दांत बातमी सांगण्याच्या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या. छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालांनी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.
पत्रकाराला एखाद्या गोष्टीचे समीक्षण करता आले पाहिजे, योग्य ते योग्य म्हणताना चुकीच्या गोष्टींवर आपली लेखणी निर्भिडपणे चालविता आली पाहिजे, असे सांगणाऱ्या भाईंनी अनेक राजकीय पुढाऱ्यांना परखड शब्दांत सुनावताना मागे-पुढे पाहिले नाही. त्यांच्या स्टुडिओत सामाजिक क्षेत्रांत काम करणारा एखादा नवखा सामाजिक कार्यकर्ता फोटो काढायला आला की, निरपेक्ष कार्यकर्ता कसा असावा याच्या मार्गदर्शनासोबतच अगोदर कुटुंबाकडे पाहा, असा प्रेमळ वडिलकीचा सल्लाही असायचा. निर्भीड, निःस्वार्थी, परखड, बाणेदार भाई लांज्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांचे खरेखुरे समीक्षक होते!
असे म्हणतात की, छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटते आणि नंतर ते कॅमेराबद्ध होते. यासाठी छायाचित्रकाराला वेगळे मन असावे लागते. अचूक आणि चौफेर नजर असावी लागते. तत्परतेबरोबरच वेळेचे भान असावे लागते. हे सारे ज्याच्याकडे असते, तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. भाई बुटाला यासंदर्भात परिपूर्ण छायाचित्रकार होते. त्यामुळेच छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचले आहे.
कॅमेराच्या पाठीमागे उभे राहूनसुद्धा मनात घर करणाऱ्या भाईंनी व्यवसायासोबतच सामाजिक भान जपत विविध सामाजिक संस्थांमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठविला. व्यापारी संघटना, लांजा प्रेस क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, कोमसाप लांजा शाखा, लांजा क्र. ५ या शाळेचा शिक्षक-पालक संघ आदी विविध संस्थांमध्ये त्यांनी दखलपात्र काम केले. लांजा शहरात १९९३ मध्ये व्यापारी संघटना स्थापन झाली. व्यापाऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविणाऱ्या त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या या संस्थेचे त्यावेळी भाई बुटाला सचिव होते. या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. ज्येष्ठ नागरिक संघाचेही ते संस्थापक होते. आजचे लांज्यातील इंटरनॅशनल स्कूल अर्थात लांजा क्र. ५ या शाळेत १९९३ ला पहिला शिक्षक-पालक संघ स्थापन झाला. या संघाचे सदानंद देशमुख अध्यक्ष, तर भाई पहिले सचिव होते. शिक्षक-पालक संघाच्या माध्यमातून शाळेला त्यांनी प्रार्थना मंडप बांधून दिला. त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन सभापती स्वर्गीय आबा जाधव, तहसीलदार हिरवे साहेबांसोबत शिपोशीतील क्रांतिकारक आण्णा आठलेंच्या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होती. हा प्रार्थना मंडप हजारो मुलांच्या आयुष्यातील संस्काराच्या पायाभरणीचा साक्षीदार ठरला.
समाजातील चांगल्या कामांकडे भाईंचे बारीक लक्ष असायचे. शिष्यवृत्ती परीक्षेत लांज्यातील मुलांनी ९० च्या दशकात देदीप्यमान कामगिरी केली. त्यामागे काही शिक्षकांची मेहनत होती, हे अचून हेरलेल्या भाईंनी प्रेस क्लबच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात शिक्षकांचा सत्कार घडवून आणला. पुढे त्याचा पायंडा पडला. दरवर्षी उत्तम शिक्षकांचा सत्कार होऊ लागल्याने इतरांनाही त्याची प्रेरणा मिळाली. कोकणातील साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या स्थापनेतही त्यांचा अॅड. विलास कुवळेकर, साप्ताहिक आंदोलनचे संपादक गजाभाऊ वाघदरेंसोबत पुढाकार होता.
आम्ही समवयस्क मित्रमंडळींनी २००४ मध्ये फ्रेंड्स ग्रुपची स्थापना केली. यामध्ये रेस्ट हाउसमधील मित्रांचा जास्त भरणा असल्याने रेस्ट हाउससमोर असलेले संजय तुळसणकर यांचे जनरल स्टोअर्स हे आमचे कार्यालयच झाले होते. संध्याकाळच्या वेळेला आम्ही मित्रमंडळी संजयच्या दुकानात दांडिया स्पर्धा, दीपोत्सवाचे नियोजन करायला जमायचो. तेव्हा या दुकानामागेच राहत असलेले भाई बुटाला संध्याकाळचा फेरफटका मारायला यायचे आणि आम्हा पोरांची चाललेली ती धावपळ बघून मिश्कील हसायचे. स्वतःचे वय विसरून आमच्यात मिसळून जायचे. आपल्या तरुणपणातील सामाजिक कामातील अनुभव सांगून आम्हांला प्रोत्साहित करायचे. माझी पत्रकारितेतील आवड पाहून या क्षेत्रातील खाचखळग्यांची, आव्हानांची माहिती द्यायचे.
भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पावलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. मोठे चिरंजीव परदेशात अनेक वर्षे वास्तव्य केल्यानंतर सध्या पुणे येथे मोठ्या कंपनीत स्थिरस्थावर झाले आहेत.
सर्व काही ठीक असताना असे अघटित घडले. आज सकाळी त्यांचे जिवलग मित्र राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक सुर्वे गुरुजींना फोन केला, तेव्हा, ‘माझा निस्वार्थी मित्र मला कायमचा सोडून गेला’ असे म्हणत त्यांनी फोनवरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांचा कातर आवाज आणि अश्रू त्यांचे मित्रप्रेम आणि निःस्वार्थी भाईंचे मोठेपण अधोरेखित करीत होते. गेला महिनाभर मृत्यूशी झुंज देणारे भाई जातानाही तडफेने लढले. चांगली चांगली माणसे मनाला चटका देऊन निघून जातात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जीवनाच्या या खेळात अखेर नियती जिंकली. लांजावासीयांचा निःस्वार्थी, निःस्पृह, खराखुरा समीक्षक कायमचाच आसमंतात निघून गेला.
स्वर्गीय भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
- विजय हटकर, लांजा
- (८८०६६३५०१७)

