रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही – जिल्हाधिकारी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराची बाधा झालेले सोळा रुग्ण आढळले असून सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

श्री. पाटील म्हणाले, गेल्या जून महिन्यापासून चार ऑगस्टपर्यंत करोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या १६४ जणांच्या स्वॅबचे नमुने दिल्लीतील प्रयोगशाळेमध्ये पाठविले होते. त्यापैकी सर्वांत अखेरचा अहवाल गेल्या १५ ऑगस्ट रोजी आला आहे. त्यानुसार या महिन्याच्या सुरुवातीला बरे झाल्याने घरी पाठविलेल्या रुग्णांपैकी ५५ आणि ३४ वर्षे वयाच्या दोन महिला आणि ४० वर्षे वयाच्या एका पुरुषाला डेल्टा प्लसची लागण झाली होती. मात्र संबंधित रुग्ण बरे झाल्याने गेल्या ३ ऑगस्ट रोजी आपापल्या घरी गेले. त्यांच्यामध्ये आता कोणत्याही तऱ्हेची लक्षणे नाहीत. जिल्ह्यात आढळलेले डेल्टा प्लसचे सर्व १६ रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. नुकतीच बाधा झाल्याचे निष्पन्न झालेल्या धामणी आणि आंगवली या दोन्ही गावांमधील सर्वांच्या करोनाविषयक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. धामणीमध्ये ८ तर अंगवली येथे २६ टक्के नागरिकांचे करोनाप्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असले तरी त्या सर्वांची लक्षणे किरकोळ स्वरूपाची होती. गंभीर प्रकारचा एकही रुग्ण आढळलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असला तरी त्यापैकी दोघे जणच रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. एक रुग्ण मुंबईत राहत असला तरी त्या रुग्णाच्या आधार कार्डवर रत्नागिरी जिल्ह्यातील पत्ता असल्यामुळे तो रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे राज्याच्या अहवालात म्हटले आहे. संगमेश्वर तालुक्यातच अधिक रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

केंद्र सरकारकडून मिळालेल्या व्हेंटिलेटरपैकी निम्मे व्हेंटिलेटरमध्ये बिघाड झाल्याचे माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी अलीकडेच सांगितले होते. त्याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी म्हणाले की, आतापर्यंत २६ व्हेंटिलेटर केंद्र सरकारकडून मिळाले असून त्यापैकी दापोलीतील दोन व्हेंटिलेटर नादुरुस्त झाले ही वस्तुस्थिती आहे. ते दुरुस्त करण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे इतर व्हेंटिलेटर वापरात आलेले नाहीत. त्यामुळे त्याविषयाची माहिती मिळालेली नाही.

रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात गेल्या ८ ऑगस्ट रोजी एका करोनाबाधित ८६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची तक्रार संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली होती. त्याला दाद दिली गेली नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, कालच मी त्याबाबत चौकशी केली असून जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे. तेथे काम करणाऱ्या एका कंत्राटी कामगाराने ते दागिने आपल्याकडे ठेवले होते. चौकशीनंतर त्या कामगाराने सर्व दागिने परत केले असून ते मृत महिलेच्या नातेवाईकांना परत करण्यात आले आहेत. तसेच संबंधित कंत्राटी कामगाराला तातडीने सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील करोनाप्रतिबंधक लसीकरणाविषयी विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दुसरा डोस देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ६० वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठी ठिकठिकाणी लसीकरण सत्रे आयोजित करावीत, अशी सूचना देण्यात आली आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे तेथे ऑनलाइन नोंदणी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावरच नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply