मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची देवरूखला स्पर्धा

रत्नागिरी : मातीकामामध्ये नवीन कलाकार घडवण्यासाठी संगमेश्वर तालुका गणेशमूर्तीकार संघटना आणि देवरूख येथील डी-कॅड कला महाविद्यालयाने येत्या १० ऑक्टोबर रोजी मातीची गणेशमूर्ती बनवणे स्पर्धा आयोजित केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

स्पर्धा संगमेश्वर तालुक्यापुरती मर्यादित असून पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी एक गट आणि खुला गट अशा दोन गटांत होणार आहे. यासाठी सकाळी १० ते २ अशी वेळ देण्यात आली आहे. प्रवेश शुल्क १०० रुपये असेल.

स्पर्धेसाठी संयोजकांकडून फक्त माती पुरवण्यात येणार आहे. पहिल्या गटासाठी ६ ते ८ इंच आणि खुल्या गटासाठी १२ इंच मूर्ती बनवणे बंधनकारक असेल. दोन्ही गटात प्रथम तीन क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढले जाणार आहेत. भेटवस्तू, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप असेल.

डीकॅड कलामहाविद्यालयातर्फे आणि गणेशमूर्तीकार संघटनेतर्फे विविध स्पर्धा आयोजित करून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. ही स्पर्धा त्याचाच एक भाग आहे. संगमेश्वर तालुक्यात २५० गणेशमूर्तीकार आहेत. त्यांची कला पुढेही जोपासली जावी, हा स्पर्धेचा उद्देश आहे. शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहे. त्यामुळे पर्यावरणपूर्वक मातीची गणेशमूर्ती तयार करता यावी, नवीन पिढीला ही माहिती व्हावी, हा उद्देश स्पर्धेमागे आहे.

स्पर्धेनिमित्ताने डी-कॅड देवरूख येथे सरस्वतीपूजन सोहळा होणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील गणेशमूर्तीकारांच्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि बक्षीसवितर ११ ऑक्टोबरला होणार आहे. नामवंत मूर्तिकार गणेशमूर्ती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. यावेळी उद्योजक अजय पित्रे आणि व सौ. भारती पित्रे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

अधिक माहितीसाठी डी-कॅडचे प्राचार्य रणजित मराठे (7774859212), हुमणे गुरुजी (94058187001) , गिरीश भोंदे (9860191500), राजेंद्र जाधव (9423292953) आणि संदीप घडशी (9405068986) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला रणजित मराठे, हुमणे गुरुजी, नरेंद्र भोंदे, राजेंद्र जाधव, दत्ता शिंदे उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply