चिपळूणचा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा नव्या रूपात

चिपळूण : येथील मूर्तिकार कै. रघुवीर कापडी यांनी १९३० च्या दरम्यान ब्रॉन्झमध्ये साकारलेल्या महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याला फायबरमध्ये रूपांतरित करण्याचे कार्य शिरगाव (ता. चिपळूण) येथील तरुण शिल्पकार संदीप ताम्हणकर यांनी पूर्ण केले आहे. या नव्या पुतळ्याचे अनावरण येत्या शनिवारी (२ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या सुरेश भार्गव बेहेरे कलादालनात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे.

कै. कापडी यांनी देवळांमध्ये रेखाटलेली रामायण, महाभारतातील रावण-जटायु युद्ध, श्रीरामाने पदस्पर्शाने शिळेतून मुक्त केलेली अहल्या, सोबत सीता, भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपूचा वध, मार्कंडेयाची यमपाशापासून सुटका करणारे शंकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ल्याकडे निर्देश करीत असलेले घोड्यावरील चित्र आदी अवीट आनंद देणारी असंख्य भित्तीचित्रे तासन्तास पाहावीत अशी असायची. आध्यात्मिक अभ्यास असलेल्या कापडी यांनी आपल्या एकाग्रतेच्या बळावर अनेक उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या होत्या. नाटकात काम करण्याची आवड असलेल्या कापडी यांनी मामा वरेरकर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘कुंजविहारी’ नाटकात श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. फैजपूर येथे १९३६ साली भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात ते निमंत्रित म्हणून सहभागी झाले होते. त्यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेला महात्मा गांधींचा पूर्णाकृती पुतळा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना होता. कापडी कुटुंबीयांनी हा पुतळा लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाला दिल्यानंतर २००७ साली गांधी जयंती दिनी ज्येष्ठ संपादक निशिकांत जोशी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. मूळ पुतळ्याला खूप वर्षे झाल्याने आता वाचनालयाने त्याचे रूपांतर मूळ पुतळ्यात कोणताही बदल न करता फायबरमध्ये केले आहे.

त्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार रमेश कदम, सन्माननीय अतिथी म्हणून प्रशांत यादव उपस्थित राहणार आहेत. यावेळी मूर्तिकार कै. कापडी यांचे चिरंजीव उल्हास कापडी आणि शिल्पकार संदीप ताम्हणकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. करोनाचे सर्व नियम पाळून निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, असे वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आणि उपाध्यक्ष धनंजय चितळे यांनी कळविले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply