रत्नागिरी : पुण्यातील आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यासाठी डेरवण (ता. चिपळूण) येथे येत्या ७ ऑक्टोबरला क्रीडा नैपुण्य चाचणी घेतली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय आणि ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार आणि अद्यायावत क्रीडासुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. याकरिता राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि पुण्यातील आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस् कंपनीतील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १० ते १४ या वयोगटातील फक्त मुलांकरिता ॲथलेटिक्स, आर्चरी, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग तसेच ८ ते १२ वयोगटातील मुलांकरिता डायव्हिंग आणि १३ ते १४ वयोगटासाठी ट्रायथलॉन या खेळाच्या क्रीडानैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता डेरवण (ता. चिपळूण) येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात या चाचण्या होतील. त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा संकुल, बाफना मोटर्सजवळ, टीआरपी बस स्टॉप, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी येथे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंनी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजता उपस्थित राहणे बंधनकारक राहील. खेळाडूंचे वय १ जानेवारी २०२२ रोजी ८ ते १४ वर्षे असणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंनी आधारकार्ड, जन्म दाखल्याचा पुरावा (बोनाफाइड सत्यप्रत) या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सचिन मांडवकर (क्रीडा मार्गदर्शक – ८४०८८६५८७०), विशाल बोडके (क्रीडा अधिकारी – ९८९०९१९२९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
