रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाई जयंती उद्या (दि. १९ नोव्हेंबर) रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे आगळ्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे.
गेली तीन वर्षे संघामार्फत हा स्फूर्तिदायक दिवस साजरा केला जातो. दरवर्षी एका शाळेत मुलींचे खेळ, संगीत, वक्तृत्व स्पर्धा घेऊन यशस्वी विद्यार्थिनींना रोख बक्षिसे दिली जातात. सर्व विद्यार्थ्यांना राणी लक्ष्मीबाईची चरित्र पुस्तिका दिली जाते, शाळेला राणीची एक तसबीर दिली जाते. सिकंदराबादमध्ये राहणारे विश्राम नानिवडेकर यांनी दिलेल्या देणगीतून त्या शाळेला आवश्यक असलेली अडीच हजार रुपयांची पुस्तके देणगी म्हणून दिली जातात.
गेल्या वर्षी कोविड निर्बंधांमुळे कार्यक्रम साजरा करता आला नाही. मात्र यावर्षी गोळप-शिरंबाड (ता. रत्नागिरी) येथील शाळेत सकाळी साडेआठ वाजता कार्यक्रम होणार आहे. अविनाश काळे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडणार आहे. तत्पूर्वी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात सकाळी साडेसात वाजता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media