मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण तालुका शाखेचा बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार मालवण तालुक्यातील आचरे येथील यशराज प्रेरणा या युवा संघटनेला जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, पुरस्कार वितरण बॅ. नाथ पै यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार, दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी आचरे येथे होणार आहे. पुरस्कार वितरण बॅ. नाथ पै यांचे जवळचे स्नेही बाबूकाका अवसरे (मालवण) यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग), लक्ष्मीकांत खोबरेकर (सचिव, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण), सुजाता सुनील टिकले (कथामाला कार्यकर्त्या), प्रणया टेमकर (सरपंच, आचरे) आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पांडुरंग गुरुदास कोचरेकर (कथामाला, मालवण) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सध्या बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. लोकशाहीचे कैवारी, कोकण रेल्वेचे प्रेरणास्थान, उत्कृष्ट संसदपटू आदी अनेक बिरुदे लाभलेल्या या लोकनेत्याला युवक आणि युवती यांच्याबद्दल नितांत आदर होता. प्रत्येक देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ हा त्या देशातील युवकांच्या सळसळत्या धमन्यांवर अवलंबून असतो. युवकांना योग्य वेळी प्रोत्साहन दिले तर ते देश बदलू शकतात, देशात खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणू शकतात, असे बॅ. नाथ पै यांचे मत होते. म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात साने गुरुजी कथामालेच्या वतीने सुजाता टिकले (कणकवली) यांनी हा पुरस्कार प्रायोजित केला होता. निवड समितीमार्फत या संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यशराज प्रेरणा ही युवा संघटना गेली सात-आठ वर्षे आचरे पंचक्रोशीत शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण प्रबोधन, आपत्तीग्रस्तांना मदत, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक आदी विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. करोना कालखंडातही या संघटनेने अनेक उपक्रम राबवून सामाजिक भान राखले आहे. ‘सेवा तेथे युवा’ हे त्या संघटनेचं ब्रीदवाक्य असून, त्या ब्रीदवाक्यानुसार त्यांची वाटचाल चालू आहे.
या युवा संघटनेचं अभिनंदन करताना सुरेश श्यामराव ठाकूर (अध्यक्ष, साने गुरुजी कथामाला, मालवण) म्हणाले, ‘बॅ. नाथ पै यांचे साने गुरुजी कथामालेशी आणि प्रकाशभाई मोहाडीकरांशी फारच निकटचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अधिवेशनात बॅ. नाथ पै उपस्थित होते. ते अधिवेशन महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्याविषयीची आठवण यदुनाथ थत्ते यांनी आपल्या भाषणात सांगितली होती. त्यामुळे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला नाथ पै युवाशक्ती पुरस्कार यशराज प्रेरणा युवा संघटनेला मिळत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे.’
पुरस्काराबाबत भावना व्यक्त करताना मंदार सरजोशी (अध्यक्ष, यशराज प्रेरणा युवा संघटना) म्हणाले, ‘बॅ. नाथ पै यांच्या नावाचा साने गुरुजी कथामालेचा युवाशक्ती पुरस्कार आम्हाला जाहीर झाला हे ऐकून आम्ही सर्व कार्यकर्ते रोमांचित झालो. आम्ही गेली सहा-सात वर्षे समाजाचे देणे या नात्याने एकत्र येऊन हे कार्य करत आहोत. या पुरस्काराने आम्हाला आणखी जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. बॅ. नाथ पै पुरस्काराची शान आणि मान उंचावण्यासाठी यशराज प्रेरणा युवा संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता जबाबदारीने कार्यरत राहील.’
यशराज प्रेरणा युवा संघटनेला कथामालेचा नाथ पै पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
(बॅ. नाथ पै यांच्याविषयी सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख वाचा खालील लिंकवर)
(बॅ. नाथ पै यांच्यासह सिंधुदुर्गातील २२ साहित्यिकांविषयीची माहिती देणाऱ्या सिंधुसाहित्यसरिता या छापील पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. पुस्तक घरपोच मागविण्यासाठी https://wa.me/919850880119 या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअॅपद्वारे ऑर्डर नोंदवू शकता. ई-बुक गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध असून, त्याची किंमत १५० रुपये आहे. ई-बुक खरेदीसाठी https://bit.ly/2IlFV7C या लिंकवर क्लिक करा.)
-
साप्ताहिक कोकण मीडिया – २५ फेब्रुवारी २०२२ चा अंक₹ 10.00
-
सिंधुसाहित्यसरिता₹ 200.00
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड