रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनेलचे वर्चस्व कायम

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांसाठी दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पाच जागा सत्तारूढ सहकार पॅनेलला, तर दोन जागा विरोधी सदस्यांना मिळाल्या. संचालक मंडळाच्या २१ पैकी १९ जागा जिंकून सहकार पॅनेलने आपले वर्चस्व मात्र कायम राखले आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकांच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलने बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले. मात्र ते फोल ठरले. सहकार पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. राहिलेल्या सात जागांसाठी गेल्या शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर) प्रत्यक्ष मतदान झाले. निवडणुकीत चौदा उमेदवार असल्याने सर्व सरळ लढती होत्या. त्यामध्ये निवडणुकीत सहकार पॅनेलच्या पाच उमेदवारांनी बाजी मारली, तर दोघांना पराभव पत्करावा लागला. विरोधी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. विद्यमान तीन संचालकांना पराभवाचा धक्का बसला आहे. विरोधी पक्षाचे अजित यशवंतराव, लांजा तालुका भाजपा अध्यक्ष महेश ऊर्फ मुन्ना खामकर प्रथमच संचालक म्हणून निवडून आले आहेत.

शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी नऊ वाजता जिल्हा सहकार उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे, निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ वाजता जिल्हा नगर वाचनालयात सुरू झाली. दोन तासांत सात मतदारसंघातील मतमोजणी संपली.

जिल्हास्तरीय विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारुती कांबळे यांना ६९२ मते, सचिन चंद्रकांत बाईत यांना १६४ मते मिळाली. कांबळे ५२८ मतांनी निवडून आले. जिल्हास्तरीय मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते यांना ४८ मते, राकेश श्रीपत जाधव यांना ४५ मते मिळाली. विद्यमान संचालक मोहिते केवळ तीन मतांनी निवडून आले आहेत.
जिल्हास्तरीय नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज यांना ६६ मते, ॲड. सुजित भागोजी झिमण यांना ५६ मते मिळाली. विद्यमान संचालक रेडीज १० मतांनी निवडून आले.

जिल्हास्तरीय दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण यांना १० मते, अजित रमेश यशवंतराव यांना २५ मते मिळाली. यशवंतराव १५ मतांनी निवडून आले. रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील यांना ३३ मते, प्रल्हाद महादेव शेट्ये यांना ८ मते मिळाली. पाटील २५ मतांनी निवडून आले. लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना १६ मते, महेश रवींद्र खामकर यांना १८ मते मिळाली. भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर केवळ दोन मतांनी निवडून आले.

गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी यांना १३ मते, चंद्रकांत धोंडू बाईत यांना ८ मते मिळाली. जोशी ५ मतांनी निवडून आले. विद्यमान संचालक चंद्रकांत बाईत, गणेश लाखण, आदेश आंबोळकर यांना पराभूत झाले.

जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, सुधीर कालेकर, जयवंत जालगावकर, रमेश दळवी, ॲड. दीपक पटवर्धन, महादेव सप्रे, मधुकर टिळेकर, अमजद बोरकर, राजेंद्र सुर्वे, रामचंद्र गराटे, सौ. नेहा माने आणि सौ. दिशा दाभोळकर हे सर्वपक्षीय १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत बाईत, त्यांचे सुपुत्र तथा शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत या दोघांना पराभव पत्करावा लागला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply