दापोलीत फेब्रुवारीमध्ये कृषी विद्यापीठाचा ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा

रत्नागिरी : चालू शैक्षणिक वर्षात पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करत असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे येत्या फेब्रुवारी महिन्यात ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा भरवण्यात येणार आहे. शेतीविषयक प्रदर्शने, परिसंवाद, प्रात्यक्षिके आणि विद्यापीठ क्षेत्राचे दर्शन घडवणारी प्रदक्षिणा अशा विविधांगी उपक्रमांची मेजवानी असलेल्या या मेळाव्यातून विद्यापीठाचे गेल्या पन्नास वर्षांतील कार्य आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल, असे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, गेल्या पन्नास वर्षांत केलेले शैक्षणिक कार्य आणि संशोधन यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत नेणे हे या मेळाव्याच्या आयोजनामागील उद्देश असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. शेतीमधील उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेची शेतकऱ्यांना ओळख होण्यास तसेच कृषी विद्यापीठ, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधण्यात हा मेळावा महत्त्वाची भूमिका पार पाडील असे कुलगुरू म्हणाले.

‘सुवर्ण पालवी २०२२’ नावाच्या या मेळाव्याची माहिती देताना विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. संजय भावे म्हणाले की, वेगवेगळ्या कृषी मालाचे उत्पादन वाढविण्यासंबंधी आणि हवामान बदलांबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न मेळाव्यातून केला जाईल. विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दरवर्षी प्रसिद्ध होणारी ‘कृषी दैनंदिनी’ यंदा तीस रुपयांऐवजी वीस रुपयांत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.

या विराट शेतकरी मेळाव्यातील कार्यक्रमांची माहिती मेळाव्याचे समन्वयक डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या प्रांगणात हा मेळावा २०२२ च्या फेब्रुवारीच्या १० ते १४ तारखांना होईल. सुमारे एक लाख शेतकरी व नागरिक या मेळाव्याला भेट देतील, असा अंदाज विद्यापीठातर्फे वर्तविण्यात आला. ‘पितांबरी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स’ हे या मेळाव्याचे मुख्य प्रायोजक असतील आणि शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंट प्रा. लि. या कराड येथील उद्योगतर्फे मेळाव्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यात येईल. राज्यातील इतर तीन कृषी विद्यापीठे, शासनाचे विविध विभाग, कृषी क्षेत्रातील उद्योग व उद्योजक यांबरोबरच इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स आणि शेतीविषयक इस्रायली तंत्रज्ञानातील जाणकार कंपन्यांचा सहभाग ही मेळाव्यातील महत्त्वाची बाब असेल.

विद्युतशक्तीवर चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपयोगाचे दालन हे या मेळाव्यातील एक महत्त्वाचे आकर्षक असेल. मेळाव्यानिमित्त भरविण्यात येणाऱ्या पशुधन प्रदर्शनात शेतीला साहाय्यक प्राण्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतीलच, शिवाय एक श्वान प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. त्यात विविध प्रकारचे कुत्रे आपले कलागुण सादर करतील.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply