स्वमग्नतेत आयुष्यभर रममाण झालेला चित्रकार : बाळ ठाकूर

मराठी पुस्तके आणि नियतकालिकांच्या मुखपृष्ठ रेखाटनांचे काम सुमारे साठ वर्षे करून स्वत:ची वेगळी शैली निर्माण केलेले ९२ वर्षांचे ज्येष्ठ चित्रकार भालचंद्र शिवराम ऊर्फ बाळ ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या चित्रमय जगताला वाहिलेली शब्दरूपी श्रद्धांजली.

………

चित्रकार बाळ ठाकूर यांचा जन्म २४ एप्रिल १९३० रोजी लांजा तालुक्यातील भांबेड येथे झाला. मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९४८ मध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली. जे. वॉल्टर थॉम्प्सन, अय्यर्स, उल्काअशा जाहिरात संस्थांमध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. १९५० नंतर ठाकूर मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे, मांडणी आणि संकल्पनांचे काम करू लागले. रेषेवर प्रभुत्व असल्यामुळे रेखाटने करण्याबरोबरच जलरंग वापरूनही त्यांनी चित्रे रेखाटली. साहित्याची उत्तम जाण असल्याने संबंधित लेखनाला अतिशय अनुरूप रेखाटने करण्यासाठी ते नावाजले गेले. सत्यकथा, मौज, ललित यांसारख्या मराठी साहित्य विश्वातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नियतकालिकांसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्याचप्रमाणे लक्ष्मीबाई टिळक, बालकवी, मर्ढेकर, बा. भ. बोरकरांपर्यंत अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे त्यांनी रेखाटलेली आहेत. प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांचे आत्मकथा, प्रतिबिंब, गणूराया, चानी तसेच कै. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांचीही मुखपृष्ठेही बाळ ठाकूर यांच्या कल्पनेतून साकारलेली आहेत.

लांजा तालुक्यातील भांबेड या गावचा हा सुपुत्र. त्यांच्या कुंचल्याने मराठी सारस्वतातील लेखकांच्या पुस्तकांना समर्पक आणि आकर्षक मुखपृष्ठांनी आणि रेखाचित्रांनी लोकमान्यता मिळवून दिली. मराठी साहित्य अथवा कला क्षेत्रात बाळ ठाकूर हे नाव प्रसिद्ध असले तरी त्यांचे खरे नाव भालचंद्र आणि आडनाव ठाकूरदेसाई असे आहे. गावाकडच्या लोकांचा पुस्तकांशी तसा संबंध नसल्याने, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्याचा संस्कार नसल्याने बाळ ठाकूर हे नाव गावातही तसे अपरिचितच. भालचंद्र ठाकूरदेसाई माहीत असल्याने आणि बाळ ठाकूर हे प्रसिद्धीपासून हजारो कोस दूर असल्याने त्यांनी स्वत:बद्दल कधी कुणाला सांगणे शक्यच नव्हते. मात्र माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याने त्यांना लोकांसमोर आणण्याचे काम यापूर्वीच करायला हवे होते, ही बोच आता लागून राहिली आहे. खरे सांगायचे, तर मलाही फार उशिरा संत साहित्यिक वामन देशपांडे यांच्याकडून ठाकूर यांच्याविषयी कळले. मी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या कार्यक्रमाकरिता त्यांना लांज्याला घेऊन आलो असताना एक दिवस रिंगण्याला माझ्या घरी मुक्काम केला. तेव्हा गप्पांच्या ओघात “इकडे भांबेड गावात मी येऊन गेलो आहे, चित्रकार बाळ ठाकूरांच्या घरी मी राहिलोय”, असे त्यांनी मला सांगितले.

बाळ ठाकूर यांचे नाव ऐकताच मला ‘बनगरवाडी’ हे पुस्तक आठवले. ते पुस्तक मी बऱ्याच वेळा वाचलेले असल्याने त्याचे मुखपृष्ठ आणि आतली रेखाचित्रे डोळ्यांसमोर उभी राहिली. पण एवढ्या मोठ्या चित्रकाराने प्रदर्शन लावल्याचे मी कधी ऐकले नव्हते. मी कधीतरी चौकशी केल्यानंतर भांबेडमध्ये ठाकूरदेसाई आडनावाचे लोक आहेत, ठाकूर नाहीत, हे समजल्याने माझी चौकशी थांबली. देशपांडे कुठल्या तरी वेगळ्या गावात येऊन गेले असावेत आणि बऱ्याच वर्षांनंतर गावाचे नाव चुकण्याची शक्यता असल्याचे मी माझे समाधान करून घेतले.

चार-पाच वर्षांपूर्वी मी लांज्याला गजाभाऊ वाघधरे यांच्याकडे असताना त्यांनी त्यांचे आत्मचरित्राचे कच्चे लिखाण मला वाचायला दिेले होते. तेव्हा लांज्याच्या न्यू इंग्लिश स्कूलला चार गाळ्यांची इमारत स्वखर्चाने बांधून देणाऱ्या भांबेडच्या शिवरामभाऊ ठाकूरदेसाईंविषयीची माहिती वाचनात आली, तेव्हा परत एकदा मला बाळ ठाकूर यांची आठवण झाली. आमचे गजाभाऊ म्हणजे लांज्याच्या इतिहासाचा चालता बोलता कोशच. त्यांनी मला सांगितले की, शिवरामभाऊंचा एक मुलगा मोठा चित्रकार आहे. तो मुंबईतच असतो. बाळ ठाकूर असे नाव लावतात ते. मी आता माहितीच्या अगदी जवळ आलो होतो.
पुढल्या खेपेला भांबेडला जायचे ठरवून मी मुंबईला आलो. कोटच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बऱ्याच वेळेला आमचे मित्र विजय हटकर यांच्यासोबत प्रवास केला. त्यांनासुद्धा आपल्या परिसरातल्या मोठ्या व्यक्तींची माहिती गोळा करणे, त्यांच्या भेटी घेणे हा छंद असल्याने आमच्या गप्पा त्याच विषयावर जास्त रंगतात. त्यांनीसुद्धा बाळ ठाकूर यांची माहिती मिळवली होती. त्यांचा नातू अमरेश हा याबाबतीत माहिती संकलनाचे काम करीत असल्याचे कळले आणि एक दिवस आम्ही भांबेड गाठले. आम्ही त्यांच्या अंगणात बसलो असताना एक ऋषीतुल्य शांत, पण हसतमुख व्यक्तिमत्त्व आमच्या समोर आले. मी तत्काळ वाकून चरण स्पर्श केला.

“अहो असे वाकू नका ” –

मंद वाऱ्याची झुळुक कानावरून जावी, तसा हळू आवाज घुमला. मला कृतार्थ झाल्याचा आनंद झाला. दर्जेदार पुस्तक निर्मिती करणाऱ्या मौज प्रकाशनची अनेक पुस्तके मी वाचली होती. ती वाचताना मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत आतील प्रत्येक पान वाचनाची सवय असल्याने बाळ ठाकूर हे नाव अनेकदा माझ्या नजरेखालून गेले होते. मोठमोठे साहित्यिक मोठ्या चित्रकारांनाच मुखपृष्ठ बनवायला देतात. त्या चित्रकारांमध्ये बाळ ठाकूर यांचे नाव होते आणि ते माझ्या मायभूमीतलेच असल्याने मला त्यांचा अभिमान वाटत असल्याने आज प्रत्यक्ष भेटीने मला परम आनंद झाला होता. मी माझा आणि हटकरांचा परिचय करून देऊन आमच्या सामाजिक कार्याची माहिती पुरविली. वृक्षाच्या शीतल छायेत मोकळेपणाने बसण्याची मजा औरच असते. तो अनुभव घेऊन पुन्हा भेटायला येऊ, असे सांगून आम्ही माघारी वळलो. ‘आपण भेटू तेव्हा आपण त्यांची मुलाखत घेऊ.’ असे ठरवून आम्ही निघालो आणि पुन्हा काही दिवसांनी आम्ही आमचा बेत फत्ते केला.

भांबेडच्या ठाकूरदेसाई या खोत घराण्यात त्यांचा जन्म झाला. वडील शिवरामभाऊ हे त्यांच्या काळातील लांजा तालुक्यातील समाजभान असलेले नामांकित व्यक्तिमत्त्व. ते सुशिक्षित असल्याने मुलांनाही शिकण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. बाळ ठाकूरही भांबेडमध्ये चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर राजापुरात मॅट्रिकपर्यंत शिकले. वडिलांना वाचनाची आवड असल्याने विविध नियतकालिके त्यांच्याकडे येत. ती बाळ यांना वाचनाची गोडी लावण्यास पूरक ठरली. घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने त्यांना राजापुरात जाऊन शिक्षण घेणे शक्य झाले. पुढे मुंबईला गेल्यानंतरही त्यांनी जे. जे.मध्ये शिक्षण घेतले. चित्रकारिता हाच त्यांचा छंद आणि चरितार्थाचा मार्ग झाला. त्यांनी आत्मा ओतून प्रत्येक चित्रकृती तयार केली म्हणून ती कसास उतरली आणि मुंबईतल्या साहित्य क्षेत्रात त्यांचे नाव झाले.

बाळ ठाकूर यांचे चित्र आपल्या पुस्तकात असणे हे साहित्यिकांना अभिमानास्पद वाटावे इतकी त्यांची प्रसिद्धी होती. पण त्याचा फायदा घेऊन मिरवण्याचे त्यांना कधीच जमले नाही. एवढी मोठी कीर्ती मिळवून ते मात्र सर्वांपासून अलिप्त राहिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव करावा, म्हणून राजापूर- लांजा तालुका नागरिक संघाने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे नुकतेच घोषित केले. त्यांची भेट घेऊन त्यांना हे वृत्त सांगण्याचा दिवस ठरलेला होता. त्या दिवशी भांबेड हायस्कूलला कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असताना ते आजारी असल्याचे कळले. तेव्हा जयराज मांडवकर आणि मंगेश चव्हाण यांच्या सोबत त्यांच्या घरी पोहोचलो. ते फक्त द्रवपदार्थच घेताहेत, हे ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते झोपलेले असल्याने आम्हांला अर्धा तास थांबावे लागले. मी लगेच त्यांच्याच बागेतले गुलाबाचे फूल घेतले. ते उठले असल्याचे त्यांचा नातू अमरेशने सांगितल्याने आम्ही त्यांच्याजवळ गेलो. ते उठून छानपैकी मांडीवर मांडी ठेवून एखाद्या स्वामीसारखे बसले. त्यांनी मला आपल्या बाजूलाच बसायला सांगितले. आम्ही दिलेले फूल त्यांनी हसत हसत हातात घेतले. त्या फुलासारखे मंद स्मित त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले पाहून ते आजारी आहेत हे खरेच वाटत नव्हते.

मी त्यांना संघाच्या साहित्य संमेलनाची माहिती दिला. “तुम्हाला जीवनगौरव देणार आहोत”, हे सांगितले तेव्हा “मी काही एवढा मोठा नाही” असे सहज म्हणाले.

“कोणालाही स्वत:ची उंची मोजता येत नाही, ती दुसऱ्याकडून समजते.” माझे बोलणे ऐकताच ते हसले. त्यानंतर त्यांचे न बोलताच त्यांचं शांत राहणे मला अस्वस्थ करून गेले.

“तुम्हाला आम्ही संमेलनात घेऊन जाणार आहोत. तुम्हाला यायचं आहे, हे लक्षात ठेवा आणि तुमची तब्बेत खडखडीत बरी होणार आहे. काळजी करू नका”, असा सकारात्मक संवाद साधत मी बाहेर पडलो.

ती ३ जानेवारीची दुपार मला आशादायक वाटली. आम्ही त्यांचा निरोप घेतला.

त्यानंतर ७ जानेवारीला मला कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर मुलुंडच्या मराठा मंडळात भेटले. त्यांनाही मी बाळ ठाकूर यांच्या तब्बेतीबद्दल बोलून लवकरच त्यांची भेट घेण्याचे सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी, ८ जानेवारीला मलाच त्यांना बाळ ठाकूर यांच्या निधनाची बातमी सांगताना फारच दु:खद वाटले.

आयुष्यभर मुंबईत राहिलेले चित्रकार बाळ ठाकूर आपल्या भांबेड येथील घरात स्वमग्न जीवन जगत होते. त्यांना पाहिल्यानंतर ‘जळात पाय टाकून बसलेल्या औदुंबराचा’ भास व्हायचा आणि आपसूक नम्रतेने हात जोडले जाऊन त्यांच्या पवित्र चरणांवरती माथा टेकायचा, ते कृतार्थ हात अलगद डोक्यावरून फिरायचे. आता ते चरण दिसणार नाहीत. तो कृतार्थ हातांचा स्पर्श होणार नाही.

एवढी मोठी कीर्ती मिळवून ते स्वतः मात्र सर्वांपासून अलिप्त राहिले. मराठी साहित्यविश्वात आपल्या कुंचल्याने नवनवी, सुंदर, अजरामर चित्रलेणी निर्माण करुन माझ्या मायभूमीचे नाव अजरामर करणाऱ्या चित्रकार स्व. बाळ ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

  • सुभाष लाड, मुंबई
  • (98691 05734)
बाळ ठाकूर यांनी चितारलेले साप्ताहिक विवेकचे एक मुखपृष्ठ
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply