सार्थकी आयुष्य जगलेले व्यक्तिमत्त्व काशिनाथ लांजेकर

आपला जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण या दोन घटनांच्या मधले संपूर्ण आयुष्य आपल्याला जगायचे असते. ते जगताना सत्य, सचोटी, सरळमार्गी तत्त्वांच्या पाऊलवाटेवर चालत समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक संस्थांमध्ये आदर्शवत काम करून ‘सार्थकी आयुष्य’ जगण्याचे भाग्य लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे काशिनाथ लांजेकर!

………

लांजा शहरातील लोकमान्य वाचनालय या वर्धिष्णु संस्थेत गेली पंचवीस वर्षे अर्थात आपल्या कारकिर्दीची रौप्यमहोत्सवी वर्षे कार्यरत राहत लोकमान्य वाचनालयाला दिशा देणारे कार्यवाहक काशिनाथ लांजेकर यांनी मंगळवारी, ११ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता त्यांच्या बाजारपेठेतील निवासस्थानी अल्पशा आजाराने अखेरचा श्वास घेतला. यशाचा अमृतमहोत्सव यशस्वीपणाने साजरा करणाऱ्या काशिनाथ लांजेकर यांच्या अशा अकाली जाण्याने लांज्यातील अनेकांना धक्का बसला. याचे कारण काशिनाथ लांजेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन लांजा या मूळ गावी आल्यानंतर गेली पंचवीस वर्षे त्यांच्या परीने केलेले सत्कार्य !

काशिनाथ लांजेकर यांचा जन्म १ जून १९४५ रोजी झाला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. शेजारीच वास्तव्यास असलेले त्यावेळचे लांज्यातील सामाजिक कार्यकर्ते कै. ग. रा. तथा भाई नारकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला. त्यांच्या प्रभावामुळे ते जनता दल या राजकीय पक्षाकडे आकर्षिले गेले ते कायमचे! त्या काळातील आमदार आठल्ये गुरुजी, बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांसारख्या आदर्श राजकीय नेतृत्वांचा सहवास त्यांना लाभल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी ते पोषक ठरले. आयुष्यात भेटलेल्या या मोठ्या व्यक्तींच्या संस्कारांनी ते समृद्ध झाले. चुकीच्या गोष्टींवर रोखठोक भूमिका घेणे, प्रहार करणे, सत्य तेच बोलणे, प्रामणिकपणा, कोणतेही काम निष्ठेने करणे या गुणांची त्यांनी आयुष्यभर जोपासना केली.

त्या काळात शिक्षण घेतलेल्या, गुणवत्ताधारक युवकांना शासकीय सेवेत लगेचच संधी मिळत असे. तशीच संधी काशिनाथ लांजेकर यांना चालून आली. ते ग्रामसेवक म्हणून खेड तालुक्यात रुजू झाले. १९७०-८० च्या दशकात कोकणातील दुर्गम भागात ग्रामसेवक भाऊ म्हणून काम करणे तसे म्हटले तर आव्हानच होते. परंतु खंबीर मनाच्या काशिनाथ लांजेकर यांनी रत्नागिरीच्या उत्तर सीमेवर वसलेल्या खेड तालुक्यातील विविध गावांत ग्रामसेवक भाऊ म्हणून आपल्या कार्यपद्धतीची छाप पाडली. पुढे ८०-९० च्या दशकात राजापूर तालुक्यात काम करीत १९९५ मध्ये आपल्या ‘लांजा’ या मूळ गावी राहण्यासाठी आणि कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी आनंदाने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. नंतर लांजा शहरातील लोकमान्य वाचनालय, पेन्शनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थांमध्ये त्यांनी स्वत:ला वाहून घेतले.

मला वाटते, कोणत्याही संस्थेच्या वाटचालीत २५ वर्षे निःस्वार्थीपणे आपल्या परीने योगदान करणे हे त्या व्यक्तीचे समाजातील महत्त्व अधोरेखित करते. ग्रामसेवक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन लांज्यात परतलेल्या काशिनाथ लांजेकर यांची १९९६ मध्ये लोकमान्य वाचनालयाच्या कार्यकारिणीत वर्णी लागली. त्यावेळी त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या अनुभवाचा संस्थेला लाभ व्हावा, या हेतूने कार्यवाह ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. ती त्यांनी २५ वर्षे प्रामाणिकपणे पार पाडत वाचनालयाच्या विकासासाठी ते प्रयत्नरत राहिले. सुरवातीला मनोहर ऊर्फ आबा शेट्ये आणि आता विजय नारकर या दोन्ही अध्यक्षांच्या कार्यकाळात लोकमान्य वाचनालयाच्या विकासासाठी कार्यवाह म्हणून काशिनाथ लांजेकर यांनी पालक -विश्वस्ताच्या भूमिकेतून काम केले. वाचनालयाने त्यांच्या कार्यकाळातच ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त केला. जुन्या इमारतीतून नव्या टुमदार देखण्या इमारतीत प्रवेश केला. वाचनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कथाकथन, कथालेखन, पोस्टकार्ड, वक्तृत्व, निबंध लेखन स्पर्धा या उपक्रमांत विजय बेर्डे सरांसह त्यांचा सक्रिय सहभाग असे. नव्या पिढीने वाचनलयाचा उपयोग करून आपले व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे, वाचनालयातील स्पर्धा परीक्षांविषयीची मार्गदर्शनपर पुस्तके, संदर्भ ग्रंथ वाचून लांज्यातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत चमकायला हवे, अशी त्यांची इच्छा होती. पण लांज्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाचनालयातील स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेल्या पुस्तकांचा वापर करायला नवी पिढी वाचनालयात त्यामानाने कमी येते, याची खंत ते नेहमीच व्यक्त करीत.

मधल्या काळात रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे ३२ वे वार्षिक अधिवेशन १४ नोव्हेंबर २००८ रोजी लांजा बाजारपेठेतील वक्रतुंड मंगल कार्यालयात झाले. ते यशस्वी करण्यात वाचनालयाचे कार्यवाह काशिनाथ लांजेकर यांचा सहभाग मोठा होता. याचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणखी एक आठवण म्हणजे करोनाच्या वैश्विक संकटकाळात रत्नागिरीतील ग्रंथस्नेह ग्रंथवितरणचे संचालक श्रीकृष्ण साबणे यांच्या रत्नागिरीतील पुस्तकांच्या दुकानात वाचनालयासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचनालयाचे लिपिक रामचंद्र लांजेकर यांच्यासह मी गेलो होतो. त्यावेळी श्रीकृष्ण साबणेंसारख्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय जगतात दखलपात्र वावर असाणाऱ्या बुजूुर्ग व्यक्तित्त्वाने काशिनाथ लांजेकर यांचा चांगुलपणा आणि प्रामणिकपणाचा आवर्जून उल्लेख आमच्यासमोर केला. त्यावेळी अशा निष्ठावंत माणसासोबत काम करायला मिळाले, याचा आनंद मला झाला.

वाचनालयात अनेक प्रकाशक, पुस्तक विक्रेते पुस्तकविक्रीसाठी येत. त्यावेळी काशिनाथ लांजेकर दर्जेदार पुस्तके वाचनालयासाठी आणत चला, असा सल्ला त्यांना द्यायचेच, पण सोबत जास्तीत जास्त पुस्तके घेण्याचा आग्रह आम्हाला करायचे. काही प्रकाशक व पुस्तक विक्रेते आपल्याच प्रकाशन संस्थेची पुस्तके खरेदी करावीत यासाठी आर्थिक प्रलोभनही द्यायचे, मात्र काशिनाथ लांजेकर त्याला कधीच बळी पडले नाहीत. उलट संस्थेचा एक एक पैसा संस्थेच्या विकासासाठी कसा खर्च करता येईल, याकडेच त्यांचा कटाक्ष असायचा. पारदर्शकता हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू होता.
काशिनाथ लांजेकर यांनी लांजा तेली समाज सेवा संघ या त्यांच्या समाजाच्या संस्थेतही उपाध्यक्ष, अध्यक्ष पद भूषवीत समाजाच्या विकासासाठी योगदान केले. सकाळच्या वेळेत वाचनालयात एखादा फेरफटका मारणे आणि बाजारपेठेतील त्यांच्या घरापासून जवळपास ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात रोज दुपारी ४:०० नंतर चालत जाणे, शेतकीची कामे करणे ही जणू त्यांची दैनंदिनी झाली होती. या कृतीतून जमेल तेवढे या मातीवर त्यांनी प्रेम केले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वार्धक्यामुळे त्यांच्या या दैनंदिनीत खंड पडला तो कायमच… कारण ११ जानेवारी रोजी त्यांचा प्रवास अखेर थांबला…
मृत्यू शाश्वत आहे आणि जगणे ही संधी आहे, हे जाणणाऱ्या काशिनाथ लांजेकर यांना एकूणच आपल्या ७६ वर्षांच्या जीवनप्रवासात सदाचार आणि सद्वर्तनाच्या वाटेवर चालत सार्थकी आयुष्य जगण्याचे भाग्य लाभले. त्यांचा हा नि:स्पृह सेवेचा वारसा त्यांच्या पुढील पिढीतही प्रवाहित राहील, हा विश्वास वाटतो.

कै. काशिनाथ लांजेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

  • विजय हटकर, लांजा
  • (८८०६६३५०१७)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply