कलेतून रोजगार मिळवून देणारा नवा अभ्यासक्रम डी-कॅडमध्ये

देवरूख : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देवरूखच्या डी-कॅड येथे उपयोजित कला क्षेत्रात नोकरी मिळवून देणारे शिक्षण आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डी-कॅड कला महाविद्यालयात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा डिप्लोमा इन अप्लाइड आर्ट हा उपयोजित कलेशी निगडीत शासनमान्य कोर्स उपलब्ध झाला आहे. ही माहिती संचालक अजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या जूनपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन ज्यांना कलेची आवड आहे, परंतु ज्यांना कमीत कमी वेळेत मूलभूत शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळविणे गरजेचे आहे, त्यांच्यासाठी डी-कॅडने रोजगाराभिमुख डिप्लोमा चालवण्यासाठी संलग्नतेसाठी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण मंडळाशी संपर्क साधला. त्याला यश आले असून डिप्लोमा कोर्ससाठी मान्यता मिळाली आहे, असे पित्रे यांनी सांगितले.

डी-कॅड कॉलेजने कला विश्वातील बारा वर्षे पूर्ण केली आहेत. कलेचा पाया भक्कम झाला आहे. त्यात आता नव्या अभ्यासक्रमाची भर पडली आहे. हा अभ्यासक्रम जूनमध्ये सुरू होणार असून ड्रॉइंग अॅंड पेंटिंग इन अप्लाइड आर्ट, डिजिटल फोटोग्राफी, कॉम्प्युटर अॅप्लिकेशनसह ग्राफिक डिझाइन आणि मुख्य व्यावसायिक विषय म्हणून कम्युनिकेशन आणि दोन अतिरिक्त गैरव्यावसायिक वैकल्पिक विषयांचा समावेश अभ्यासक्रमात आहे. यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्याला बारावी उत्तीर्ण समतुल्य मानले जाणार आहे. ज्यांना नोकरी करायची आहे किंवा स्वंयरोजगार करायचा आहे, त्यांना जाहिरात अॅनिमेशन, प्रोफेशनल फोटोग्राफी, फिल्मआणि मीडिया इंडस्ट्री या क्षेत्रात करिअरच्या संधी या अभ्यासक्रमामुळे उपलबद्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील कलेच्या क्षेत्रात करियर करणार्‍यांसाठी (कै.) बाळासाहेब व विमल पित्रे यांनी पित्रे फांउडेशनच्या माध्यमातून क्रेडारमार्फत डी-कॅड ही शिक्षणाची व्यवस्था उभारली. डी-कॅडने बारा वर्षांत चांगले कलाकार तयार केले. याच डीकॅडमध्ये नवा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कोकणात फक्त डी-कॅडला ही संधी मिळाली आहे, असेही श्री. पित्रे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला विजय विरकर,प्राचार्य रणजित मराठे उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply