जुवाठी येथे १५ मेपासून आगळेवेगळे गम्मत जम्मत बालवाचनालय

राजापूर : मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी पाऊणशे वर्षे वयाच्या वाचनवेड्याने जुवाठी (ता. राजापूर) येथे आगळेवेगळे गम्मत जम्मत बालवाचनालय चालविले आहे.

लहान मुलांना अंगणवाडीपासूनच पुस्तकाची, वाचनाची गोडी लागावी म्हणून, मुलांवर बालपणापासून चांगले संस्कार व्हावेत यासाठी अंगणवाडी ते पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी एक खासगी बालवाचनालय सुरू करण्यात येणार आहे. सिटी सर्व्हे ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले ७५ वर्षे वयाचे विष्णू गुणाजी धुमाळे कोष्टेवाडी (जुवाठी) येथे स्वतःच्या घरात हे वाचनालय सुरू करणार आहेत. श्री. धुमाळे यांना स्वतःला वाचनवेड आहे. या वयातही ते दरमहा किमान पाच पुस्तके वाचतात. मुलांना गोष्टीची पुस्तके उपलब्ध व्हावीत, त्यांना पुस्तके आपल्या हाताने हाताळता यावीत, प्रत्यक्ष पाहून पुस्तके निवडता यावीत, मुलांना चित्रमय पुस्तकांचा आणि वाचनाचा आनंद घेता यावा, त्यातून त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, अशी श्री. धुमाळे यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यातूनच ते वाचनालय सुरू करत आहेत. मुलांना गोष्टी, बडबडगीते, थोर लोकांची छोटी चरित्रे, पूज्य साने गुरुजींची संस्कारमाला, हितोपदेश,
पंचतंत्र, विज्ञान खेळणी तयार करण्यासाठी आवश्यक माहिती देणारी पुस्तके, ओरिगामी चित्रकला, वळणदार सुंदर हस्ताक्षर काढण्याचे मार्गदर्शन करणारी पुस्तके अशी विविध पुस्तके त्यांच्या या वाचनालयात मुलांना एकत्र पाहता येणार आहेत.

“वाचेल तो वाचेल” अशा सध्याच्या काळात मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री. धुमाळे (संपर्क क्रमांक ९८६०६७३८५८) यांनी केली आहे. या वाचनालयाचे अनौपचारिक उद्घाटन येत्या रविवारी (दि. १५ मे) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

श्री. धुमाळे यांच्याशी बी. के. गोंडाळ यांनी साधलेला संवाद पाहण्यासाठी सोबतचा व्हिडीओ पाहा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply