तुटपुंज्या साधनांनिशी सायकल सराव करून जिंकला घाटाचा राजा-राणी किताब

खेड : चांगल्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीअभावी तुटपुंज्या साधनांच्या वापरातून सायकल सराव करून रत्नागिरी तरुणांनी घाटांचा राजा आणि घाटांची राणी किताब जिंकला. त्यातही दोघा सख्ख्या पालवणकर भावंडांनी पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावून वेगळाच इतिहास रचला.

नैसर्गिक जैवविविधतेने नटलेल्या चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटाचे सौंदर्य अनेकांना भुरळ घालते. या घाटातून प्रवास करताना नागमोडी वळणे, तीव्र चढण आणि एका बाजूला खोल दरी यामुळे अनेकांना हा प्रवास भयावहसुद्धा वाटतो. या घाटातून चिपळूण सायकलिंग क्लबने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साथून बहादूररशेख नाका ते कुंभार्ली घाटमाथा या मार्गावरची २९ किलोमीटरची राज्यस्तरीय सायकल स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातील अनेक नावाजलेले सायकलपटू सहभागी झाले होते. स्पर्धेतील जिल्हास्तरीय गटात दापोली सायकलिंग क्लबच्या प्रशांत पालवणकरने प्रथम क्रमांक मिळवत कुंभार्ली घाटाचा राजा किताब जिंकला. खेड सायकलिंग क्लबची आर्या कवळे कुंभार्ली घाटाची राणी बनली.

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रशांत पालवणकर यांच्याकडे चांगली गिअर सायकल नाही. तरीही न डगमगता, त्यावर मात करुन आपल्या साध्या सिंगल गिअर फिक्सी सायकलने इतर गिअरवाल्या सायकलस्वारांना मागे टाकत आणि कुंभार्ली घाटातील खतरनाक चढणे चढवत २२ किमीचे अंतर ५६ मिनिटात पार करत प्रथम क्रमांक मिळवला. त्याचा छोटा भाऊ केतन पालवणकर यानेही मोठ्या भावाचा आदर्श घेत सिंगल गिअर फिक्सी सायकलने तृतीय क्रमांक मिळवला. नोकरीधंदा सांभाळून सायकलिंगची आवड जपणाऱ्या या मेहनती पालवणकर बंधूंचे यश कौतुकास्पद आणि आदर्श आहे. जिल्हास्तरीय गटात द्वितीय क्रमांक चिपळूणच्या रोशन भुरण यांनी पटकावला.

जिल्हास्तरीय महिला गटात खेड सायकलिंग क्लबच्या आर्या कवळे हिने २२ किमीचे अंतर १ तास १५ मिनिटांत पार करत प्रथम क्रमांक मिळवत कुंभार्ली घाटाची राणी हा किताब पटकावला. द्वितीय क्रमांक दापोलीच्या मृणाल मिलिंद खानविलकरने, तर तृतीय क्रमांक चिपळूणच्या धनश्री गोखलेने पटकावला. सर्वात लहान सायकलपटू १० वर्षीय दापोलीचा सौरभ अजय मोरे, साईप्रसाद उत्पल वराडकर आणि चिपळूणचा चिन्मय सुर्वे यांनाही उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

राज्यस्तरीय गटात हनुमंत चोपडे याने २९ किमीचे अंतर १ तास ९ मिनिटांत पार करत प्रथम, सिद्धेश पाटीलने द्वितीय, तर ओंकार खेडेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. आर्यन मारळ, विठ्ठल भोसले आणि सोहेल मुकादम यांनी गुणानुक्रमे पुढचे क्रमांक पटकावले.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी म्हणून चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पहिल्याच स्पर्धेत घाटांची राणी किताब

चिपळूणच्या सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या कुंभार्ली घाटातील सायकल स्पर्धेत खेडच्या आर्या कवळे हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे स्पर्धेत प्रथमच सहभाग घेणाऱ्या आर्याने घाटांची राणी हा किताब मिळविला.त्याविषयी म्हणाली, खरे तर स्पर्धेत सहभाग घेण्याचा विचार मनात नव्हता. त्यात ७ एप्रिल रोजी बारावीची परीक्षा संपली आणि त्याच दिवशी नवीन रोडी घेतली. त्यानंतर मला अनेकांचे मेसेज येत होते की तू स्पर्धा पूर्ण करू शकतेस. तुला नक्कीच जमेल. मग मनात विचार आला की यांना माझ्यावर एवढा विश्वास आहे, तर एकदा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. मग मी माझ्या बाबांशी बोलले. माझ्या लहान भावाशी बोलले. त्यांनीदेखील प्रोत्साहन दिले. स्पर्धेची सगळी तयारी झाली. स्पर्धेत सहभागी झाले. नवीन सायकलिस्ट, त्यांच्या भारीतल्या सायकल बघून मला वाटले की आपण काही यांच्याबरोबर स्पर्धा करू शकत नाही. पण नंतर माझ्या बाबांचे आणि आमच्या वैद्य काकांचे शब्द आठवले की सायकलिंग करताना ८० टक्के सायकलस्वार आणि २० टक्के सायकल असे प्रमाण असते. आपल्याकडे कोणती सायकल आहे, हे महत्त्वाचे नसते, तर आपण ती सायकल कशी वापरतो, याला महत्त्व असते. ते लक्षात ठेवून स्पर्धेत भाग घेतला. धनश्री ताई आणि खानविलकर ताई सुरुवातीपासूनच टफ देत होत्या . सुरुवातीचे १५ किलोमीटर झाले आणि आता यापुढे नाही जाऊ शकत, अशी वेळ आली. वेग कमी झाला होता. तेवढ्यात मागून एक सायकलिस्ट आला. ते कोण होते मला अजून आठवत नाही. त्यांनी सांगितले, अग, तुझे आईवडील आले आहेत. आत्ताच पुढे गेले तुझ्या लहान भावाला बघायला. एवढे बोलून तो सायकलिस्ट पुढे निघून गेला . आता आईबाबांना भेटायचे म्हणून स्पीड वाढवला. शेवटचे एक किलोमीटर अंतर बाकी होते. खानविलकर ताई जवळच होत्या . फिनिशिंग पॉइंट जवळ येत होता. खानविलकरांचे गिअर उतरत होते आणि मी मात्र गिअर चढवत होते . फिनिशिंग लाइन दिसली. स्पीड वाढला. रेस संपली आणि क्वीन ऑफ कुंभार्लीची ट्रॉफी हातात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply