संदेशपत्रांमुळे तळेरे गावाला सांस्कृतिक चेहरा : कवी अजय कांडर

पत्रसंग्राहक निकेत पावसकर गौरव सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन

तळेरे (ता. कणकवली) : एखाद्या गावाला सांस्कृतिक चेहरा प्राप्त होण्यासाठी त्या गावातील सांस्कृतिक कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असते. संदेश पत्रसंग्राहक म्हणून महाराष्ट्रात ख्याती मिळविलेल्या निकेत पावसकर यांच्यामुळे तळेरे गावाला स्वतंत्र सांस्कृतिक चेहरा प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले
.

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री. पावसकर यांचा गौरव समारंभ तळेरे येथील ‘अक्षरघर’ येथे पार पडला. त्यावेळी श्री. कांडर यांच्या हस्ते पावसकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी श्री. कांडर बोलत होते. गावच्या गुणी कलावंताला गावानेही जपायला हवे. तळेरे गाव पावसकर यांच्यासारख्या गुणी कलावंतावर प्रेम करून याचीही प्रचीती देत आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

साहित्य-समाज चळवळीतील कार्यकर्ते अॅड. विलास परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कवी राजेश कदम, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर आदी उपस्थित होते. अॅड. परब म्हणाले, निकेत पावसकर हे कलावंत म्हणून जेवढे मोठे आहेत, तेवढे ते माणूस म्हणूनही मोठे आहेत. म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. असे प्रेम दुर्मिळ कलावंतांना मिळते. त्यांच्या पत्रसंग्रहामध्ये महाराष्ट्राबरोबर देश-विदेशातील साहित्यिक, संगीत, नाटक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील जगप्रसिद्ध व्यक्तींची संदेशपत्रे आहेत. यावरून त्यांनी या संदेशपत्रांसाठी किती अपार मेहनत घेतली असेल, हे लक्षात येते. संदेशपत्रांमुळे देश-विदेशातील महनीय व्यक्तींशी पावसकर जोडले गेले. त्यामुळे त्यांच्या तळेरे येथील अक्षरघरालाही जगविख्यात व्यक्तींनी भेट दिली. यावरून त्यांच्या कामाची निष्ठा आपल्या लक्षात येते.

श्री. मोरजकर म्हणाले, गेली पंचवीस वर्षे पावसकर यांच्याशी स्नेह आहे. त्यांनी पत्रसंग्राहक म्हणून केलेले काम मोठे आहे. त्यांनी ख्याती मिळवली, तरी त्यांच्यातील नम्रता सगळ्यांना जोडून ठेवते. या त्यांच्या गुणामुळेच किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांचा हा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राजेश कदम यांनी श्री. पावसकर यांची घेतलेल्या प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी श्री. पावसकर म्हणाले, माझ्या कुटुंबाने मला साथ दिल्यामुळे पत्रसंग्राहक म्हणून यश मिळू शकले. काही कटु-गोड अनुभवही आले. परंतु या प्रवासात अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींनी प्रेम दिले. अनेकांशी ऋणानुबंध जोडले गेले. हे प्रेम मिळाल्यामुळेच मी हे काम करू शकलो. माझ्या या पत्रसंग्रहामध्ये देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे पत्र नसल्याची खंत कायम मनात राहणार आहे.

निकेत पावसकर यांच्या संदेशपत्रसंग्रहाला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उमेद फाऊंडेशनच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन श्री. पावसकर यांना गौरविण्यात आले. तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ, प्रज्ञांगण परिवार, संवाद परिवार आणि निसर्ग मित्र परिवार यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन पावसकर यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे उपाध्यक्ष राजू वळंजू, सचिव मीनेश तळेकर, माइंड ट्रेनर सदाशिव पांचाळ, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, प्रा. विनायक पाताडे, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, प्रज्ञांगणच्या सौ. श्रावणी मदभावे, श्रावणी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश मदभावे, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, उदय दुदवडकर, नाधवडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, उमेद फाउंडेशनचे नितीन पाटील, जाकीर शेख आणि सदस्य, प्रतिष्ठित नागरिक अशोक तळेकर यांच्यासह तळेरे येथील विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

संदेशपत्रसंग्राहक निकेत पावसकर यांचा गौरव करताना कवी अजय कांडर, अॅड. विलास परब, राजेश कदम, ऋषिकेश मोरजकर.

निकेत पावसकर यांच्या पत्रसंग्रहाची वैशिष्ट्ये

संग्रहामध्ये जागतिक कीर्तीचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), महम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंडचे पंतप्रधान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कॅरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरिस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मँकगोवन, टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

  • देश-परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज दीड हजार व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशपत्रांचा समावेश.
  • मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कोकणी, चायनीज, मोडी, ब्राह्मी आणि ब्रेल लिपीतील संदेशपत्रे
  • सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, शास्त्रज्ञ, कलावंत, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक, छांदिष्ट, धार्मिक या क्षेत्रातील देश आणि परदेशातील व्यक्तींची संदेशपत्रे
  • नोबेल पुरस्कारप्राप्त, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, फ़िल्मफेअर अवॉर्ड, साहित्य अकादमी पुरस्कारासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या तसेच जागतिक विक्रम केलेल्या महनीय व्यक्तींची संदेशपत्रे
  • तळेरेसारख्या ग्रामीण भागात राहून एका पत्राच्या माध्यमातून विविध व्यक्तींशी पत्रमैत्री जुळली.
  • पाच हजारापेक्षा अधिक व्यक्तींशी दहा हजारापेक्षा जास्तवेळा पत्राद्वारे संपर्क.
  • संग्रहाची महाराष्ट्रातील विविध दैनिके आणि वृत्तवाहिन्यांनी दखल घेतली. त्याबाबत विविध वाहिन्या, आकाशवाणी केंद्र यावर मुलाखत प्रसारित झाल्या आहेत. सह्याद्री वाहिनीवरील “नमस्कार मंडळी” या कार्यक्रमात थेट मुलाखत प्रसारित. सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून मुलाखत प्रसारित.
  • महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणी या संग्रहाची विविध संस्था आणि शाळांनी प्रदर्शने आयोजित केली.
  • विविध पुरस्कारांनी सन्मान
  • छंद प्रदर्शन आणि त्यातून शालेय विद्यार्थ्यांना छंद का जोपासावा, त्याचे आयुष्यात महत्त्व यावर मार्गदर्शन
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply