मुसळधार पावसामध्येही जनजागृती सायकल फेरी उत्साहात

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लबने घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी आज काढलेली सायकल फेरी मुसळधार पावसातही मोठ्या उत्साहात पार पडली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती. या फेरीला मुसळधार पावसामध्येही बालगोपाळांसह युवा, ज्येष्ठ सायकलपटूंचा उदंड प्रतिसाद मिळाला. येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकावण्याचे आवाहन या फेरीतून करण्यात आले.

आजची सायकल फेरी होणार का? खूपच पाऊस आहे, नियोजन कसे करणार? असे फोन सकाळी ७ पासून सुरू झाले. पण सव्वासात वाजल्यापासून सायकलिस्ट येऊ लागले. बालगोपाळांचा आज सुट्टीचा दिवस आणि त्यात जोरदार पाऊस, पालक पाठवतील का? अशी शंका होती. पण त्यांचा उत्साह तर अभूतपूर्व होता. दहा वर्षांपासून ७० वर्षांपर्यंतच्या सायकलपटूनी फेरीत भाग घेतला. सर्वांच्या सहभागातून हा राष्ट्राभिमान जागृत करणारा उपक्रम यशस्वी झाला, अशी प्रतिक्रिया जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तिरंगी रंगांचे फुगे आकाशात सोडले आणि फेरीला प्रारंभ झाला. त्यांनी सर्व सायकलपटूंची ओळख करून भर पावसातही आल्याबद्दल अभिनंदन केले आणि बालदोस्तांचे विशेष कौतुक केले. भारतमाता की जय, वंदे मातरम् तसेच स्वातंत्र्यवीर, राष्ट्रपुरुषांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, कॅ. कोमल सिंग, सुधीर रिसबूड, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे प्रसाद देवस्थळी, दर्शन जाधव, महेश सावंत, योगेश मोरे, नीलेश शाह, विनायक पावसकर, श्रद्धा रहाटे, डॉ. सनगर, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रवीण जैन, सचिव विशाल ढोकळे, ओंकार फडके, पराग पानवलकर, दीप्ती फडके, गणेश धुरी, दत्तप्रसाद कुलकर्णी, राजीव लिमये, प्रमोद खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जयस्तंभ येथून निघालेली ही फेरी एसटी बसस्थानक, राम आळी, गोखले नाका, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक, पतितपावन मंदिर, जोशी पाळंद, टिळक आळी, काँग्रेस भवन, आठवडा बाजारमार्गे पुन्हा जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संपर्क युनिक फाउंडेशनचे कार्यकर्तेसुद्धा या सायकल फेरीमध्ये सहभागी झाले. फेरीत प्रत्येक सायकलला तिरंगा लावण्यात आला होता. त्यामुळे सायकल फेरी तिरंगामय झाली. फेरी विविध प्रमुख ठिकाणांवरून जाताना नागरिकांनीही प्रोत्साहन दिले. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फेरीदरम्यान सुरस स्नॅक्सने पाण्याची व्यवस्था आणि सांगतेप्रसंगी लायन्स क्लबतर्फे स्नॅक्सची व्यवस्था करण्यात आली होती.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply