रत्नागिरी : महिलांना पत मिळवून देण्याचा रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेचा उद्देश सफल झाला आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी केले.
रत्नगिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या भागोजीशेठ कीर सभागृहात आयोजित महिला पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात ३० वर्षांपूर्वी फक्त तीन जिल्ह्यांत महिला पतसंस्थांना परवानगी मिळाली. पतसंस्थेचे जनक कै. गोविंदरावजी निकम यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने भरारी मारली आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अशिक्षित महिलांना मार्गदर्शन आणि आर्थिक साह्य करून त्यांची समाजात पत निर्माण करण्याचा संस्थेचा हेतू सफल झाला आहे. गेल्या दोन वर्षांत करोना महामारीमुळे आर्थिक अडचणी आल्या. परंतु आता पुन्हा अर्थजगत पुन्हा स्थिरस्थावर होत आहे.
वार्षिक सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे यांनी इतिवृत्त वाचन, आर्थिक माहितीपत्रक सादर केले. सभेत पोटनियमात शासनाने सुचवलेल्या दुरुस्ती स्वीकारणे, २०२२-२३ या वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती, प्रशिक्षण, कर्ज, गुंतवणूक, वसुली या विषयांबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता घेण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली.
सल्लागार मीना रेडीज यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संचालिका प्राची शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक संचालिका स्वप्ना सावंत यांनी केले. यावेळी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनी मिळवलेल्या शैक्षणिक यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये अनिकेत नेरकर (मेकॅनिकल इंजिनिअर), शुभम बने (कॉम्प्युटर सायन्स), पियुष नेरकर, श्रद्धा कोतवडेकर (बारावी वाणिज्य), साहिल गोगावले, ऋतुजा पुरात (बारावी विज्ञान), आर्या कदम, मनस्वी सुरजन (दहावी) यांचा समावेश होता. संस्थेच्या कर्मचारी श्रद्धा पेडणेकर सेवानिवृत्त झाल्याबद्दल अध्यक्ष युगंधरा राजेशिर्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापिका आदिती पेजे यांनी यांनी केले. राज्य सहकारी संघाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अनिल कळंत्रे यांचा पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर सल्लागार मीना रेडीज, उपाध्यक्ष स्वप्ना सावंत, संचालिका पद्मजा मांजरेकर, जानकी बेलोसे, प्राची शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे, जिल्हा सहकार अधिकारी अनिल कळंत्रे, माजी सदस्य नेहा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.



