अत्यंत शांत व प्रसन्न वातावरण असलेली वेगवेगळ्या देवतांची विशाल मंदिरे हे कोकणाचे एक वैशिष्ट्य. कोकणाला देवभूमी म्हटले जाण्याचे कदाचित हेही एक कारण असावे. यापैकी अनेक मंदिरे जुन्या काळच्या अतिशय सुंदर अशा काष्ठशिल्प परंपरेचा समृद्ध वारसा आहेत. मंदिरांचे आयुष्य वाढवण्यासाठी त्यांचा जीर्णोद्धार करण्याचे ‘फॅड’ सध्या आले आहे; मात्र जुनी मंदिरे पाडून सिमेंटची मंदिरे उभी करणे म्हणजे हा अनमोल वारसा स्वतःहून उद्ध्वस्त करण्यासारखेच आहे. या पार्श्वभूमीवर, या विषयाचे अभ्यासक डॉ. नितीन हडप यांनी लिहिलेला, माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांतील काष्ठशिल्पांची थोडी ओळख करून देणारा हा लेख…
………..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ-मालवण रस्त्यावर जायला लागलो, की आधी काळसे गाव लागते. या गावाला लागूनच धामापूर वसले आहे. हे गाव प्रसिद्ध आहे ते तेथील विशाल तलावामुळे. तलावाच्या काठावरील झाड-झाडोरा, पक्षी आणि मंदिरामुळे तलावाच्या महत्त्वात भर पडते. धामापूरच्या या मंदिराची अधिष्ठात्री देवता म्हणजे भगवती. या देवी भगवती मंदिराच्या मंडपात तुळईवर एक लहानशी कोरीव ओळ आहे. त्यामध्ये ‘सभामंडप बांधला शके १८२७’ असा मजकूर आहे. या ओळीखाली ‘धोंडी विश्राम थवी’ असेही कोरले आहे. म्हणजे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे १९०४ साली हा मंडप थवी नावाच्या सुताराने बांधला. आजही या गावात थवी कुटुंबाची चार-पाच घरे आहेत. त्यांच्या मते भगवतीच्या मंदिराचे बांधकाम त्यांच्याच पूर्वजांनी केले आहे. आजही काही थवी कुटुंबीय या व्यवसायात आहेत. साधारण शंभर वर्षांपूर्वी बांधलेला हा लाकडी मंडप, लाकडी शिल्पे हे कोकणाचे काहीसे अपरिचित अंग.

मंडपात लाकडी हस्तावर ‘गंडभेरुंड’ (म्हणजे एक शरीर आणि दोन डोकी असलेला काल्पनिक पक्षी) कोरला आहे. हा पक्षी कर्नाटकातील मंदिरशिल्पांमध्ये दिसतो. आजही कर्नाटकच्या सरकारी बसेसवरील ‘सिम्बॉल’मध्ये हे पक्षी दिसतात. मंदिरातील इतरही लाकडी शिल्पे पाहण्यासारखी आहेत. धामापूरच्या या मंदिराप्रमाणेच अनेक मंदिरांचे मंडप कोकणी शिल्पवैभवाने सजलेले आहे. या लाकडी कोरीव शिल्पांना प्रतीक्षा आहे ती त्यांच्याकडे शिल्पवैभव म्हणून अभिमानाने पाहिले जाण्याची आणि जपणुकीची. ही सुतारकामाची समृद्ध परंपरा आहे.
धामापूरप्रमाणेच त्याच भागातील अनेक मंदिरांचे शिल्पवैभव नोंद घेण्यासारखे आहे. आकेरीचे रामेश्वर मंदिर, नेरूरचे कलेश्वर मंदिर, माणगावचे यक्षिणी मंदिर, वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिर अशी गावोगावची मंदिरे म्हणजे काष्ठशिल्पांची अक्षरशः जागती संग्रहालयेच आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेला गोव्यातही अशा शिल्पवैभवाची कमतरता नाही. आपण उत्तरेला जायला लागलो, की रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर भागातील तेरवणचे विमलेश्वर मंदिर, आणखी उत्तरेकडे सरकलो, की रायगडच्या मुरुडच्या भागातही आणि अगदी थेट गुजरातपर्यंत ही काष्ठशिल्पांची परंपरा आहे. किनारपट्टीवरील कर्नाटकापासून दक्षिणेला थेट केरळपर्यंत यापेक्षा थोड्याफार फरकाने वेगळी वाटणारी काष्ठशिल्पेही उल्लेखनीय आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील काळभैरवाच्या जुन्या मंदिरातील मंडपाच्या खांब आणि तुळईला जोडणाऱ्या हस्तभागावर आंबा व काजू ही फळे सर्पमुख गिळत आहे, असे खास कोकणी चित्र शिल्पित केले आहे. कोकणाच्या या काष्ठशिल्पसमूहातील एखादे उदाहरण विस्ताराने पाहिल्यास त्याची कलात्मक, सांस्कृतिक, मूर्तिशास्त्रीय आणि शैली स्वरूपातील मूल्ये आपल्या लक्षात यायला मदत होईल. म्हणूनच उदाहरणादाखल आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील यक्षिणी मंदिरातील काष्ठशिल्पांबद्दल जाणून घेऊ या. (हे माणगाव म्हणजे टेंबे स्वामी महाराजांचे जन्मस्थान.)
माणगावचे यक्षिणी मातेचे मंदिर हे कोकणी काष्ठशिल्प परंपरेचा वारसा जपणारे एक अद्वितीय मंदिर आहे. या मंदिरातील गर्भगृह, मंडप हे दोन लहानसे भाग पाहताना डोळे भाव-भक्तीने मिटून घेण्याबरोबरच पाहण्याच्या दृष्टीने उघडणे हादेखील दर्शनाचा एक भाग ठरू शकतो. दर्शन या शब्दातच पाहणे ही क्रिया लपलेली आहे. देवदर्शनाबरोबरच कलाजाणिवा जागृत ठेवण्यासाठीच शिल्पांना मंदिरात स्थान आहे.
यक्षिणी मंदिराच्या गर्भगृहाचे भव्य प्रवेशद्वार व कडेची लाकडी महिरपवजा भिंत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य अशा द्वारशाखेवर नानाविध शिल्पपट्ट पाहायला मिळतात. तीन मोठ्या शिल्पपट्टांच्या तळाला हत्ती, हंस, व्याल (म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव असलेला मिश्र प्राणी), सिंह, घोडा, मोर इत्यादी शिल्पे आहेत. त्याच्या खाली सुरसुंदरींची, वाद्य वाजवणाऱ्या सुंदरींची, तसेच नृत्यांगनांची शिल्पे आहेत. त्यापैकी दोघींच्या डोक्यावर घागरी आहेत. त्या नद्यांचे प्रतीक असाव्यात. त्याच्या वरील भागात कोरलेले ‘मकर’ आकर्षक आहेत. मकर म्हणजे मगरीसारखा, परंतु संकरित-काल्पनिक प्राणी असून, त्याचा मागील भाग येथे वनस्पतीच्या वेलसदृश शेपटीत रूपांतरित केलेला आहे.
या प्रवेशमखरद्वाराला ललाटबिंब म्हणून शेषशायी श्री विष्णूंची प्रतिमा आहे. साहजिकच सेवा करणारी लक्ष्मी, ब्रह्मदेव व गरुडाचे अंकन या लाकडी ललाटबिंबावर आहे. या द्वारशाखा-मखराच्या वरील भागात आकर्षक रूपात दशावतार कोरलेले आहेत. त्यात वराह वैशिष्ट्यपूर्ण असून, मानवदेह आणि वराहमुख असे शिल्पांकन आहे. हे मखर सध्या चंदेरी रंगात रंगवलेले आहे.
कोकणी मंदिरशिल्पांमधील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे छताचे पाट. छताला तुळयांची जी चौकट तयार होते त्याच्यावर हे पाट टाकतात. या पाटांवर शिल्पे कोरलेली असतात. यक्षिणी मंदिरातील या शिल्पांमध्ये अग्नी वगैरे देवता, अष्टदिग्पाल इत्यादी आहेतच. परंतु बहुहस्त, बहुपाद अतिमानवी किंवा यक्षरूप प्रतिमा आहेत. सहा शिरे, अठरा हात व तीन पाय, दोन शिरे आणि चार हात, अठरा शिरे, छत्तीस हात आणि नऊ पाय, पाच शिरे, पाच पाय व दहा हात असलेल्या प्रतिमा आहेत.
या बरोबरीने स्थानिक रहिवासी आणि बाहेरगावच्या भक्तांच्याही लक्षात न येणाऱ्या चौसष्ट योगिनींच्या प्रतिमा या मंदिराच्या मंडपाच्या छतालगतच्या वितानावर कोरलेल्या आहेत, हे सर्वप्रथम शिल्पा हडप यांनी दाखवून दिले. भारत इतिहास संशोधन मंडळात डॉ. म. श्री. माटे यांच्या सन्मानार्थ झालेल्या चर्चासत्रात त्यांनी हा शोधनिबंध अभ्यासकांसमोर मांडला होता. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रानेही त्याला प्रसिद्धी दिली होती.
या योगिनी समूहात माशावर आरूढ आणि बेडकीचे मुख असलेली, अश्वमुखी, गाढव वाहन असलेली बकरीच्या मुखाची, गर्दभमुखी अशा अनेक रूपांत या चौसष्ठ योगिनी आहेत. त्यांची नावे शिल्पा हडप यांनी अभ्यास करून शोधून काढली. वेताळी, सूर्यपुत्री, गांधारी, कुमारी, जसा किंवा चंद्रकांती, ककराली, चंडिका, तारा, यमुना, पद्मावती, अघोरा, अग्निहोत्री व खेमुखी इत्यादी देवतांची ओळख मूर्तिशास्त्रीय अभ्यासातून पटलेली आहे. याच सभामंडपातील हस्त देखणे असून, त्यावर हुक्का ओढणारा योगी, हनुमान, व्याल या प्रतिमा झाड-झाडोरा किंवा सजावटीबरोबर शिल्पिलेल्या आहेत. लाकडातील कोरीवकामाची ही उत्तम शिल्पे आहेत यात शंका नाही.
या मंदिराचे सांस्कृतिक महत्त्वदेखील आपण लक्षात घ्यायला हवे. तसेच याचे महत्त्व आणि दुर्मिळ असल्याचे वैशिष्ट्य स्थानिक लोकांच्या लक्षात यायला हवे. भारतात योगिनी पंथ प्राचीन आहे. मध्य प्रदेशातील भेडाघाट, ओडिशातील हीरापूर आणि राणीपूर अशा मोजक्याच ठिकाणी योगिनींची मंदिरे आहेत. या योगिनींची उपासना व पंथाला भारतीय जनमानसात महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात या उपासना पंथाची अतिशय मोजकीच पूजास्थाने आहेत. त्यापैकी हे एक. हा वारसा जसाच्या तसा जपणे गरजेचे आहे. आजतागायत माणगाव ग्रामस्थ, व्यवस्थापक मंडळ आणि पुजारी कोनकर घराणे आदींच्या प्रयत्नातून हे जतन झाले आहे. माझ्यासारख्या अभ्यासकाला काळजी वाटते ती कोकणात नव्याने आलेल्या जीर्णोद्धार नावाच्या उपक्रमापासून अशी दुर्मिळ आणि कमीत कमी शे-दोनशे वर्षांची जुनी मंदिरे वाचतील का, याची.
जीर्णोद्धार म्हणून निधी गोळा होतो. सर्व मार्गांनी पैशांची व्यवस्था झाली, की त्याद्वारे मूळ मंदिराजवळ नवे मंदिर उभारणे किंवा जुने मंदिर मुळातूनच काढून नवे मंदिर बांधणे हा या जीर्णोद्धाराचा पहिला ‘अजेंडा.’ हे नवे मंदिर सिमेंटचे असते. त्यात लाकडी काम, कौलारू छत वगैरे स्थानिक परंपरांचा लवलेशही नसतो. आपला हा शिल्पांचा समृद्ध वारसा जीर्णोद्धाराच्या नावाखाली आपण नामशेष करत आहोत, याचे भान आमच्या कोकणातील बंधु-भगिनींना नसते. कारण देव-देवतेसाठी सिमेंटचे पक्के मंदिर तयार होणे ही त्यांना मोठी गोष्ट वाटते. या साधेभोळेपणाचा फायदा ‘अँटिक’ वस्तूंच्या बाजारातील दलाल व व्यापारी उचलतात आणि आपला कोकणातील वारसा गोवा-मुंबई किंवा इतरत्र विकला जातो.

साहजिकच हे सर्व व्यवहार छुपे होत असणार. तेव्हा आपणच हे थांबवले पाहिजे. मूळ मंदिर जसेच्या तसे ठेवूनच त्याचे जीवनमान कसे वाढेल हे पाहिले पाहिजे. हा वारसा फार महत्त्वाचा आहे हे स्थानिक ग्रामस्थ मंडळींनी लक्षात घ्यायला हवे. ही एक चळवळच व्हायला हवी. एकाला हे महत्त्व पटले, की त्यातून हा विचार पसरायला हवा. मला वाटते, की आपण सगळ्यांनीच ही जागृती करण्यास मदत करावी. आपल्या पातळीवर आपण हे वारसा जतनाचे महत्त्व किमान आपापल्या गावातील देव-देवतेच्या मंदिरांसंबंधी लोकांना सांगावे अशी कळकळीची विनंती मी या अंकाच्या मान्यवर वाचकांना करत आहे.

अशा प्रकारची काही महत्त्वाची काष्ठशिल्पे असलेली मंदिरे गेल्या पाच-सात वर्षांत नष्ट केली गेली आहेत आणि बेढब अशी सिमेंट-काँक्रिटची नवी मंदिरे उभी राहिली आहेत. देवदर्शनाबरोबरच ‘दर्शन’ म्हणजे पाहणे या अर्थाने सिमेंटच्या मंदिरात काहीच नसते. कलाकुसर असलीच तरी ती एकसुरी, छापाची असते. हे आपण टाळले पाहिजे. खरे तर याला शक्यतो कडाडून विरोध करायला हवा. हीच आपल्या देवाची खरी सेवा होय. मूळ काष्ठशिल्प वारसा मंदिरे टिकायला हवीत, ही जाणीव आपल्या सर्वांनाच व्हायला हवी.

नरकासुर वधाचे प्रतीक म्हणून अलीकडे कोकणात कापडी प्रतिमा करून जाळल्या जात आहेत. परंपरेने कारीट हे काकडीवर्गीय कडू फळ पायाखाली चिरडून प्रतीकात्मक रूपाने नरकासुर मारल्याची नाट्यकृती केली जाते. ही कृती आपण आपापल्या परंपरांप्रमाणे आपण करतच असतो. परंतु आपला वारसा उद्ध्वस्त करणारे नरकासुर व त्यांचे मनोदय आपापल्या गावातील देवळांपासून दूर ठेवण्याचा निश्चय या दिवाळीपासून सर्व कोकणवासीयांनी करू या. आपला लाकडी शिल्पांचा हा समृद्ध वारसा जतनाच्या प्रतीक्षेत आहे, हे लक्षात घेऊ या.
– डॉ. नितीन हडप
मोबाइल : ९३७२४१८६१५
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in
(डॉ. नितीन हडप काष्ठशिल्प-मंदिरे या संदर्भातील अभ्यासक आहेत. कोकणातील मंदिरांमधील काष्ठशिल्पवैभवाची नोंद घेण्यासाठी डॉ. नितीन हडप यांनी वर्षभर फिरून संशोधन केले. ‘नेहरू ट्रस्ट फॉर दी इंडियन कलेक्शन अॅट दी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, लंडन’ या संस्थेने फेलोशिप देऊन या अभ्यास प्रकल्पाला अर्थसाह्य केले होते.)
………
(हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या पहिल्या दिवाळी अंकात (२०१६) प्रकाशित झाला होता. १०० किंवा त्याहून अधिक वर्षे झालेल्या कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू, महान व्यक्ती आदींचा मागोवा त्या अंकात घेण्यात आला होता. त्या दिवाळी अंकाचे ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)