रत्नागिरी : शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी सहजतेने गणित विषय आणि स्पर्धा परीक्षा तयारीविषयीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रत्नागिरी, देवरूख आणि लांजा येथे करण्यात आले आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ही कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत गणित तज्ज्ञ प्रा. महेंद्र करकरे मार्गदर्शन करणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक दिनानिमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात ज्यांच्याकडे विषयाची मूलभूत समज, ज्ञान आणि कौशल्य या गोष्टी असतील तोच स्पर्धक स्पर्धा जिंकू शकेल. शालेय जीवनातच स्पर्धेला सुरुवात होत असल्याने लहान वयात किंवा घडत्या काळामध्ये या तिन्ही गोष्टी शालेय आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये रुजवता आल्या तर कोणत्याही स्पर्धेवर मात करता येते. विद्यार्थी, शिक्षक, पालक हा त्रिकोण आणि त्यामध्ये या आव्हानाविषयी असलेली जाणीव एकीकृत प्रयत्नांमध्ये रूपांतरित झाली तर यशोशिखर गाठता येईल.
शाळेपासून ते कॉलेजपर्यंत गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय न समजल्यामुळे अनेक विद्यार्थी स्कॉलरशिपपासून दहावी, बारावी आणि त्यापुढील स्पर्धा आणि पदवी परीक्षांमध्ये मागे पडतात. याच गोष्टीचा विचार करून गणित या विषयाची अत्यंत सोप्या पद्धतीने कशी समज यावी, हा विषय हाताळण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांनाही एक नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास कसा मिळवावा, हे समजावे याकरिता गणित आणि स्पर्धा परीक्षा या विषयांमधील मुंबईतील नामवंत तज्ज्ञ प्रा. महेंद्र करकरे यांची कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेत पाचवी ते बारावी तसेच महाविद्यालयीन वर्गांना गणिताचे अध्यापन करणारे सर्व शिक्षक, प्राध्यापक उपस्थित राहिल्यास अधिकाधिक लोकांना याचा फायदा मिळेल. या कार्यक्रमासाठी प्रत्येक शाळेतून गणित विषय शिक्षकांबरोबर ८ ते १० पालक आणि १०-१५ विद्यार्थी अपेक्षित आहेत. कार्यशाळेसाठी विनामूल्य प्रवेश आहे. जास्तीत जास्त संख्येने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
……
कार्यशाळेचे वेळापत्रक असे :
रत्नागिरी : ३० सप्टेंबर २०२२ दुपारी २ ते सायंकाळी ४.३० – रंजन मंदिर, रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी.
देवरूख : १ ऑक्टोबर २०२२ सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० – माटे भोजने सभागृह, देवरूख
लांजा : १ ऑक्टोबर २०२२ दुपारी २ ते सायंकाळी ४.३० – त्रिमूर्ती मंगल कार्यालय, एसटी आगारासमोर, लांजा