महाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन

रत्नागिरी : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्ह्याला यंदाच्या ११ वर्षांखालील राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या स्पोर्ट्स ॲकॅडमीमध्ये केले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच क्लासिकल प्रकारातील फिडे मानांकन स्पर्धा असून ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान एकूण आठ फेऱ्यांमध्ये स्विस साखळी पद्धतीने ती खेळवली जाणार आहे.

स्पर्धेला डेरवणच्या श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे मोलाचे सहकार्य लाभले असून स्पर्धेसाठी लागणार प्रशस्त हॉल, तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या दोन मुले आणि दोन मुली अशा एकूण ४ खेळाडूंची निवासाची मोफत व्यवस्था एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स ॲकॅडमी आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून करण्यात येणार आहे. स्पर्धेत खुला गट आणि मुलींचा गट मिळून एकूण दोनशे खेळाडूंचा सहभाग अपेक्षित असल्याचे विवेक सोहनी यांनी सांगितले.

स्पर्धेतून पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ११ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड होणार असून खुल्या गटात दोन तसेच मुलींच्या गटात दोन जागांसाठी चुरस असेल असे मंगेश मोडक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्पर्धेच्या आयोजनासाठी लागणारे आर्थिक सहकार्य घरडा केमिकल्स, पुष्कर पेट्रोकेमिकल्स तसेच कन्साई नेरोलॅक पेंट्स यांनी केले असून अजूनही अन्य प्रायोजकांनी जिल्ह्यात होऊ घातलेल्या या प्रकारच्या पहिल्या वहिल्या स्पर्धेस सहकार्य करण्याचे आवाहन चैतन्य भिडे यांनी केले.

स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्षपद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे भूषवत असून विवेक सोहनी स्पर्धाप्रमुख म्हणून तर चैतन्य भिडे स्पर्धासचिव म्हणून काम बघत आहेत. इसव्हीजेसीटी स्पोर्ट्स ॲकॅडमीचे श्रीकांत पराडकर यांच्यासोबत जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार मंगेश मोडक, उपाध्यक्ष शशिकांत मोदी, रमण डांगे, शैलेंद्र सावंत आणि अमरदीप परचुरे संयोजन समिती सदस्य म्हणून काम बघत आहेत.

गेली ७ वर्षे जिल्हा संघटना ७, ९, ११, १३, १५, १७, १९ वयोगटातील तसेच खुल्या, महिला आणि हौशी गटातील निवड स्पर्धा सातत्याने घेत असून अशी कामगिरी करणाऱ्या मुंबई, पुणे, नागपूर, सांगली आणि कोल्हापूरसारख्या काही निवडक जिल्ह्यांच्या पंगतीत जाऊन बसण्याचा मान रत्नागिरीला मिळाला आहे. या स्पर्धा जिंकून जिल्ह्यातील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवत आहेत.

ही राज्य निवड स्पर्धा ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत होणार असून जिल्ह्यातील बुद्धिबळपटू आणि हौशी रसिकांनी उपस्थित राहून युवा बुद्धिबळपटूंच्या खेळाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी केले आहे.

याचसोबत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अतिशय महत्त्वाकांक्षी “चेस इन स्कूल” या उपक्रमाची सुरवात येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील इच्छुक क्रीडा शिक्षक आणि हौशी बुद्धिबळ खेळाडूंना शालेय मुलांना बुद्धिबळ कसे शिकवावे, यासाठी मार्गदर्शन सत्र लवकरच जिल्हा आणि राज्य संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच शाळांनी त्यासंदर्भातील अर्ज सचिव विवेक सोहनी यांच्याकडे सुपूर्त करावा, असे आवाहनही जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply