करकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे!

शनिवारी, १ ऑक्टोबरला देवरूख आणि लांज्यातील विद्यार्थी घेणार अनुभव

रत्नागिरी : गणित तज्ज्ञ प्रा. महेंद्र करकरे यांनी गणित अगदी सोपे करून सांगितल्याने विद्यार्थी मंत्रमुग्ध तर झालेच, पण त्यांची गणिताची भीती कोठल्या कोठे पळून गेली. हा अनुभव घेतला रत्नागितील रा. भा. शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांनी. असाच अनुभव आज, शनिवारी, १ ऑक्टोबर रोजी देवरूख आणि लांज्यातील विद्यार्थी घेणार आहेत.

शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी सहजतेने गणित विषय आणि स्पर्धा परीक्षा तयारीविषयीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेत करण्यात आले होते. त्यावेळी करकरे सरांचा हा गणिताचा अगदी हसत खेळत पार पडला. आणखी काही वेळ तास घेतला तर चालेल का, या प्रा. करकरे यांच्या प्रश्नाला दोनशेपेक्षा विद्यार्थी उपस्थित असलेल्या रंजन मंदिर सभागृहातून एकच होकार उमटला. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक दिनानिमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या स्पर्धात्मक युगात ज्यांच्याकडे विषयाची मूलभूत समज, ज्ञान आणि कौशल्य या गोष्टी असतील तोच स्पर्धक स्पर्धा जिंकू शकेल. शालेय जीवनातच स्पर्धेला सुरुवात होत असल्याने लहान वयात किंवा घडत्या काळामध्ये या तिन्ही गोष्टी शालेय आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये रुजवता आल्या तर कोणत्याही स्पर्धेवर मात करता येते. विद्यार्थी, शिक्षक, पालक हा त्रिकोण आणि त्यामध्ये या आव्हानाविषयी असलेली जाणीव एकीकृत प्रयत्नांमध्ये रूपांतरित झाली तर यशोशिखर गाठता येईल.

शाळेपासून ते कॉलेजपर्यंत गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय न समजल्यामुळे अनेक विद्यार्थी स्कॉलरशिपपासून दहावी, बारावी आणि त्यापुढील स्पर्धा आणि पदवी परीक्षांमध्ये मागे पडतात. याच गोष्टीचा विचार करून गणित या विषयाची अत्यंत सोप्या पद्धतीने कशी समज यावी, हा विषय हाताळण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांनाही एक नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास कसा मिळवावा, हे समजावे याकरिता गणित आणि स्पर्धा परीक्षा या विषयांमधील मुंबईतील नामवंत तज्ज्ञ प्रा. महेंद्र करकरे यांची ही कार्यशाळा झाली..

कार्यशाळेत पाचवी ते दहावीतील विद्यार्थी, गणिताचे अध्यापन करणारे शिक्षक उपस्थित होते. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी कार्यशाळा आयोजित करण्याची भूमिका स्पष्ट केली. आपण शिर्के प्रशालेचे माजी विद्यार्थी असून कोणे एके काळी समोर बसून शिक्षण घेणारा मी आज त्याच त्याच रंजन मंदिर सभागृहात व्यासपीठावरून बोलत आहे. हे माझे भाग्यच आहे, असे त्यांनी नमूद केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

प्रा. महेंद्र करकरे यांची हसत खेळत गणिताची ही कार्यशाळा आज देवरूख आणि लांजा येथे होणार आहे.

या कार्यशाळांचे वेळापत्रक असे :
देवरूख : १ ऑक्टोबर २०२२ सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० – माटे भोजने सभागृह, देवरूख

लांजा : १ ऑक्टोबर २०२२ दुपारी २ ते सायंकाळी ४.३० – त्रिमूर्ती मंगल कार्यालय, एसटी आगारासमोर, लांजा

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply