रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या श्री शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवाळी गिफ्ट बॉक्स विक्रीसाठी सज्ज झाले आहेत.
शामराव भिडे कार्यशाळेत बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश डोळ्यांसमोर असतो. सध्या कार्यशाळेमध्ये शिवण, हस्तकला, मेणबत्ती, स्टेशनरी निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हस्तकला विभागामधून हंगामानुसार काही वस्तूंची निर्मिती कशी करावी, याचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे.
जवळ आलेली दिवाळी लक्षात घेऊन लहान-मोठे आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, विविध प्रकारच्या मेणबत्त्या, सुगंधी उटणे, प्रेझेंट पाकीट, पर्स-पिशव्या तयार केल्या जात आहेत. खास दिवाळीकरिता ६०० रुपयांमध्ये गिफ्ट बॉक्स तयार केला आहे. या बॉक्समध्ये फोल्डिंगचा आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, मेणबत्त्या, पर्स, पिशवी, लहान आकाशकंदील, सुगंधी उटणे, सुगंधित फुले, बुकमार्क इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
या वस्तू तयार करण्याकरिता श्री शामराव भिडे कार्यशाळेमध्ये कार्यरत निदेशक व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण सुरू आहे. शामराव भिडे कार्यशाळा आणि श्रीमती मीरा लिमये उत्पादन केंद्र विद्यार्थ्यांनी खास दिवाळीकरिता उपयुक्त वस्तूंचे गिफ्ट बॉक्स तयार केले आहेत. ते आविष्कार संस्थेमध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहेत.
आपल्या मित्रमंडळींना दिवाळीनिमित्ताने या गिफ्ट बॉक्सची खास भेट देऊन त्यांचा आणि शाळेतील मुलांचा आनंद वाढवावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

