चिपळूण : महाराष्ट्र राज्य ११ वर्षांखालील फिडे मानांकन बुद्धिबळ निवड स्पर्धेस डेरवण (ता. चिपळूण) येथील विठ्ठलराव जोशी ट्रस्टच्या क्रीडा अकादमीमध्ये दिमाखात प्रारंभ झाला.
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित स्पर्धेस २३ जिल्ह्यातील एकूण १३० खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेला आज प्रारंभ झाला. स्पर्धा ९ ऑक्टोबरपर्यंत स्विस लीग साखळी पद्धतीने आठ फेऱ्यांमध्ये खेळवली जाणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चिपळूणचे आमदार शेखर निकम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. स्पर्धेला सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करणारे घरडा केमिकल्स, कन्साई नेरोलॅक पेंट्स आणि लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी अनिल भोसले, संदेश पाटोळे आणि राज आंब्रे उपस्थित होते. सर्व मान्यवरांना रत्नागिरीच्या आविष्कार या बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या दिवाळी भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सुप्रिया लाइफसायन्स, श्री पुष्कर केमिकल्स व फर्टिलायझर्स आणि चिपळूण नागरी पतसंस्थेकडूनदेखील स्पर्धेला प्रायोजकत्व देण्यात आले आहे.
अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, यवतमाळ आणि वर्धा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक रत्नागिरीत निवड स्पर्धेसाठी येतात. इतक्या संयोजित पद्धतीने रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेची स्पर्धा समिती हे शिवधनुष्य लीलया पेलते आहे, हे बघून आपल्या आनंद होत असून येणाऱ्या काळात दर महिन्याला एक जिल्हास्तरीय स्पर्धा व वार्षिक एक फिडे मानांकन स्पर्धा घेण्याचा मानस असल्याचे श्री. निकम यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून नाशिकचे फिडे पंच मंगेश गंभिरे काम पाहत असून सांगलीच्या पौर्णिमा उपळाविकर-माने, कोल्हापूरच्या आरती मोदी, सांगलीचे दीपक वायचळ व मुंबईचे सौमित्र शिंदे सहाय्यक पंच म्हणून काम बघत आहेत. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी रत्नागिरीचे राष्ट्रीय पंच चैतन्य भिडे पाहत असून स्पर्धा प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी काम बघत आहेत. याच बरोबर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संघटनेचे रमण डांगे, शशिकांत मोदी, अमरदीप परचुरे, शैलेश सावंत, राजकुमार जैन मेहनत घेत आहेत.
प्रत्येक जिल्ह्यातून निवड होऊन येणाऱ्या २ मुले आणि २ मुली अशा एकूण ४ खेळाडूंची निवासाची व्यवस्था आयोजकांकडून मोफत करण्यात आली असून डेरवण येथील एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकादमीचे श्रीकांत पराडकर संघटनेचे पदाधिकारी व विश्वस्त यांच्यासोबत नेटाने ही व्यवस्था चोखपणे पार पाडत आहेत.
मुलांच्या गटात एकूण ४३ फिडे मानांकित खेळाडू सहभागी असून मुंबईचा अंश नंदन नेरूरकर अग्रमानांकित असून नागपूरचा शौनक बडोले द्वितीय मानांकित तर पुण्याचा प्रथमेश शेरला याला तृतीय मानांकन आहे. मुलींच्या गटात एकूण ९ खेळाडू फिडे मानांकित असून पुण्याची निहिरा कौल अग्रमानांकित असून पुण्याचीच चतुर्थी परदेशी द्वितीय तर नागपूरची वृत्तिका गमे तृतीय मानांकित आहे.
उद्या, दि. ७ ऑक्टोबर रोजी स्पर्धेच्या ३ फेऱ्या असून सकाळी ९ ते सायंकाळी ७ यावेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील बुद्धिबळ रसिकांनी स्पर्धा स्थळी उपस्थित राहून लहानग्या बुद्धिबळ खेळाडूंच्या खेळाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी केले आहे.





