रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा सीआरएआर २५.१८ टक्के इतका विक्रमी असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. त्यातून पतसंस्थेच्या आर्थिक भक्कमतेची ग्वाही मिळते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात श्री. पटवर्धन यांनी म्हटले आहे की, पतसंस्थांना २३ ऑगस्ट २०२२ च्या परिपत्रकानुसार सीआरएआर संकल्पना सहकार खात्याने लागू केली. पतसंस्थांसाठी किमान ९ टक्के सीआरएआर ठेवणे अपेक्षित आहे. सीआरएआर म्हणजे भांडवल निधीचे जोखीम भारीत जिंदगीशी असलेले प्रमाण होय. पतसंस्थांमधील येणे कर्ज तसेच अन्य मालमत्तेतील जोखीम लक्षात घेऊन सीआरएआर संकल्पना लागू करण्यात आली. ज्या संस्थेचा जिंदगी, मालमत्तेचा दर्जा उत्तम आहे, भांडवल निधी (स्वनिधी) चे जोखीमभारित मालमत्ता जिंदगीशी असलेले प्रमाण सीआरएआर हे ९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम समजण्यात येतात. प्रत्येक पतसंस्थेला स्वनिधीच्या १२ पट ठेवी उभारता येतात. त्यापेक्षा अधिक ठेवी उभारता येत नाहीत. त्यामुळे पतसंस्थांना स्वनिधी वाढवण्याच्या दृष्टीने जागरूक राहावे लागते. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने याचे भान ठेवत आपला स्वनिधी ३६ कोटी इतका वाढवत नेला आहे. स्वनिधी हा संस्थेचा आर्थिक सामर्थ्यदर्शक संकेत आहे. प्रतिवर्षी स्वरूपानंद पतसंस्था स्वनिधीमध्ये १६ टक्के वाढ करत आली आहे. सीआरएआर जोखीमभारित जिंदगीचे मूल्य म्हणजे संस्थेच्या ताळेबंदातील मालमत्ता, जिंदगी बाजूकडील प्रत्येक मालमत्तेतील जोखीम विचारात घेऊन विविध दराने आकारणी करून येणाऱ्या जिंदगीचे मूल्य होय.
सहकार खात्याने निश्चित केलेले जोखमीचे प्रमाण आणि त्यानुसार वेटेज ॲव्हरेज पद्धतीने केलेले कॅल्क्युलेशन पाहता स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ३० सप्टेंबरचा सीआरएआर २५.१८ टक्के इतका भक्कम आहे. त्यातून पतसंस्थेच्या आर्थिक सुदृढ सामर्थ्याचे स्पष्ट दर्शन होते.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आर्थिक शिस्तीचे काटेकोरपणे पालन करते. त्यातून विश्वासार्हता वृद्धिंगत होते. व्यवहार वाढत जातात. भांडवल निर्मिती होते. वसुलीचे प्रमाण उत्तम राखल्याने उत्तम नफा मिळतो. ही साखळी पतसंस्था प्राणपणाने, सातत्याने बळकट करीत नेते. या बळकट अर्थकरणाला सहकार्याचे, स्नेहाचे, बळ ग्राहक, सभासद देतात. म्हणून स्वरूपानंद पतसंस्थेला प्रचंड आर्थिक यश सातत्याने मिळते, असे संस्थाध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

