वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात विविध स्पर्धा

रत्नागिरी : माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निबंध, वक्तृत्व आणि शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभा झाली. सभेला मराठी भाषा समिती सदस्य नमिता कीर, गजानन पाटील, प्रकाश देशपांडे, गोपाळे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी वामनराव जगदाळे, माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, कांबळे उपस्थित होते.

सर्व स्पर्धा पाचवी ते आठवी, नववी ते बारावी, महाविद्यालयीन आणि खुला गट अशा चार गटांमध्ये घेण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धा दोन स्तरांवर घेण्यात येणार आहेत. सर्वप्रथम तालुकास्तरीय स्पर्धा होतील. त्यातील पहिल्या दोन क्रमांकांची जिल्हास्तरासाठी निवड होईल. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा १३ ऑक्टोबर रोजी, तर वक्तृत्व स्पर्धा १४ ऑक्टोबर रोजी अल्पबचत सभागृहात होईल. विजेत्यांना १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनी अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभात पारितोषिक वितरण होईल. त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचे सादरीकरण होणार आहे.

स्पर्धांसाठी विषय असे – निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा – १. आजच्या तरुणाईला वाचन प्रवाहात कसे आणावे?, २. वाचन आवश्यक की अनावश्यक!, ३. वाचन कट्टा काळाची गरज. जिल्हास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेसाठी स्पर्धकाने ५० ओळी शुद्धलेखन काढायचे आहे. ती स्पर्धा एकाच स्तरावर घेण्यात येणार असून बक्षीस वितरण १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सर्वांनी वाचन प्रेरणा दिन अत्यंत उत्साहात साजरा करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वक्तृत्व, निबंध स्पर्धा मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात ७ ऑक्टोबरला होतील. कवी केशवसुत यांच्या जयंतीचे निमित्त साधून या स्पर्धा होणार असून त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयीन व खुल्या गटातील स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply