परवा मुंबईत दोन दसरा मेळावे झाले. दोन्ही मेळाव्यातील भाषणे ऐकल्यावर कुणाही सुबुद्ध नागरिकाला हे मेळावे का झाले, असा प्रश्न पडला असेल. ‘विचारांचं सोनं लुटायला’ वगैरे संकल्पना बाळासाहेबांसोबतच स्वर्गवासी झाल्या आहेत. कुठल्याही वाक्याचा पेटंट (अघोषित) असतो. तो त्यांच्या तोंडीच शोभून दिसतो. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ हे शब्द फक्त बाळासाहेबांच्या तोंडीच शोभून दिसत. पण तेही असो.
शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरू केलेली परंपरा…. ती त्यांच्या कार्यकर्त्यांना भावली आणि दरवर्षी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क भरून वाहू लागले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राने ती परंपरा पुढे चालवली. त्याच्या तपशिलात जाण्याचा आजच्या लेखाचा विषय नाही.
शिवसेनेत झालेल्या तथाकथित उठावानंतर परवाचा पहिलाच दसरा… आणि म्हणून त्यांच्या दसरा मेळाव्यासारखा आपला ही दसरा मेळावा व्हावा, याचा अट्टहास… हिंदुत्वाचे खरे भारवाही कोण, हे दाखवण्याची केविलवाणी धडपड…. या हिंदुत्वाचे पोवाडे गाताना बाळासाहेबांच्या व्यासपीठावर ‘साबीर शेख’ असायचे, तसे आमच्या व्यासपीठावर ‘अब्दुल सत्तार’ आहेत ही तुलना या सगळ्या बालिशपणाची मुळे किती खोलवर आहेत हे पुरेस स्पष्ट करणारी.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ‘विचारांचं सोनं लुटायला’ बाळासाहेबांकडे काही निश्चित विचार होता, तो मांडण्याची कला होती, निर्भीडपणा होता, वक्तृत्व होतं, यातलं आपल्याकडे काहीच नाही हे महाराष्ट्राच्या प्रमुखांना कळू नये, याचं आश्चर्य वाटतं. या दोन्ही दसरा मेळाव्यात ज्या दोन प्रमुख वक्त्यांची भाषणं झाली त्यात नवीन काय होतं? कुठला विचार होता? कुठला संदेश होता? कुठली आक्रमकता होती? कुठला आवेश होता जो कार्यकर्त्यांना संघटना बांधणीसाठी ऊर्जा देईल? जर यातील काहीच नव्हतं, तर हा सगळा आटापिटा कशासाठी? मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचायचं नसतं, हे आपल्याला कधी समजणार?
पहिल्या मेळाव्याबद्दल काही बोलायलाच नको, पण दुसऱ्यांची तर सुरुवात होती. मग वाजवायचाच होता तर पहिला फटाका तरी जोरात वाजायला हवा होता ना? रिकाम्या ठेवलेल्या खुर्चीवरून साहेब बघत होते ना तुमच्याकडे? ज्या विचारांचं सोन लुटायला एवढे लक्षावधी रुपये उधळलेत तो विचार तरी स्पष्ट, सुसंगत आणि प्रवाही पद्धतीने मांडता यायला हवा होता ना? गेल्या तीन महिन्यांत वारंवार सांगितलं गेलेलंच जर परत सांगायचं होतं, तर त्यासाठी एवढा उपद्व्याप करण्याची खरंच गरज होती का? ‘त्यांना’ काही गमावण्याची भीती नाहीच आहे. कारण त्यांच्याकडे उरलेलंच फार थोडं आहे, पण तुमचं काय? तुम्ही तर ‘गदर’ ची भाषा बोलता आहात, क्रांती, परिवर्तन असे शब्द वापरता आहात. तुम्हाला ही भीती वाटायला हवी होती की आपलं भाषण सुरू असताना लोक उठून तर जाणार नाहीत ना?
कुठल्याच गटाचे समर्थक अथवा विरोधक नसलेल्या मराठी जनांच्या नशिबी हे सगळं मुकाट्याने पाहणं एवढंच आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव…
- निबंध कानिटकर
(संपर्क : ९४२२३७६३२७)

