रत्नागिरी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे पहिले जिल्हा कार्यालय रत्नागिरीत सुरू होत आहे. हे कार्यालय जिल्ह्यात उद्योजकता वाढवण्यात आणि नवीन उद्योजकांना पाठबळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यानिमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यू टॉकच्या माध्यमातून उद्योजकांच्या मुलाखतींतून नवउद्योजकांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी केले.
जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. रत्नागिरीकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या २३ समित्यांपैकी एक असलेल्या पर्यटन समितीचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. विशेष म्हणजे पहिले जिल्हा कार्यालय रत्नागिरीत सुरू होणे ही आनंददायी गोष्ट आहे.
कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त होणाऱ्या कोकण उद्योग मंथन (उद्योजकता विकास परिसंवाद) हा कार्यक्रम टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० पर्यंत होणार आहे. उद्योजकांशी संबंधित कार्यक्रम, मुलाखती होणार आहेत. उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू, त्यांची कार्यपद्धती तसेच व्यवसायवाढीसाठी काय केले, त्यांचे कष्ट, मेहनत याबाबत उद्योजक बोलणार आहेत. यानंतर यू टॉक नावाचा वेगवेगळ्या क्षेत्रातील निवडक उद्योजकांशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. यात नवीन उद्योजक, होतकरू उद्योजक आणि ज्येष्ठ उद्योजक एकाच व्यासपीठावर येतील. डॉ. श्रीधर ठाकूर, किशोर धारिया, मिथिलेश देसाई, सागर मोरे आणि कौस्तुभ सावंत या उद्योजकांशी माध्यम सल्लागार जयू भाटकर संवाद साधणार आहेत. काम करताना येणाऱ्या अडचणी, शासनाचे सहकार्य, वातावरण कसे आहे आणि त्यांची यशोगाथा ते मांडतील. असा कार्यक्रम प्रथमच होत आहे. त्याबद्दल रत्नागिरीकरांमध्ये उत्सुकता आहे. या माध्यमातून उद्योजकांना व्यासपीठ आणि पाठबळ व व्यक्त व्हायला संधी देण्याची भूमिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने घेतली आहे. अशा कार्यक्रमातून उद्योजक समाजासमोर येतील व त्यांचाही आत्मविश्वास वाढेल आणि आपल्या व्यवसाय कोणते बदल केले पाहिजेत याकरिताही हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. तेथे मार्गदर्शन किंवा माहितीसाठी संपर्क साधणे स्थानिक होतकरू नवउद्योजकांना शक्य होत नाही. या कार्यालयाच्या निमित्ताने हे उद्योजक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी जोडले जातील, असा विश्वास श्री. तावडे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष आशीष पेडणेकर, पर्यटन समिती अध्यक्ष संतोष तावडे, कोकण रिजन उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य प्रशांत पटवर्धन, व्यवस्थापन समिती आणि सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, तज्ज्ञ समिती सदस्यांनी केले आहे.
कार्यक्रमांचे वेळापत्रक असे – दुपारी २ वाजता जावकर प्लाझा, जयस्तंभ येथे कार्यालयाचे उद्घाटन, २.४५ वाजता अंबर हॉल येथे कोकण उद्योग मंथनचे उद्घाटन, ३.०० उद्योग व्यापार सत्र, ३.३० कृषी आणि प्रक्रिया उद्योग सत्र, ४.०० सेवा व लघु उद्योग सत्र, ४.३० पर्यटन उद्योग सत्र, उद्योजक व शेतकऱ्यांचा सन्मान, ५.१० यु टॉक, ६.०० उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार, कोकण विभागातील प्रतिथयश उद्योजकांचा सन्मान.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

